Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

राजकारणातील भाऊबंदकीवरून सिरसाळा गट राज्यभर चर्चेत
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, February 22, 2012 AT 12:00 AM (IST)
सिरसाळा - सिरसाळा जिल्हा परिषद गट या निवडणुकीत राज्यभर चर्चेत आला. दोन हजार लोकसंख्या असलेल्या हिवरा गावचे सरपंच व सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील वृक्षराज निर्मळ हा कार्यकर्ता भाजपकडून साडेतीन हजारांवर मतांनी निवडून आल्याने तालुक्‍यात पुन्हा एकदा लोकांनी खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाला बळकटी दिली. ज्येष्ठ बंधू व राष्ट्रवादीचे नेते पंडितअण्णा मुंडे यांनी वेगळी चूल मांडली, पण त्यांना या गटातून पराभवाला सामोरे जावे लागले.

पंडितअण्णा मुंडे गेल्या दहा वर्षांपासून सिरसाळा गटाचे सदस्य होते. याआधी गाढे पिंपळगाव गटातूनही त्यांनी पाच वर्षे सदस्य म्हणून काम केले. जिल्हा परिषदेचे ते अध्यक्षही होते. अण्णांनी यंदा राजकीय सवतासुभा घेतल्याने जिल्ह्यात खासदार मुंडे यांच्याविषयी सहानुभूतीची लाट आली. याचाच फायदा म्हणून परळी-अंबाजोगाई तालुक्‍यांत अपवाद वगळता सर्वच ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली. सिरसाळा जिल्हा परिषद गटात मतांची टक्केवारी 67 टक्‍क्‍यांपर्यंत गेली. एकीकडे दिग्गज तर दुसरीकडे सर्वसामान्य कार्यकर्ता अशा लढतीमुळे माहीत नसलेले सिरसाळा गाव राज्यभर पसरले. दहा वर्षांत या भागाचा दुर्लक्षित विकास, लोकांमधील नाराजी, पक्षाशी सोडचिठ्ठी, आरक्षण मुद्दा, दुहेरी निष्ठा असणारे कार्यकर्ते, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या सभांचा अभाव व भूमिका बदललेले आमदार धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी एकटे पाडण्याचा प्रयत्न केल्याने पंडितअण्णांना पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी जिल्हा परिषद गटात गावोगाव मोठ्या सभांना मिळणारा प्रतिसाद, आमदार पंकजा मुंडे (पालवे) यांचा खेडोपाडी वाढता जनसंपर्क, भावनिक आवाहन, युवक व मराठा लॉबीचा उमेदवार यासह वंजारी, इतर मागासवर्गीयांचा पाठिंबा मिळाल्याने महायुतीचा विजय झाला. सिरसाळा, रेवली, जयगाव, पोहनेर या गावांतून आता हे सर्कल विकासासाठी मुंडेंनी दत्तक घेतले आहे. यापुढे रस्त्याचे विशेषतः हा पोहनेर - सोनपेठ - मोहा ही प्रमुख रस्त्यांची कामे दर्जेदार करणार असल्याचे ठोस आश्‍वासन त्यांनी दिले. यासह या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न, पाणीप्रश्‍न, उसाचा भाव या विकासकामांना प्राधान्य यामुळे मतदारांच्या आशा वाढल्या. मात्र, पुढील काळात यातील कामे कितपत होतात, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

1997 ची पुनरावृत्ती
सिरसाळा जिल्हा परिषद गटात 1997 या वर्षी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष व राष्ट्रवादीच्या उमेदवार ऍड. उषा दराडे यांचा स्थानिक भाजपचे कार्यकर्ते बालासाहेब काळे यांनी 900 मतांनी पराभव केला होता. यंदा याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे मतदारांत बोलले जात होते. तेव्हाही अशीच प्रतिष्ठेची व अटीतटीची निवडणूक झाली होती.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: