Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

जिल्हा परिषदेवर पुन्हा युतीचा झेंडा
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 18, 2012 AT 03:00 AM (IST)
Tags: zp,   yuti,   flag,   jalna,   election,   marathwada
जालना - अडीच वर्षांच्या कालखंडानंतर जालना जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवण्यात भाजप - शिवसेना युतीला यश आले आहे. जालन्यावर वर्चस्व कायम राखत घनसावंगी पंचायत समिती शिवसेनेने ताब्यात घेतली. भोकरदन, जाफराबाद, परतूर भाजपकडे जाणार असून, बदनापूर, अंबड, मंठ्यात राष्ट्रवादी - कॉंग्रेस आघाडीकडे सत्ता जाईल, अशी चिन्हे आहेत.

भोकरदनला दिग्गज पराभूत
भोकरदन : गट व गणात भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नगरपालिकेच्या अगदी विरुद्ध जिल्हा परिषदेचा निकाल लागला आहे. एकूण दहा गटांपैकी भाजपने सात, राष्ट्रवादीने दोन व कॉंग्रेसने एका जागेवर यश मिळवले आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीवर पुन्हा भाजपचीच सत्ता आली आहे. शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रचाराला येऊनही खासदार रावसाहेब दानवे यांनी एकट्याने विजयश्री खेचून आणली. अचलादेवी श्रीवास्तव, भाजपचे कडुबा शेरकर, कॉंग्रेसचे नेते पंडितराव साबळे यांच्या पत्नी दुर्गा साबळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष सांडू पुंगळे यांच्या पत्नी सविता पुंगळे, ऍड. हर्षजित देशमुख, विठ्ठल चिंचपुरे या दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला.

घनसावंगीत राष्ट्रवादीला सुरुंग
घनसावंगी : शिवसेनेने गटाच्या सातपैकी चार तर समर्थक, अपक्ष दोन, असे सहा तसेच पंचायत समितीच्या बारा जागा निवडून आणून वर्चस्व प्रस्थापित केल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. घनसावंगी तालुका राष्ट्रवादीची बालेकिल्ला असून येथे राजेश टोपे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांचे वर्चस्व आहे. माजी खासदार अंकुशराव टोपे, पालकमंत्री राजेश टोपे यांनी तालुक्‍यातील ग्रामीण भागात जवळपास अंदाजे पंधरा ते वीस सभा ठिकाणी प्रचार सभा, बैठका घेत अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. कॉंग्रेसच्या उमेदवारांसाठी जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार विलासराव खरात यांनी प्रचारसभा घेतल्या मात्र तालुक्‍यात कॉंग्रेस पक्षाचे खातेही उघडले नाही तसेच मनसे नेते सुनील आर्दड यांनी तालुक्‍यातील सर्वच गट व गणांतील जागेवर उमेदवार उभे करून त्यांना ताकत देण्याचा प्रयत्न केला; मात्र मनसेला या निवडणुकीत यश मिळाले नसले तरी त्यांनी मताधिक्‍य मिळवून तालुक्‍यात चांगले पाय रोवण्याचा प्रयत्न केला आहे.

कॉंग्रेसची पिछेहाट
परतूर : तालुक्‍यात भाजपचे तीन, शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक सदस्य गटात निवडून आले आहेत. पंचायत समितच्या निवडणुकीतही भाजप -शिवसेना व राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. कॉंग्रेस, मनसे व अन्य पक्षांचा एकही उमेदवार निवडून आला नसल्याने कॉंग्रेसची पिछेहाट झाल्याचे मानले जाते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सातोना खुर्द येथील लढतीकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार आशाताई बाबासाहेब आकात या निवडून आल्या. तसेच पंचायत समितीच्या सामोना खुर्द गणातून गंगूबाई टोणपे, पाटोदा माव गणातून कपील बाबासाहेब आकात व काऱ्हाळा गणातून मनोहर पवार निवडून आल्याने या निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मोठे यश मिळून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पाचपैकी भाजपचे वाटूर गणातून शहाजी राक्षे, आष्टीतून मीराबाई सोळंके व कोकाटे हदगाव गटातून राहुल लोणीकर हे सदस्य निवडून आले आहेत. पंचायत समितीतही वाटूर गणातून भाजपच्या छाया माने, आंबा येथून तुकाराम बोनगे, आष्टी गणातून लक्ष्मीबाई सातपुते, कोकाटे हदगाव गणातून सुरेखा कोरडे व गोळेगाव गणातून सिताबाई लहाने हे पाच उमेदवार निवडून आले. तसेच शिवसेनेचे श्रीष्टी येथून शिवाजी पाईकराव विजयी झाले. कॉंग्रेस पक्षाला वरफळ गणात यश मिळाले असून या गणातून श्रीमती कांचना दादाराव खोसे या एकमेव निवडून आल्या आहेत.

नवख्यांना मिळाली संधी
एकेकाळी राष्ट्रवादीच्या तालमीत वावरणारे शाम उढाण, महेंद्र पवार, बापूराव देशमुख यांना मतदारांनी डोक्‍यावर घेऊन त्यांना जिल्हा परिषदेची संधी दिली तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र आर्दड यांची पत्नी शालिनी आर्दड, पंचायत समिती सदस्य शंकर बेंद्रे यांची सून वर्षा बेंद्रे, हुरंबी कुरैशी या नवख्यांना शिवसेनेकडून तर राष्ट्रवादीकडून काशिनाथ मते यांना जिल्हा परिषदेची संधी मिळाली आहे.
(सहभाग सुभाष बिडे, तुषार पाटील, सुरेश राऊत)


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: