Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

जालन्यातील मतमोजणी तीन तासांतच आटोपली
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 18, 2012 AT 03:00 AM (IST)
Tags: jalna,   vote,   counting,   election,   marathwada
जालना - जालना तालुक्‍यातील गट आणि गणांची मतमोजणी शुक्रवारी (ता.17) येथील आयटीआयमध्ये पार पडली. सकाळी दहा वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी एक वाजता संपली. केवळ तीन तासांत जिल्हा परिषदचे आठ गट आणि पंचायत समितीच्या 16 गणांची 32 टेबलवर ही मोजणी करण्यात आल्याने तीन तासांत सर्व निकाल मिळू शकले.

आयटीआयमधील वर्कशॉपमध्ये डाव्या बाजूस गट आणि उजव्या बाजूस गणांच्या मतमोजणीसाठी प्रत्येकी दोन टेबल, असे एकूण 16 टेबल लावण्यात आले होते. गटा व गणांसाठी दोन कर्मचारी तसेच मतदान यंत्र आणण्यासाठी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी दहा वाजेपूर्वीच मतमोजणीशी संबंधित सर्व कर्मचारी आयटीआयमध्ये हजर झाले होते. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत चालू आहे की नाही, याची अचानक पाहणी जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक श्री. काळे यांनी केली. सकाळी 11.30 वाजता पहिला पंचायत समितीचा निकाल निवडणूक निणर्य अधिकारी वामन कदम यांनी जाहीर केला. दुपारी एक वाजता सर्व मतमोजणी पूर्ण होऊन विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, वाघ्रुळ जहांगीर जिल्हा परिषद गटाची मतमोजणी करताना संगणकावर आकडेमोड करताना तांत्रिक चूक झाली. त्यामुळे निवडणूक निणर्य अधिकारी कदम यांनी या गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार रामकौर बबन खरात यांना विजयी घोषित केले होते. मात्र शिवसेनेचे मतदान प्रतिनिधी उद्धव वाढेकर यांनी यावर आक्षेप नोंदवून या गटातील मतांची पुन्हा बेरीज करण्याची मागणी केली. त्यामुळे ती पुन्हा करण्यात आली असता, शिवसेनेच्या उमेदवार सरला वाढेकर यांना निवडणूक निणर्य अधिकारी कदम यांनी विजयी घोषित केले. हा अपवाद वगळता मतमोजणी सुरळीत पार पडली. मतमोजणीच्या प्रारंभीच्या पहिल्या व दुसऱ्या फेरीत कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार शिवसेनेच्या मातब्बर उमेदवारांच्या पुढे होते. मात्र नंतर शिवसेनेने जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात आघाडीची जी घोडदौड सुरू ठेवली ती शेवटपर्यंत कायम राखली.

गुलालाची उधळण
मतमोजणीचे निकाल ऐकण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांनी केंद्राबाहेर मोठी गर्दी केली होती. विजयी उमेदवारांचे स्वागत जोरदार ढोलताशे व गुलालाची उधळण करून केली जात होती. मतमोजणी गतीने पार पाडण्यासाठी जालन्याचे तहसीलदार जालीमसिंग वळवी, नायब तहसीलदार पी.के.ठाकूर, बहुरे, पवार, वझरकर, कावळे आदींनी प्रयत्न केले. यावेळी पोलिस निरीक्षक व्ही.के.चव्हाण यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
...


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: