आक्षेपार्ह मजकुराला कात्री लावणे अशक्य -गुगल
- वृत्तसंस्था
Saturday, January 28, 2012 AT 12:05 PM (IST)
नवी दिल्ली - संकेतस्थळावरील सर्व मजकुरावर नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याचे आज (शनिवार) गुगलने स्पष्ट केले. भारतात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यामुळे आधीच गुगलवर चहुबाजूंनी प्रचंड टीका होत आहे. आज गुगलने जाहीर केलेल्या वक्तव्याने या वादात भर पडण्याची शक्यता अधिक आहे.
यासंदर्भात गुगलचे व्यवसाय प्रमुख निकेश अरोरा म्हणाले,""या विषयावर निःपक्ष चर्चा होण्याची गरज आहे. त्यानंतरच योग्य तो तोडगा काढला जाईल. आम्ही संपूर्ण वेब सेन्सॉर करू शकत नाही. लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सेन्सॉर करणे शक्य नाही. इंटरनेटला सीमा नाहीत. केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील इंटरनेटला कात्री लावणे जवळजवळ अशक्य आहे. संपूर्ण मजकुराला सेन्सॉर लावण्याच्या कल्पनेने भारताप्रमाणेच जगाच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसण्याची शक्यता आहे.''
आक्षेपार्ह मजकूर संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दिल्लीच्या न्यायालयासमोर 13 मार्च रोजी उपस्थित राहण्याचा आदेश गुगल, फेसबुकसह 21 कंपन्यांच्या प्रमुखांना न्यायालयाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर गुगलच्या व्यवसाय प्रमुखांचे आलेले वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे.