Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपानंतर इच्छुकांमध्ये अस्वस्थता
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 12:45 AM (IST)
पुणे, कोथरूड - भाजप-शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोथरूड मतदारसंघामध्ये युतीच्या जागा वाटपानंतर त्याचे पडसाद कोथरूडमध्ये दिसू लागले आहेत. कोथरूडमध्ये काही उमेदवारांनी पेढे वाटप केले, तर काही बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेनेच्या एका महिला नगरसेविकेने जागा सुटल्याच्या आनंदात आपल्या प्रभागात पेढे वाटप केले. या वेळी स्थानिक शिवसेना नेत्याने नगरसेविकेला कानपिचक्‍या देत तिकीट फायनल अद्याप झाले नाही आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या "सामना'मधून उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच सर्व काही निश्‍चित असते, असे सांगितल्याने नगरसेविकेचा अपेक्षाभंग झाला. युतीच्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये आपला प्रभाग भाजपला अथवा शिवसेनेला गेल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे; तर काही इच्छुकांनी जागा वाटपाची यादी आता अंतिम राहणार असल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे किंवा इतर पक्षांमध्ये काही संधी मिळते का, याची चाचपणी करीत बंडाचा झेंडा उभा केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून युतीचे काही इच्छुक मनसे नेत्यांच्या संपर्कात आहेत. मात्र, मनसे नेत्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने या इच्छुकांची कोंडी झाली आहे.

भाजप आणि शिवसेनेचे बंडोबा आता एकमेकांच्या पक्षाच्या उमेदवारांसमोर उभे ठाकण्याची शक्‍यता कोथरूड भागातील काही प्रभागांमध्ये निर्माण झाली आहे. यामध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यादेखील अपक्ष म्हणून रिंगणात असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. जागा वाटपाची अंतिम बैठक काल मुंबईत झाली. यात चर्चा होऊन काही जागांवर तडजोड करण्यात आली. या बैठकीस पुण्यातून शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे आणि नगरसेवक श्‍याम देशपांडे हेच उपस्थित होते. आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे आणि शहरप्रमुख नाना वाडेकर हे पक्षाचे पदाधिकारी असूनही त्यांना बैठकीबाबत कल्पना देण्यात आली नव्हती. हे पदाधिकारी काही जागांबाबत पक्षाच्या नेत्यांसमोर बाजू मांडणार होते. तडजोडीत अडचण नको म्हणून पदाधिकाऱ्यांना दूर ठेवण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

धनकवडी भागात शिवसेनेला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी पक्षाचे अस्तित्व दिसणार कसे, कार्यकत्यांना बळ कसे मिळणार, असा सवाल एका पदाधिकाऱ्याने केला. अंकुश तिडके हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. मात्र, ते शिवसेनेबरोबर होते. या निवडणुकीत प्रभाग 27 मधून त्यांना पक्षाचे तिकीट अपेक्षित होते. मात्र, एका नगरसेवकाचा हट्ट त्यांच्या आड आला आहे. प्रभाग 4 मधून विद्यमान नगरसेवक सागर माळकर इच्छुक आहेत. मात्र, ही जागा रिपब्लिकन पक्षाने मागितल्याने माळकर यांच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे.

प्रभाग क्रमांक 24 (डेक्कन) मधील दोन्ही जागा भाजपला सोडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. शाखाप्रमुख राजेश मांजरे यांनी एक पत्रक माध्यमांकडे दिले असून, या प्रभागातील एकतरी जागा पक्षाने जतन करावी, अशी मागणी केली आहे.

पुणे महापालिकेत जाण्यासाठी जय्यत तयारी करणारे शिवसेनेचे कार्यकर्ते गणेश कामठे यांचा अपेक्षाभंग झाला आहे. कामठे हे आमदार महादेव बाबर यांच्या निकटवर्ती आहेत. त्यामुळे सर्वसाधारण जागा सेनेकडे ठेवण्यासाठी ते आग्रही होते; परंतु या 62 क्रमाकांच्या प्रभागात सर्वसाधारण पुरुषाची जागा भाजपने खेचून नेली आणि इतर मागासवर्गीय महिला शिवसेनेकडे आली आहे. त्यामुळे बाबर नाराज आहेत. आता पक्षाच्या प्रत्येक बैठकीला गैरहजर राहण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: