Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

"राष्ट्रवादी'स सत्तेकरिता घ्याव्या लागणार कुबड्या
संतोष धारासूरकर
Saturday, February 18, 2012 AT 03:00 AM (IST)
Tags: ncp,   marathwada,   election,   result
कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातूनच मोठी मुसंडी मारीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा खेचून जिल्हा परिषद निवडणुकीत काठावरचे बहुमत पटकावले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी जिंतूर व सेलूमधून अभूतपूर्व यश पटकावले असून, त्यांच्याच गटाच्या नवनिर्वाचित महिला सदस्या अध्यक्षपदी विराजमान होतील, असे स्पष्ट संकेत आहेत. या जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व होते. परंतु त्यास कॉंग्रेस बंडखोरांच्या कुबड्या होत्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षास स्पष्ट बहुमत मिळेल, असे चित्र होते. परंतु माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या परभणी व पूर्णा या प्रभावक्षेत्रातील पट्ट्यात राष्ट्रवादीस अपेक्षित यश मिळाले नाही. परिणामी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला निसटते बहुमत मिळाले आहे. एकूण 52 गटांपैकी 25 जागा पटकावल्या खऱ्या; परंतु स्पष्ट बहुमताकरिता राष्ट्रवादीस दोन सदस्यांचे पाठबळ मिळवावे लागणार आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रा काशीनाथ दुधाटे यांचे तसेच शिवसेनेचे बंडखोर तथा अपक्ष सदस्य बालाजी देसाई यांचे राष्ट्रवादीस समर्थन मिळेल, असे संकेत आहेत.

भांबळेंनी केले बोर्डीकरांना नामोहरम
या निवडणुकीच्या निकालातून काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी पुढे आल्या आहेत. विशेषतः कॉंग्रेसचे ज्येष्ठ आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना जिंतूर व सेलू या स्वतःच्या प्रभावक्षेत्रात राष्ट्रवादीकडून मोठा तडाखा बसला. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी नगरपालिका निवडणुकीतील पराभवाचा उट्टा काढला. विशेष म्हणजे बोर्डीकर यांच्या कन्या मेघना साकोरे या राष्ट्रवादीच्या तडाख्यातून कशाबशा तरल्या. त्या अवघ्या 378 मतांनी निवडून आल्या. राष्ट्रवादीच्या दीपाली अजय चौधरी यांनी त्यांची मोठी दमछाक केली. शिवसेनेचे खासदार ऍड. गणेशराव दुधगावकर यांचे पुतणे वस्स्यातून मोठ्या मताधिक्‍याने पराभूत झाले. जिंतुरातील दहापैकी सहा जागा पटकावून भांबळेंनी बोर्डीकरांना नामोहरम केले आहे. सेलूतसुध्दा शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचा मानहानीकारक पराभव करीत राष्ट्रवादीने बस्तान बसविले आहे. शिवसेनेस सहापैकी केवळ एक जागा राखता आली. बोर्डीकरांना एक जागासुध्दा पटकावता आली नाही. जिंतूर व सेलूतील राष्ट्रवादीचे यश बोर्डीकरांच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय ठरला आहे.

मानवतमध्ये शिवसेनेचा झंझावात
मानवत तालुक्‍यात राष्ट्रवादीचा पुन्हा मानहानीकारक पराभव झाला. कॉंग्रेसने शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात केकरजवळ्याची जागा पटकावली; परंतु मानवत पंचायत समितीतील शिवसेनेचा झंझावात कॉंग्रेसजनांना रोखता आला नाही. पाथरी तालुका पुन्हा राष्ट्रवादीमय झाला आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पालिकेपाठोपाठ या निवडणुकीतसुध्दा आपला करिश्‍मा दाखवून दिला. तालुक्‍यातील चारही गटांच्या जागा तसेच पंचायत समितीच्या सर्वच जागा दुर्राणी यांनी पटकाविल्या. विरोधकांना धोबीपछाड दिली. सोनपेठ तालुकासुध्दा राष्ट्रवादीमय झाला आहे. गटातील तीनही जागा तसेच गणातील सहापैकी पाच जागा पटकावून राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर कॉंग्रेसला तडाखा दिला. शिवसेनेच्या आमदार सौ. मीरा रेंगे यांना सोनपेठ, पाथरी या दोन तालुक्‍यांत मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. मानवत तालुक्‍यात दोन गटांत यश पटकावून शिवसेनेने इभ्रत राखली. माजी आमदार व्यंकटराव कदम व माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांचा सोनपेठातील करिष्मा निवडणुकीतून दिसून आला.

मधुसूदन केंद्रेंचे स्वप्न भंगले
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. मधुसूदन केंद्रे यांना स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीच्या माध्यमातूनसुध्दा प्रभाव सिध्द करतील असे अपेक्षित होते. परंतु नेहमीप्रमाणे केंद्रे यांच्या विरोधकांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ऐक्‍याची मोट बांधली व केंद्रे यांच्या समर्थकांना सहापैकी चार गटांत दणका दिला. पालम तालुक्‍यातसुध्दा राष्ट्रवादीस मोठा तडाखा बसला. आमदार सीताराम घनदाट यांनी या मतदारसंघात तीन जागा पटकावून आपले अस्तित्व दाखवून दिले. त्यापाठोपाठ भाजपाने दोन, कॉंगेसने दोन व शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष व एका अपक्षाने प्रत्येकी एक जागा पटकावून केंद्रे यांचे स्वप्न भंग केले. माजी आमदार ज्ञानोबा हरी गायकवाड यांचा पराभव केंद्रेंना जिव्हारी लागणारा ठरला. शेकापने एक जागा पटकावून दिवा पेटवला.

पूर्णेत बंडखोर प्रभावी
पूर्णेत राष्ट्रवादीस मोठे यश मिळेल असे वाटले खरे; परंतु सहापैकी केवळ तीन गटांवर त्यांना समाधान मानावे लागले. शिवसेनेने दोन, घनदाट यांनी एक जागा पटकावली. शिवसेनेचे बंडखोर बालाजी देसाई यांनी अपक्ष म्हणून यश पटकावून स्वतःचे अस्तित्व राखले आहे. ते आता कुठे वळतील यावर त्यांचे भवितव्य आहे. त्यांचे मत निर्णायक ठरेल अशी चिन्हे आहेत.

परभणीत राष्ट्रवादीची पीछेहाट
परभणी तालुक्‍यात माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना सहा ते आठ जागा मिळतील असे अपेक्षित होते. परंतु राष्ट्रवादीस गेल्या निवडणुकीएवढे यशसुध्दा राखता आले नाही. दहापैकी चार जागी यश मिळवता आले. विशेष म्हणजे वरपुडकर यांना त्यांचे सुपुत्र समशेर वरपुडकर यांचे दमदार पध्दतीने लॉंचिंग करता येईल, असे अपेक्षित होते; परंतु त्यांचेच पुतणे अजित वरपुडकर यांनी लोहगाव गटात वरपुडकर पितापुत्रांची व काकांची मोठी दमछाक केली. समशेर वरपुडकर यांना निसटते यश मिळाले. गंमत म्हणजे वरपुडकर या गटातच अडकून पडले. परिणामी त्यांचे कट्टर समर्थक रामभाऊ घाटगे, स्वराजसिंह परिहार तसेच करुणा कुंडगीर यांना ते बचावू शकले नाहीत. पिंगळीतसुध्दा शिवसेनेने यश पटकावले. वरपुडकर यांना धक्का बसला. शिवसेनेचे आमदार संजय जाधव यांनी स्वतःच्या प्रभावक्षेत्रात प्रभाव सिध्द केला. कॉंग्रेसला एकमेव जागा मिळवता आली. इभ्रत राखता आली. आमदार सुरेश देशमुख यांनी यशाचे मोठे दावे केले परंतु ते फोल ठरले. त्यांचे अनेक उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने पराभूत झाले. राष्ट्रवादीच्या राज्यमंत्री श्रीमती फौजियाखान यांच्या काही समर्थकांना राष्ट्रवादीकडून मोजकी तिकिटे मिळाली. बहुतांशींनी बंडखोऱ्या केल्या. ते सारे चारीमुंड्या चीत झाले.

सत्तेची दोरी अपक्षांच्या हाती...
राष्ट्रवादी कॉंग्रेसने निसटते बहुमत पटकावले खरे; परंतु स्पष्ट बहुमताकरिता राष्ट्रवादीस दोघा अपक्ष सदस्यांची मनधरणी करावी लागणार, असे चित्र उद्‌भवले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भांबळे व माजी आमदार दुर्राणी या दोघांच्याच हाती जिल्हा परिषदेची सूत्रे येतील असे स्पष्ट संकेत आहेत. कॉंग्रेस, शिवसेना व घनदाट मित्रमंडळकडून सत्तेकरिता फारसे प्रयत्न होणार नाहीत, असा अंदाज आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: