घरकुल गैरव्यवहारातील संशयितांवर उगारली चप्पल
-
Wednesday, February 22, 2012 AT 04:15 AM (IST)
जळगाव - घरकुल गैरव्यवहारात अटकेत असलेल्या चारही संशयितांना न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर परत नेत असताना एका तरुणाने संशयितांच्या दिशेने चप्पल उगारून धाव घेतल्याची घटना घडली. पोलिसांनी तत्काळ त्यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव नगरपालिकेच्या बहुचर्चित घरकुल गैरव्यवहारात तत्कालीन उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष प्रदीप रायसोनी, खानदेश बिल्डरचे संचालक नाना वाणी, राजा मयूर, मुख्याधिकारी पी. डी. काळे यांच्या चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आज संपली. चौघांना दुपारी न्या. व्ही. एस. दीक्षित यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची पुन्हा चौदा दिवसांच्या कोठडीत रवानगी केली. न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर पोलिस वाहनात बसवीत असतानाच शनिपेठ येथील रहिवासी दीपक पंडित माळी (वय-32) या तरुणाने हातात चप्पल घेत चौघांच्या दिशेने धाव घेतली. या वेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यास तत्काळ ताब्यात घेतले. शहर पोलिस ठाण्यात दीपक माळी याच्यावर शांतताभंग, न्यायालयात अनाधिकाराने प्रवेश केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चप्पल फक्त उगारली
'रोज वृत्तपत्रातून भ्रष्टाचार व गोरगरिबांच्या घरकुलांत गैरव्यवहार केल्याचा राग आल्याने मी चौघांना केवळ चप्पल दाखविली; मारली नाही' असेही त्याने बोलताना सांगितले.