Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

नाटकातून अवतरणार 'शिवरायांचे रूप'
-
Thursday, July 19, 2012 AT 01:00 AM (IST)
भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे 22 रोजी प्रयोग

पुणे- "कट्यार काळजात घुसली', "संशय कल्लोळ', "हे बंध रेशमाचे' व "संगीत शारदा' यांसारख्या रसिकप्रिय संगीत नाटकांची निर्मिती करणाऱ्या भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे तब्बल वीस वर्षांनंतर "शिवरायांचे आठवावे रूप' हे ऐतिहासिक नाटक तयार करण्यात आले आहे. 22 जुलै रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग भरत नाट्य मंदिरामध्ये होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची विविध रूपे अनेक प्रसंगांमधून या नाटकामध्ये दाखविण्यात येणार आहेत. नाटकासाठी हृकीकेश परांजपे यांची संहिता असून, संजय डोळे यांनी दिग्दर्शन केले आहे, अशी माहिती नाटकाचे निर्मितीप्रमुख व अध्यक्ष विजय वांकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी दीपक रेगे, दादा पासलकर, संजय डोळे व हृषीकेश परांजपे उपस्थित होते.

वांकर म्हणाले, ""इतिहासातल्या घटनांचा आधार घेऊन लिहिलेल्या प्रसंगांची नाट्यमय गुंफण नाटकात आहे. या प्रसंगांचा क्रम कालानुरूप नसला, तरी त्यातील नाट्याद्वारे प्रसंगांची मांडणी करण्यात आली आहे. तानाजीच्या वीरमरणानंतर राजांचे त्यांच्या घरी सांत्वनासाठी जाणे, शहाजीराजे व शिवाजी महाराज यांची भेट, शिवाजी महाराजांनी जिजाऊंना सती जाऊ न देणे, असे विविध प्रसंग नाटकामध्ये आहेत. हे नाटक महाराष्ट्रभर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.''

नाटकात दहा गाणी, तसेच जसराज जोशी यांनी गायलेल्या कव्वालीचाही समावेश आहे. शिवाजी महाराजांची भूमिका दीपक रेगे करीत असून, लीना गोगटे यांनी जिजाऊंची भूमिका साकारली आहे. आनंद पानसे, दादा पासलकर, आशुतोष नेर्लेकर, विश्‍वास सहस्रबुद्धे आदी कलाकारांच्या नाटकामध्ये भूमिका आहेत. राजा पितळे व मोहन जोशी यांनी सूत्रधाराची भूमिका पार पाडली आहे.

भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे करण्यात येत असलेल्या "शिवरायांचे आठवावे रूप' या नाटकाची तालीम करताना कलाकार.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: