ओबामा प्रशासनातील भारतीयाचा राजीनामा
- वृत्तसंस्था
Saturday, January 28, 2012 AT 01:22 PM (IST)
वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनातील माहिती तंत्रज्ञान प्रमुख अनिश चोप्रा यांनी आज (शनिवार) राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात व्हाइट हाऊसने कोणतेही वक्तव्य केले नसले तरी निवडणुकीत आपले भविष्य आजमावण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.
याबाबत ओबामा म्हणाले,""अमेरिकेच्या सरकारला 21 व्या शतकात आणण्यात चोप्रा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अमेरिकेतील लोकांना उपयुक्त तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विविध पर्यायांचा कुशलतेने उपयोग केला. कार्यकर्त्यांची इलेक्ट्रॉनिक आरोग्य माहिती तयार करणे, ग्रामीण जनतेसाठी ब्रॉडबॅन्डची कक्षा वाढविणे, सरकारी रेकॉर्ड अत्याधुनिक करणे आदी कामांमध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्यातील नेतृत्वगुण आणि संशोधनाची वृत्ती याचा अमेरिकेतील जनतेला भविष्यात लाभ होणार आहे. त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.''
व्हिर्जिनियाच्या लेफ्टनंट गर्व्हनर पदासाठी अनिश चोप्रा निवडणूक लढणार असल्याचे वृत्त वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने दिले आहे.