Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

राष्ट्रवादी कॉंग्रेसची पीछेहाटच!
प्रसाद आळशी - सकाळ वृत्तसेवा
Monday, February 20, 2012 AT 12:00 AM (IST)
ठाणे - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रथम क्रमांक पटकावला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे; मात्र या निवडणुकीत तालुकानिहाय कामगिरीचा विचार केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसची काही ठिकाणी पीछेहाट झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याऐवजी कुणबी सेना व श्रमजीवी संघटनेला मदतीला घेतले. या संघटनेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणुकीत उतरले. त्याचा या निवडणुकीत पक्षाला फायदा झाला. पक्षाचे संख्याबळ 22 वरून 26 पर्यंत गेले.

बिगरआदिवासी क्षेत्रात आदिवासींसाठी आरक्षण पडल्याने सर्वच पक्षांची उमेदवारांसाठी दमछाक झाली. भिवंडीत श्रमजीवी संघटनेने शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी केली; अन काल्हेर, खारबाव, खोणी आणि कोन गटामध्ये श्रमजीवी संघटनेचे उमेदवार घड्याळावर निवडून आले. कुणबी सेनेच्या कार्यकर्त्यांनी बिरवाडी, पालसई आणि माण जागांवर यश मिळविले. श्रमजीवी-कुणबी सेनेचे सात सदस्य राष्ट्रवादीच्या कळपात असतील; मात्र ते ध्येयधोरणे त्यांच्या संघटनेचीच राबवतील, हे निश्‍चित. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटनास्तरावरील अपयश दुर्लक्षित करण्यासारखे नाही. विशेषतः शिवसेना-भाजप युतीची स्थिती नाजूक असतानाही पक्षाला बहुमत सोडाच 30 जागांचा टप्पाही गाठता आला नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मुरबाडमध्ये सर्वाधिक गटबाजी आहे. आमदार किसन कथोरे व माजी आमदार गोटीराम पवार यांच्यात तीव्र मतभेद आहेत. त्यात सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचेही स्वतंत्र अस्तित्व आहे. या तिन्ही नेत्यांमधील मतभेदांचा पक्षाला फटका बसण्याची भीती होती; मात्र पालकमंत्री गणेश नाईक यांनी कुशलतेने परिस्थिती हाताळून तिन्ही नेत्यांना एकत्र ठेवल्याने पक्षाला मुरबाड तालुक्‍यात एकहाती यश मिळाले; मात्र जव्हार तालुक्‍यात कासटवाडी येथे गटबाजीचा फटका बसल्याने पदाधिकारी भरत पाटील यांच्या पत्नीलाच एबी फॉर्म दिला गेला नाही. तेथे बंडखोरी करून कल्पना पाटील यांनी विजय मिळविला. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना पाठिंब्याची विनंती करावी लागली.

अंबरनाथमध्ये पक्षाने अव्वल कामगिरी बजावून सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. प्रतिकूल परिस्थितीतही कल्याणमध्ये पक्षाला समाधानकारक यश मिळाले; मात्र शहापूर व डहाणूतील कामगिरी समाधानकारक नाही. पंचायत समितीच्या स्तरावर पक्षाची काहीशी पीछेहाट झाली. 2007 मध्ये तेरापैकी चार तालुक्‍यांमध्ये पक्षाचे वर्चस्व होते. मुरबाड, अंबरनाथ, वाडा आणि डहाणूत पक्षाची सत्ता होती; मात्र आता केवळ मुरबाड व अंबरनाथमध्येच एकहाती सत्ता मिळाली. डहाणूत राष्ट्रवादीला मार्क्‍सवाद्यांबरोबर घरोबा करावा लागेल. भिवंडीमध्ये पक्षाला प्रथमच सर्वाधिक जागा मिळाल्या. समाजवादी पक्षाच्या एका सदस्याचा पाठिंबा गृहीत धरला, तरी मनसेच्या पाठिंब्यावर सत्ता अवलंबून असेल. विक्रमगडमध्ये प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीन जागा मिळविल्या. तेथे भाजपच्याही तीन जागा असल्याने सत्ता ही नशिबावर अवलंबून राहणार आहे. वाड्यातही अशीच स्थिती असून युती व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी चार जागा आहेत. एकंदरीत या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बळ वाढलेले दिसत असले, तरी त्यात अन्य संघटनांचाच मोठा सहभाग आहे.

कॉंग्रेस पराभवाचा आनंद
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ग्रामीण भागातील नेत्यांना कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल्याचाच सर्वाधिक आनंद झाला आहे. राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर राजेंद्र गावित यांनी उद्‌घाटनांचा धडाका लावत कॉंग्रेस वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी काही ठिकाणी जिल्हा परिषदेअंतर्गत कामांचीही उद्‌घाटने केली. या प्रकारातून गावित यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांबरोबर खटके उडाले. या निवडणुकीत पालघर व डहाणूत कॉंग्रेसच्या उमेदवारांचा सफाया झाला. केवळ कॉंग्रेसला वाणगावची जागा जिंकता आली. आता आगामी विधानसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघात गावितांची कोंडी करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न असेल, हे निश्‍चित.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: