Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

खुर्चीवर बसणाऱ्या पंजात कोण?
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 19, 2012 AT 12:45 AM (IST)
गडचिरोली - गडचिरोली जिल्हापरिषदेच्या शुक्रवारी (ता. 17) जाहीर झालेल्या निकालानंतर जिल्हापरिषदेवर कॉंग्रेसच्या पंजाची पकड घट्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हापरिषदेच्या सर्वाधिक 14 जागांवर कॉंग्रेसचा पंजा उभा राहिला आहे. पण, सत्ताप्राप्तीसाठी त्यांना अद्याप 12 जागांची आवश्‍यकता आहे. त्यात 9 जागा पटकाविणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि 8 जागा पटकावणारा भारतीय जनता पक्ष हे दोन पर्याय कॉंग्रेसपुढे आहेत. त्यामुळे जिल्हापरिषदेच्या सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्या पंजाच्या हातात आता घड्याळ राहणार की कमळ, यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

51 जागा असलेल्या गडचिरोली जिल्हापरिषदेत माओवाद्यांमुळे कोरची तालुक्‍यात निवडणूकच झाली नाही. त्यामुळे 49 जागांच्याच लढती झाल्या. या 49 पैकी कॉंग्रेसने सर्वाधिक 14, राष्ट्रवादी कॉंग्रेसने 9, भारतीय जनता पक्षाने 8, शिवसेना दोन, नागविदर्भ आंदोलन समिती 4, आमदार आत्राम यांचा आदिवासी विद्यार्थी संघ तीन, युवाशक्‍ती पाच, भारतीय कम्युनिस्ट पार्टी एक व तीन अपक्ष निवडून आले आहेत. कॉंग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विचार केला, तर त्यांना केवळ अन्य तीन सदस्यांची आवश्‍यकता राहील. आमदार दीपक आत्राम हे कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे या सत्ता समीकरणात त्यांचे तीन सदस्य मिळविले, तर सहज सत्तेचा मार्ग मोकळा होतो. पण, हे इतके सोपे नाही. कारण, आता सत्तास्थापनेपेक्षा पद वितरणाचे खरे आव्हान राहणार आहे. जास्त जागा कॉंग्रेसकडे असल्याने अध्यक्षपद कॉंग्रेसच्याच वाट्याला जाईल.

सध्या खासदार मारोतराव कोवासे यांच्या गटाचे केसरी उसेंडी यांचे नाव शर्यतीत पुढे आहे. पण, गडचिरोलीचे प्रथम जिल्हापरिषद अध्यक्ष तथा माजी आमदार पेंटारामा तलांडी यांच्या नावालाही पसंती मिळू शकते. कॉंग्रेसमधून कोणाचे नाव पुढे येते याचे तर्कवितर्क सुरू असताना उपाध्यक्षपदाचेही आव्हान राहणार आहे.
कॉंग्रेसकडून माजी जिल्हापरिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार यांची दावेदारी पक्‍की राहू शकते. त्यांना पक्षातून बरेच समर्थनही आहे. पण, आघाडी करून सत्तेत बसताना कॉंग्रेसला उपाध्यक्षपद दुसऱ्या पक्षासाठी सोडावे लागेल. त्यामुळे कॉंग्रेसने घड्याळ जवळ केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांचे नाव पुढे येऊ शकते, तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांचे नाव सुचविण्यात येऊ शकते. पण, अतुल गण्यारपवारच अधिक दावेदार मानले जातात. मात्र, त्यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधूनही विरोध असल्याचे कळते. त्यातही काही कॉंग्रेस नेत्यांशी त्यांचे शत्रुत्व सर्वश्रुत आहे. त्यामुळे श्री. गण्यारपवार यांना टाळण्यासाठी कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्तेच्या खुर्चीत विराजमान होण्याचे टाळणार, असा अंदाज व्यक्‍त होत आहे. कदाचित राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा एका जागेने कमी असणाऱ्या भाजपसोबतही कॉंग्रेस सत्तारूढ होऊ शकते. कॉंग्रेसमधीलच काहीजण दबक्‍या आवाजात अशी चर्चा करीत आहेत.

मागील नगरपालिका निवडणुकीत अचानक मुसंडी मारणाऱ्या युवाशक्‍तीला या निवडणुकीत केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यातील सुरेंद्रसिंह चंदेल यांचेच अधिक उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या जोडीला युवाशक्‍तीला कॉंग्रेस जवळ करू शकते.

युवाशक्‍तीचे संस्थापक बंटी भांगडिया यांची कॉंग्रेसचे वडेट्टीवार यांच्याशी असलेली दुष्मनी जगजाहीर आहे. पण, सत्तेच्या राजकारणात कुणीच मित्र किंवा शत्रू नसतो. त्यातही मागील नगरपालिका निवडणुकीत श्री. वडेट्टीवार यांचा उजवे हात समजले जाणारे बंडू शनिवारे यांचा दारुण पराभव झाला होता. तर, या निवडणुकीत त्यांचे बंधू सुनील वडेट्टीवार यांचा पराभव झाला. त्यामुळे हा गट बऱ्यापैकी कमकुवत झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. म्हणून कॉंग्रेसच्या हातात युवाशक्‍तीची आवळलेली मूठ येऊ शकते. केवळ भाजपच्या आठ, आदिवासी विद्यार्थी संघाचे तीन मिळून एक अपक्ष सदस्य मिळविला, तरी कॉंग्रेसला जिल्हापरिषदेचे सिंहासन मिळणार आहे. असे अनेक पर्याय कॉंग्रेस नेतृत्वापुढे आहेत. आता कॉंग्रेसचा पंजा राष्ट्रवादीच्या घड्याळाला हाती घेणार की भाजपच्या कमळाला धरणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

घड्याळाचे काटे फिरले उलटे
मागील निवडणुकीत तब्बल 23 जागा पटकाविणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घड्याळाचे काटे यंदा उलटे फिरल्याने त्यांना सत्तेचा स्वाद मिळण्याची शक्‍यता धूसर झाली आहे. या पक्षाचे नेते आर. आर. पाटील राज्याचे गृहमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण, त्यांना जिल्ह्यात पक्षाला यश मिळवून देता आले नाही. अतिशय भावनिक भाषणांसाठी परिचित असलेले श्री. पाटील यांना येथील जनतेच्या काळजाला हात घालून मतांचे दान मिळविता आले नाही.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: