Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

कोण होईल अध्यक्ष?
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 19, 2012 AT 01:00 AM (IST)
Tags: zp election,   nagpur,   vidarbha
नागपूर - जिल्हापरिषदेत युतीची सत्ता आल्याने आणि भाजपच्या सर्वाधिक जागा आल्याने या पक्षाकडे अध्यक्षपद जाणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे माजी जि. प. अध्यक्ष रमेश मानकर यांच्या पत्नी अरुणा मानकर, शुभांगी गायधने आणि संध्या गोतमारे यांची प्रमुख दावेदारी आहे. शिवसेनेच्या वाटयाला उपाध्यक्षपद जाईल. यासाठी भारती गोडबोले, नंदा लोहबरे या दावेदारी आहेत. अगदी काटोकाट युतीला बहुमत मिळाला असल्याने कॉंग्रेसही जोमाने भिडणार असल्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादीच्या कमी जागेमुळे त्यांचे गणित बिघडले असले तरी काहीही घडू शकते, असे संकेत त्यांच्याकडून दिले जात आहेत.

जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद ओबीसी संवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळविणारा भाजप अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवाराची चाचपणी करीत आहे. सध्यातरी अरुणा मानकर (धापेवाडा), शुभांगी गायधने (नरसाळा) आणि संध्या गोतमारे (वानाडोंगरी) हे या पदाचे प्रमुख दावेदार म्हणून पुढे आहेत. स्वत:च्या मतदारसंघात अध्यक्षपद द्यावयाचे झाल्यास गायधने वा अरोली कोदामेढी येथून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सदानंद निमकर यांच्या पत्नीला पराभूत करणाऱ्या शकुंतला हटवार यांच्याकडेही बघितले जाते. मात्र, युतीतील शिवसेनेंला उपाध्यक्षपद देताना कुठल्या क्षेत्रातील प्रतिनिधी असेल यावरूनही अध्यक्षपद ठरेल. एकाच भागात अध्यक्ष व उपाध्यक्षपद जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शिवसेनेकडे सध्या 8 पैकी 7 महिला विजयी झाल्या आहेत. यापैकी दुसऱ्यांदा विजयी झालेल्या नंदा लोहबरे(तारसा चाचेर) आणि भारती गोडबोले(मौदा बाबदेव) यांचे नाव पुढे आहे. विद्यमान सदस्य देवेंद्र गोडबोले यांना मागच्यावेळी कुठलेही पद मिळाले नव्हते.यावेळी ते पत्नीसाठी आग्रही राहतील. महिलेस अध्यक्ष व पुरूषास उपाध्यक्षपद द्यावयाचे झाल्यास शरद डोणेकर (कन्हान पिंपरी) यांना संधी मिळू शकते.मग, सभापतिपदावर महिला सदस्यास संधी मिळेल.

कॉंग्रेसकडून अध्यक्षपदासाठी बबिता साठवणे, नंदा नारनवरे, कुंदा आमधरे, संध्या गावंडे, प्रणिता कडू यांच्यापैकी एकास लढविल्या जाऊ शकते. युती वा आघाडीला गोंडवाना वा बसपची मदत घ्यावयाची झाल्यास एक सभापतिपद या दोनपैकी एकास मिळू शकते. बसपच्या पुष्पा वाघोडे (मकरधोकडा) आणि दुर्गावती सरियाम (देवलापार) या विजयी झाल्या.

दरम्यान, मकरधोकडा या सर्कलमधून आधी शिवसेना आणि नंतर भाजपकडून उमेदवारी स्वीकारणाऱ्या प्रतिभा शिंदे यांना मतदारांनी पराभवाची शिक्षा सुनावली. बसपच्या पुष्पा वाघोडे यांनी त्यांचा पराभव करीत "असं वागणं बरं नव्हं' अशी अद्दल घडविली.

काहीही घडू शकते?
युतीला बहुमत मिळाले तरी काहीही घडू शकते. काठावरचे बहुमत नेहमीच धोकादायक असते. दोन जागा इकडच्या तिकडे झाल्यास सत्ता बदलते. गेल्यावेळी भाजपच्या दोघांनी ही किमया घडवून आणली. शिवाय, शिवसेनेचे 1997 मध्ये 4 सदस्य असताना अध्यक्षपद मिळाले होते. रत्नमाला पाटील या अध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. जिल्हापरिषदेत 59 सदस्यच असल्याने तसेच बहुमतासाठी "दोन' हा मॅजीक आकडा असल्याने 21 मार्चला काय होईल, याकडे सर्वांच्याच नजरा आहेत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: