Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी चौघांची रस्सीखेच
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, October 02, 2012 AT 12:30 AM (IST)
चिपळूण - 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चार साहित्यिक निवडणुक रिंगणात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार आहे. ही निवडणूक चौरंगी होणार असून त्यासाठी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने हे संमेलन सुरू होण्यापूर्वीच गाजू लागले आहे. त्यातच अनेक मतदारांना पोस्टाने पाठवलेल्या मतपत्रिका न मिळाल्याने गोंधळात भर पडली आहे.

ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे, नागनाथ कोतापल्ली, शिरीष गोपाळ देशपांडे आणि अशोक बागवे हे चिपळूण येथे होणाऱ्या 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूकीच्या रिंगणात आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरवात झाल्यापासून साहित्य संमेलनापेक्षा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सर्वाधिक चर्चा राज्यभरात झाली. मराठी भाषा आणि नव साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याची आमिषे दाखवली गेली. एकमेकांवर आरोप करण्यापासून "अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हावी की नको' हा विषय उमेदवारांमध्ये चर्चेत राहिला. ह. मो. मराठेंसह अन्य उमेदवारांनी अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीला विरोध केला. अध्यक्षपद हे मानाचे असल्यामुळे सन्मानाने मिळावे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली; मात्र मराठेंनी आपल्या पत्रकात जातियवादाला खतपाणी घातल्यामुळे संभाजी ब्रिगेडने त्यांच्या पत्रकावर आक्षेप घेतला. नंतर पुणे येथे त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटकही झाली. संमेलनाचे दुसरे उमेदवार श्री. देशपांडे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे समर्थन करत ह. मो. मराठे यांनी केलेल्या जातीय उल्लेखाचा निषेध केला. गेल्यावर्षी चंद्रपूर येथे 85 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. ज्येष्ठ साहित्यिक वसंत डहाके यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यावेळी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही अध्यक्षपदासाठी निवडणूक या विषयावर बरीच चर्चा झाली होती. सध्या आरोप-प्रत्यारोप थांबले आहेत. निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरवात झाल्यानंतर 1 हजार 64 मतदारांना मतपत्रिका पोस्टाने पाठविण्यात आल्या आहेत; मात्र अनेक मतदारांना अद्याप मतपत्रिकाच मिळालेल्या नाहीत. अशी तक्रार त्यांनी पुणे येथे गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत केली. मतदार यादीतील अनेक मतदारांचे निधन झाले आहे. त्यामुळे 700 पर्यंत मतदान होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 30 ऑक्‍टोबरपर्यंत मतपत्रिका साहित्य परिषद महामंडळाच्या मुंबईतील कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर 1 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन अध्यक्ष जाहीर केला जाणार आहे.


संमेलनपूर्व कार्यक्रम आजपासून
86 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर संमेलनपूर्वी कार्यक्रमांची रेलचेल आज (ता. 2) ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. रत्नागिरी येथील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकामध्ये पहिला कार्यक्रम होईल. संगीतकार कौशल इनामदार, कलादिग्दर्शक नितीन देसाई आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्ष माधवी वैद्य हे उपस्थित राहणार आहेत. येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे पुढील वर्षी शतकोत्तर सुवर्णमहोत्सव वर्ष साजरा करण्यात येणार आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: