Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

पराभव जिव्हारी लागताच शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 18, 2012 AT 03:15 AM (IST)
Tags: nanded,   shivsena,   election,   result,   marathwada
नांदेड - तालुक्‍यातील वाडी बुद्रुक व लिंबगाव गटातील पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला असून आपसात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. वाडीमधून जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांच्या सौभाग्यवती आणि लिंबगावमधून संगीता पाटील डक यांचा पराभव झाला. हा निकाल स्पष्ट होताच नांदेड उत्तरचे तालुकाप्रमुख जयवंत कदम यांनी पत्रक प्रसिद्धीस देत माजी जिल्हाप्रमुख धोंडू पाटील आणि नांदेडचे (उत्तर) उपजिल्हाप्रमुख ऍड. दिलीप ठाकूर यांच्यावर गद्दारीचे जाहीर आरोप केले आहेत.

नांदेड तालुक्‍यात जिल्हा परिषद गटांचे निकाल जाहीर होताच शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांचे कट्टर समर्थक जयवंत कदम यांनी लगेच प्रसिद्धिपत्रक काढून उपजिल्हाप्रमुख ऍड. दिलीप ठाकूर आणि माजी जिल्हाप्रमुख धोंडू पाटील यांच्यावर गद्दार असल्याचा आरोप करताना पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या नांदेड उत्तर तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. कदम यांनी आपल्या पत्रकात दिलीप ठाकूर यांना पराभवाचा जबाबदार ठरविताना त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोप ठेवले आहेत. पुयणी येथील आनंद पावडे, भालकी येथील मारुती डांगे व मरळक येथील बालाजी कदम हे ठाकूर यांच्या चिथावणीवरून पक्षविरोधी काम करून प्रचार यंत्रणा विस्कळित करीत असल्याचे म्हटले आहे.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि लातूरचे संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांनाही षडयंत्रात गोवताना त्यांच्याच निवासस्थानी गद्दारांच्या बैठका झाल्याचे म्हटले आहे. षडयंत्र आखून वाडी येथील राजश्री हेमंत पाटील यांचा पराभव केल्याचा आरोप केला आहे. अशोक चव्हाण हे शिवसेना कार्यकर्त्यांना मॅनेज होतात असा आरोप करतात तो खरा असल्याची पुष्टीही यात स्पष्टपणे देण्यात आली आहे. विधानसभेतही याच गद्दारांनी हेमंत पाटील यांना धोका दिल्याचाही आरोप आहे. या गद्दारांची नावे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

गद्दार कोण हे जनतेला माहीत ः दिलीप ठाकूर
शिवसेनेचे नांदेड उत्तर तालुकाप्रमुख जयवंत कदम यांनी केलेल्या आरोपाबाबत ऍड. दिलीप ठाकूर यांची बाजू विचारली असता ते म्हणाले, ""गद्दार कोण हे जनतेला पूर्णपणे माहिती आहे. आपण पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले असून याबाबत पक्षाने विचारणा केल्यास खुलासा करेन.''

आरोप अनाकलनीय ः धोंडू पाटील
शिवसेनेचे लातूर तालुका संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी हे आरोप अनाकलनीय व हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. पाटील म्हणाले. "आईच्या निधनाच्या दुःखात मी आहे. ता. 22 जानेवारी रोजी आईचे निधन झाले. त्यानंतर दहाव्यासाठी गोदावरी नदीवर जाण्यासाठी मी घराबाहेर पडलो. त्यानंतर अजूनही मी पूर्णपणे सावरलो नाही. माझा या एकूणच प्रकाराशी काही एक संबंध नाही. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीपासून मी अलिप्त असून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे काम करीत आहे.''


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: