Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

कही खुशी कही गम...
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 18, 2012 AT 03:00 AM (IST)
परभणी - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणातील डझनभर विद्यमान व माजी सदस्यांसह मातब्बरांना पराभवाचा मोठा तडाखा बसला. केवळ विद्यमान दहा सदस्य व त्यांचे कुटुंबीय नकारात्मक या लाटेतून कसबसे तरले.

जिल्ह्यात कुठल्याही प्रकारची लाट नसताना व स्थानिक मुद्यांवरच निवडणुका लढल्या गेल्या. विविध पक्षांचे अनेक उमेदवार पक्षाच्या नव्हे तर जिल्हा पातळीवर नेत्यांच्या नावावर निवडणुकीत उतरले. कुठलाही पक्ष एकसंध होऊन निवडणुकीत लढला नाही. नेत्यांनीही आपापले सुभे वाटून घेतले होते. उमेदवार देखील स्वबळावरच आखाड्यात उतरले होते. एकहाती प्रचार यंत्रणा सांभाळत होते. अनेकांना फंदफितुरीचा दणका बसला. त्यामध्ये डझनभर विद्यमान सदस्यांसह माजी सदस्य पराभूत झाले. काहींच्या पराभवास गटातील बदल, गट-तटासह जातीपातीचे राजकारण, घसरलेली प्रतिष्ठा, अतिमहत्त्वाकांक्षा हे घटक देखील कारणीभूत ठरले.

जिंतूर तालुक्‍यात तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची लाट आली. त्यामुळे सावंगी म्हाळसा गटातून विद्यमान सदस्य रामराव उबाळे यांना राष्ट्रवादीचे विजयकुमार वालखे यांच्याकडून तर खासदार ऍड. गणेशराव देशमुख यांचे पुतणे व कॉंग्रेसमधून शिवसेनेत गेलेले व वस्सा गटातील अशोकराव दुधगावकर यांना कॉंग्रेसच्या आत्माराम पवार यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या पत्नी सौ. अंजली दुधगावकर या विद्यमान सदस्य होत्या. परभणी तालुक्‍यात दैठणा येथील राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे असलेले विद्यमान सदस्य व माजी सभापती ऍड. स्वराजसिंह परिहार यांचा पराभव धक्कादायक मानला जात आहे. ऐनवेळी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव कच्छवे हे या गटातून निवडून आले. राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य रामभाऊ घाटगे यांच्या पत्नी सौ. शोभा घाटगे या सिंगणापूर गटातून पराभूत झाल्या. शिवसेनेच्या जयश्री लोंढे यांनी त्यांचा पराभव केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान सदस्य विद्यासागर चिखलीकर यांनी सोनपेठ तालुक्‍यातील शेळगाव गटातून कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पण त्यांना देखील राष्ट्रवादीच्या देवीदास मुलगीर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पूर्णा तालुक्‍यातील कावलगाव गटात तर दोन माजी सदस्यांना पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीचे रुस्तुमराव वंजे व कॉंग्रेसचे मारोतराव पिसाळ दोघेही पराभूत झाले. तर शिवसेनेचे बंडखोर व विद्यमान सदस्य बालाजी देसाई यांनी चौरंगी लढतीत बाजी मारली. श्री. वंजे यांच्या पत्नी सौ. वत्सलाबाई या विद्यमान सदस्या होत्या. पालम तालुक्‍यातील चाटोरी गटातून माजी आमदार व विद्यमान सदस्य ज्ञानोबा हरी गायकवाड यांना पराभवाचा धक्का बसला. गंगाखेड तालुक्‍यातील महातपुरी गटातही दोन विद्यमान सदस्यांना पराभव पत्करावा लागला. कॉंग्रेसचे गोविंद राठोड व भारतीय जनता पक्षाचे विठ्ठलराव रबदले यांचा या ठिकाणी पराभव झाला तर विद्यमान सदस्य लक्ष्मण धोंडिबा मुंडे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले. मागच्या जिल्हा परिषदेत श्री. रबदडे यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई व श्री. लक्ष्मण मुंडे यांच्या पत्नी सौ. सुनीता या सदस्या होत्या.
जिंतूर तालुक्‍यातील कौसडी गटातून राष्ट्रवादीचे बंडखोर व विद्यमान सदस्य पुरुषोत्तम खिस्ते पराभूत झाले. परभणी तालुक्‍यातील पेडगाव गटातून राष्ट्रवादीचे बंडखोर रमेश माने यांना पराभवाला सामोरे जावे लागले. गंगाखेड तालुक्‍यातील राणीसावरगाव गटातून विद्यमान सदस्या शांताबाई कांतराव चव्हाण या कॉंग्रेस उमेदवार पराभूत झाल्या. तर कोद्री गटातून विद्यमान सदस्या व राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभ्या असलेल्या गंगाबाई मुरकुटे यांना अपक्ष उमेदवार संगीता भगवान सानप यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

यांना पाहावे लागले पराभवाचे तोंड
विविध पक्षांच्या वजनदार, मातब्बर पुढाऱ्यांना देखील पराभव चाखावा लागला. त्यामध्ये वडगाव (ता. सोनपेठ) मधून कॉंग्रेसचे बाबासाहेब फले, पोखणी (ता. परभणी) राष्ट्रवादीच्या सौ. करुणा कुंडगीर, भाजपचे नेते व माजी सदस्य शामसुंदर मोरे (दैठणा) यांना, उखळी (ता. सोनपेठ) मधून शिवसेनेचे नेते मधुकर निरपणे, पालममधून राष्ट्रवादीचे वसंत सिरसकर, शिवसेनेचे अजित वरपुडकर (लोहगाव), श्रीनिवास रेंगे (जांब), रवींद्र धर्मे (देवनांद्रा), गंगाखेडचे माजी सभापती राजेश फड (महातपुरी), कॉंग्रेसचे सूर्यकांत हाके यांच्या पत्नी वंदना हाके (पोखर्णी) व पांडुरंग कागदे यांच्या पत्नी शीला कागदे (पिंगळी) यांना पराभव पत्करावा लागला.
प्रतिक्रिया
On 18/02/2012 02:26 PM balu madane said:
मस्त आहे निवडणूक खूप छान झाली मला खूप आनंद झाला तुम्ही जे आमच्या पर्यत पोहचवता ते खूप च्यान असता माज्याकडून तुम्हा सर्वाना खूप शुभेच्या ........


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: