आंध्रातील माओवाद्याच्या जामिनाला स्थगिती
- वृत्तसंस्था
Saturday, January 28, 2012 AT 10:57 AM (IST)
नवी दिल्ली - माओवादी नेता कोबाड घांडे याला जामीन देण्याच्या आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने आज (शनिवार) स्थगिती दिली. आंध्रप्रदेश विधानसभेचे उपसभापती नरसी रेड्डी यांच्यासह 10 जणांची बॉम्बस्फोटात हत्या करण्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.
15 ऑगस्ट 2005 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी कोबाड घांडे ऊर्फ अरविंधू ऊर्फ कमल याच्याविरुद्ध आंध्रप्रदेश सरकारने सबळ पुरावे सादर केल्यावर जामीन देण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. न्यायाधीश बी. एस. चौहान आणि न्यायाधीश के. एस. राधाकृष्णन यांच्या खंडपीठाने कोबाड याला नोटीसही बजावली आहे. बॉम्बस्फोटासह इतर 10 गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये कोबाड याचा समावेश असल्याचे पुरावे आंध्रप्रदेश सरकारने सादर केले आहे.
कोबाड याच्या जामीनाविरुद्ध आंध्रप्रदेश सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर 4 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आंध्रप्रदेश सरकारला आणखी पुरावे सादर करण्यास सांगितले होते.