Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

"मनसे'च्या जादुई किल्लीने सत्ता काबीज करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या हालचाली!
दुर्गादास रणनवरे - सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 21, 2012 AT 12:45 AM (IST)
औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जादुई किल्लीच्या साह्याने औरंगाबाद जिल्हा परिषदेत सत्ता काबीज करण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. शिवसेना-भाजप युतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी; तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसोबत सत्तेत सहभागी व्हावे, यासाठी श्री. थोरात पुढाकार घेत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

सरकारने कन्नड येथील हिराजी महाराज सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाला हमी देण्याची ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे; तसेच कन्नड येथील मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना दिल्यामुळे "मनसे' औरंगाबाद जिल्हा परिषदेत आघाडीसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याच्या वृत्ताला "मनसे'तील अधिकृत सूत्रांनीही दुजोरा दिला आहे.

शुक्रवारी (ता. 17) जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी झाली. कॉंग्रेस 16, राष्ट्रवादी कॉंग्रेस 10, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 8, शिवसेना 17, भारतीय जनता पक्ष 6, अपक्ष व आमदार प्रशांत बंब यांच्या आघाडीचे एकूण 3 उमेदवार विजयी झाले आहेत. मतदारांनी या वेळी युती किंवा आघाडीला स्पष्ट कौल न दिल्यामुळे जिल्हा परिषद त्रिशंकू अवस्थेत आहे. सत्ता काबीज करण्यासाठी युती किंवा आघाडीच्या नेत्यांना "मनसे'ला सोबत घेतल्याशिवाय
पर्याय नाही. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना-भाजप युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी युतीतर्फे महाराष्ट्र नव निर्माण सेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचे दावे, प्रतिदावे केले जात आहेत. दोन्ही गटांकडून सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे सबंध जिल्ह्याचे लक्ष मनसेच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे.

युतीबरोबर जाण्यात लाभ कमी
युतीसोबत सत्तेत सहभागी होऊन विशेष लाभ मिळणार नसल्याने आघाडीसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय मनसे नेतृत्वाने घेतल्याचेही या सूत्रांनी "सकाळ' शी बोलताना सांगितले. मनसेने जिल्हा परिषदेत सत्तेत सहभागी व्हावे यासाठी पालकमंत्री थोरात आग्रही आहेत. सत्तेत सहभागी झाल्यास "मनसे'चा प्रभाव असल्या राज्यातील एकमेव हिराजी महाराज सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाला हमी देऊन कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी; तसेच कारखान्याला नवसंजीवनी देण्याला शासनाने हिरवा कंदील दाखवल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले.

मनसेला दोन सभापतिपदेही मिळणार?
जिल्हा परिषदेत आघाडीसोबत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हिराजी महाराज सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज हमीसह दोन सभापतिपदांची मागणी केली आहे. मनसे-आघाडीने सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यास कॉंग्रेसकडे अध्यक्षपद व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे उपाध्यक्षपद जाण्याची शक्‍यताही सूत्रांनी वर्तविली आहे. आघाडीसोबत सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांच्याकडे गेला असून ते लवकरच या विषयी भाष्य करतील, असा दावाही सूत्रांनी "सकाळ'शी बोलताना केला.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: