Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

झपाटलेलं "आनंदाचं झाड'
-
Friday, September 28, 2012 AT 02:00 AM (IST)
Tags: editorial

संजय सूरकरांच्या अकाली जाण्यानं मराठी चित्रपटसृष्टीतला एक धडपड्या दिग्दर्शक गेला आहे. दिग्दर्शक म्हणून लौकिक व स्वतःचं एक स्थान मिळवल्यानंतरही आपल्या प्रत्येक चित्रकृतीमधून वेगळेपणा असावा ही त्यांची धडपड- नव्हे ध्यासच! "चौकट राजा' या पहिल्याच चित्रपटातून त्यांची "चौकटी'बाहेरची अभिरुची प्रत्ययी आली. राज्याबरोबर राष्ट्रीय पातळीवरही त्यांची पदार्पणातच नोंद घेतली गेली. त्यांची कारकीर्द संख्यात्मक व गुणात्मकदृष्ट्याही मोठीच होती. विषयांच्या वैविध्याबरोबरच आपल्या शैलीतही ताजेपणा, वेगळेपणा ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या शेवटच्या चित्रपटापर्यंत कायम होता. "चौकट राजा' झाला 1991 मध्ये. म्हणजे अखंड दोन दशकांची त्यांची वाटचाल मराठी चित्रपट (व टीव्ही) आपल्यापरीनं समृद्ध करू पाहणारीच होती. नागपूरच्या नाट्य चळवळीचे संस्कार व नाट्यशास्त्रातलं शिक्षण बरोबरीनं घेऊन त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेतून सुरवात केली." वंश', "बॉन्साय,' "नो एक्‍झिट,' "द वॉल'... अभिनय किंवा दिग्दर्शनातल्या त्यांच्या सहभागाची ही नाटकं त्यांना "वेगळेपणा'चं भान देणारी ठरली. पुढे मुंबई मुक्कामी पोचल्यावर "चाफा बोलेना' किंवा "तू फक्त हो म्हण' वगैरे व्यावसायिक नाटकं पोटापुरती केलीही; पण तो त्यांचा पिंड नव्हताच. "नो प्रॉब्लेम' या पहिल्या टीव्ही मालिकेच्या निमित्तानं कॅमेऱ्याशी जोडलं गेलेलं नातं खुळावून त्यांना चित्रपटांच्या दिशेनं ओढू लागलं. सुदैवानं "कळत नकळत' ही अशी संधी मिळाली, जिथं कांचन नायकांसारखा तंत्र व आशयाची जाण असणारा दिग्दर्शक होता. या उमेदवारीनंतरच स्मिता तळवलकरांकडून मिळालेल्या "चौकट राजा'नं त्यांना त्यांची ओळख दिली.

त्यानंतर "आपली माणसं', "यज्ञ', "रावसाहेब' ही यशाची व कर्तृत्वाची चढती कमान होती. वेगळे विषय निवडून त्याची व्यावसायिक पद्धतीनं मांडणी करणं हा मंत्र त्यांना गवसला. जब्बार पटेल, अमोल पालेकर, राजदत्त या दिग्गजांनी आशयघन व वेगळ्या मांडणीचे चित्रपट देऊन ही अभिजात वाट प्रशस्त करून ठेवली असली, तरी त्यांचा वेग मंदावला होता आणि एकूणच मराठी चित्रपटांना मरगळ ग्रासून टाकत होती, अशा "कठीण समयी' सूरकरांनी हा झेंडा पडू दिला नाही, हे त्यांचं सगळ्यात मोठं श्रेय!

साहित्याची उत्तम जाण व सजग सामाजिक, राजकीय भान ही त्यांची बलस्थानं होती. सशक्त संहिता, समर्थ अभिनेत्यांची निवड व उच्च निर्मितिमूल्ये याबाबतीत तडजोड न करता "सूरकरांचा सिनेमा' ही दर्जाची विश्‍वासार्हता देणारी स्वतंत्र संज्ञा त्यांनी निर्माण केली. "सातच्या आत घरात', "घराबाहेर', "तू तिथं मी', "सखी', "आनंदाचं झाड', "आई शप्पथ', "सुखान्त', "तांदळा'... असा हा श्रीमंत ठेवा आहे. टीव्हीसारख्या "टीआरपी'वर जगणाऱ्या माध्यमातही "साळसूद', "राऊ', "पेशवाई', "नंदादीप', "ऊनपाऊस'सारखं त्यांनी वेगळं करून पाहिलं व "अवंतिका'सारखी "सुपरहिट'ही दिली! कधी संवेदनशीलतेला...तरी काही आनंदाच्या घडी देणाऱ्या या कलावंताला मराठी मन सहजी विसरणार नाही.
राज काझी
प्रतिक्रिया
On 28/09/2012 05:31 PM subhash inamdar,Pune said:
चौकटीतून दिसणारा चौकटीत ठिपके पहाणारा डोळ्यासमोर चौकट धरुन पहाणारा.. चौकट राजा गेला... चौकट रिती झाली..उरली केवळ..एक छबीच..
On 28/09/2012 01:42 PM prashant said:
मराठी चित्रपट श्रुष्टी खर्या अर्थाने समृद्ध करणारा प्रतिभावंत दिग्दर्शक गेला !! सातच्या आत घरात ,राऊ या त्यांच्या कलाकृती खूप छान आहेत. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
On 28/09/2012 10:31 AM harshad said:
आनंदाचं झाड चित्रपट खरंच खूप छान आहे..... we will miss you....
On 28/09/2012 08:04 AM ankur said:
संजय सुरकर हे एक उत्तम दिग्दर्शक होते. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा वेगळ्या धाटणीचा आणि कायम लक्षात राहणारा असायचा. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
On 28-09-2012 06:48 AM kdchitnis said:
बेसुरांच्या जगातील "सूर" हरपला, आता पुन्हा "वाट" पाहणे नशिबी आले! सूरकरांनी छेडलेली तार सक्षमतेने "वाजवणारा" भेटेल का? सूरकरांना श्रद्धांजली.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: