Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

कोणी काय केले याचा "सातबारा' माझ्याकडे तयार - भुजबळ
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 19, 2012 AT 12:45 AM (IST)
येवला - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत येवल्यात कोणी काय केले, याचा सातबारा माझ्याकडे तयार आहे. येवल्यात येऊन मी बैठक घेऊन पुढील निर्णय घेईल. नवनिर्वाचित सदस्यांनी जनतेची कामे करून विश्‍वास सार्थ ठरवा, असा सूचनावजा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

शुक्रवारी निकाल घोषित झाल्यानंतर पालकमंत्री भुजबळ यांची नाशिक येथील फार्मवर सर्व विजयी उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या वेळी भुजबळांनी सर्वांचा सत्कार केला. पाटोदा गट- गणासह धुळगाव गणातील जागा शिवसेनेच्या ताब्यात गेल्याच कशा? हा प्रश्‍न सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांना केला. सदस्यांशी चर्चा करताना भुजबळ म्हणाले, की निवडणुकीत काय प्रकार झाले हे मला येवल्यातूनच फॅक्‍स, एसएमएस, पाकिटात अर्ज पाठवून कळविण्यात आले आहे. झालेल्या प्रकाराचा मी लेखाजोखा घेणार आहे. जनतेने विश्‍वास टाकल्याने एकहाती सत्ता मिळाली असल्याने तुमची जबाबदारीही वाढणार आहे. त्यामुळे गट-गणात चांगली कामे करा. सर्वसामान्यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

या वेळी कार्यकर्त्यांनीही मनातील खदखद बोलून दाखविली. सर्वसामान्यांना डावलताना अनेकदा कार्यकर्ते वंचित राहत आहेत. त्यामुळे गद्दारी करणाऱ्यांना माफ करू नका, अशी अपेक्षा सुनील पैठणकर, विनोद ठोंबरे, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, दिनकर घुले आदींनी व्यक्त केली, तर उमेदवार उभे करणे, इतरांना मदत करून स्वपक्षाला हानी पोहोचविण्याचे कामही काही नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. अशा खेळ्या थांबायला हव्यात ही अपेक्षा चंद्रकांत साबरे यांनी व्यक्त केली. संपर्क कार्यालयातील कामकाज व्यवस्थित असल्याचे पालिकेतील गटनेते प्रदीप सोनवणे यांनी सांगितले.

गटातील विजयी उमेदवार प्रवीण गायकवाड, सुनीता चव्हाण, साईनाथ मोरे, कृष्णराव गुंड, गणातील पोपट आव्हाड, राधिका कळमकर, शिवांगी पवार, प्रकाश वाघ, भारती सोनवणे, जयश्री बावचे, संभाजी पवार, हरिभाऊ जगताप यांच्यासह बाळासाहेब लोखंडे, सुनील पैठणकर, सचिन कळमकर, प्रमोद बोडखे, संतोष खैरनार, साबरे, दत्तू देवरे, प्रभाकर निकम, राधाकिसन सोनवणे, अशोक महाले, वसंतराव पवार, अरुण काळे, नवनाथ काळे, सतीश पैठणकर, भारत वाघ, देवीदास निकम, विश्‍वास आहेर आदी उपस्थित होते.

दरम्यान, भुजबळांनी गद्दारी व गडबडीसंदर्भात ठोस भूमिका घेण्याची घोषणा केल्याने राजकारणात उलथापालथ होण्याची भाकितेही व्यक्त होत आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: