Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

आघाडीकडून शिवसेनेने सत्ता हिसकावली
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 18, 2012 AT 03:00 AM (IST)
Tags: hingoli,   shivsena,   zp,   election,   marathwada
हिंगोली - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला बाजूला ठेवत स्वतंत्र लढणाऱ्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या मतविभाजनाचा फायदा घेत एकहाती सत्ता हिसकावत जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवून आणले. बहुमतासाठी लागणारा पंचवीसचा आकडा ओलांडून शिवसेनेने 27 जागांवर विजय मिळविला.

जिल्हा परिषदेच्या राजकारणात आतापर्यंत राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीची सत्ता होती. दोन अपक्षांच्या मदतीने काठावरचे बहुमत मिळवून आघाडीने सत्ता चालवली, तर 21 जागा मिळवून शिवसेनाही बहुमताच्या जवळ होती. मात्र अपक्षांच्या भरवशावर आघाडीने सत्ता पाच वर्षे टिकवली.
या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन जागा घडल्या. पक्षाने बाराऐवजी दहा जागा मिळविल्या. कॉंग्रेसची चार जागांनी म्हणजे तेरावरून नऊपर्यंत पीछेहाट झाली. माने समर्थक असलेले अपक्ष उमेदवार गजानन देशमुख, बाबाराव नाईक हे दोघेही निवडून आले. याशिवाय हट्ट्यातून अपक्ष उमेदवार कांताबाई चट्टे तर हत्ता गटातून अपक्ष उमेदवार यशोदा राठोड या विजयी झाल्या. शिवसेनेने 21 पासून सहा जागांची वाढ करून 27 पर्यंत मजल मारली. तर एकट्या पडलेल्या भाजपला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे तरीही शिवसेनेने निर्विवाद बहुमत मिळविले.

खासदार सुभाष वानखेडे, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी ग्रामीण भागातील शिवसेनेच्या बांधणीला जोर लावून जागा निवडून आणल्या. शिवसेनेने आरक्षित प्रवर्गातील जागांसाठीही आघाडीच्या तुलनेत अधिक जोर लावला. याउलट वसमत तालुक्‍यात आरक्षित प्रवर्गाच्या जागांवर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी जोर न लावल्यामुळे जागा गमवाव्या लागल्या. आरक्षित प्रवर्गाच्या गटामध्ये शिवसेना व आघाडीच्या कामगिरीत हा मूलभूत फरक झाला आहे. तसेच कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज पाहिली तर मतविभाजनाचा फटका लक्षणीय असल्याचे दिसून येत होते. त्यातच कॉंग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र लढले असले तरी दोघांकडे सर्वच ठिकाणी प्रबळ उमेदवार नव्हते. अशा ठिकाणी एकमेकांना पाठिंबा देणे आवश्‍यक होते. मात्र माजी खासदार शिवाजी मानेंच्या पक्षांतराच्या गोंधळात हा मुद्दा मागे पडला. ऐनवेळी तिकीट वाटपाची घाईदेखील अडचणीची ठरली.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, युवक जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे यांच्या पत्नी किरण पतंगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अंबादास भोसले यांच्या पत्नी मथुराबाई भोसले, जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष मिलिंद यंबल यांच्या पत्नी अश्‍विनी यंबल, कॉंग्रेसचे डॉ. संतोष टारफे यांच्या पत्नी वंदना टारफे यांनी जिल्हा परिषदेत प्रवेश मिळविला. तर माजी सभापती लक्ष्मीबाई जामठीकर, उपप्राचार्य विक्रम जावळे, माजी सभापती आनंदराव कदम, माजी सभापती संजय बोंढारे यांच्या भावजय सारिका बोंढारे, राष्ट्रवादीचे प्रल्हाद राखोंडे यांच्या पत्नी निर्मला राखोंडे, शिवसेनेचे बालाजी क्षीरसागर यांच्या पत्नी सविता क्षीरसागर यांना पराभव पत्करावा लागला.

जिल्हा परिषद निवडणुकीत हे राजकारण सुरू असताना पंचायत समितीमध्ये शिवसेनेने जोर मारला आहे. हिंगोली व सेनगाव पंचायत समित्यांमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादीने बऱ्यापैकी स्थान कायम ठेवले. मात्र कळमनुरी, औंढा नागनाथ व वसमत पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेने झेंडा रोवला आहे. कळमनुरी पूर्वी कॉंग्रेसकडे, तर औंढ्यावर राष्ट्रवादीची सत्ता होती. वसमतमध्ये पूर्वीचीच शिवसेनेची सत्ता कायम राहिली आहे. एकूणच आघाडीच्या राजकीय संघर्षामध्ये काठावरचे बहुमत बेसावधपणामुळे आघाडीच्या नेत्यांना गमवावे लागले आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात आघाडीच्या आमदारांच्या राजकारणालाही जिल्हा परिषदेची सत्ता जाण्याचा फटका या निवडणुकीत बसला आहे. जिल्ह्यातील तिन्ही आमदार या परिस्थितीतून कोणता राजकीय मार्ग काढतात याला मोठे महत्व येणार आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: