Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

राजू शेट्टींना मुख्यमंत्र्यांचे 'आवतन'

-
Friday, November 22, 2013 AT 04:00 AM (IST)

सांगली - ऊस दराच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांना निमंत्रण दिले आहे. सरकारचे हे पहिले पाऊल असून मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात शनिवारी (ता. 23) ला सकाळी साडेनऊ वाजता ही बैठक होणार आहे. दरम्यान, या प्रश्‍नावर केंद्राआधी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी श्री. शेट्टी यांनी केली आहे.

ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 24 नोव्हेंबरपर्यंतची डेडलाईन दिली आहे. अन्यथा, 25 ला कऱ्हाड येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. त्याआधी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा, हुतात्मा, केन ऍग्रो या कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला. परिणामी, आंदोलन पेटले. गाड्यांच्या टायरी फोडणे, ऊस रोखून धरणे, तोडणी कामगारांना पिटाळून लावण्याचे प्रकार झाले. राज्यातील 79 कारखान्यांचे गाळप सध्या सुरू असले तर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अजून कोयता पडलेला नाही. शिवाय, ऊस दराच्या तोडग्याबाबत शेतकरी आणि कारखानदारांचेही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या निर्णयाकडे डोळे लागले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर या बैठकीला अत्यंत महत्त्व असून त्यात तोडगा निघेल, अशीच अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने आज राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधून शनिवारच्या बैठकीचे निमंत्रण दिले. श्री. शेट्टी म्हणाले, ""तोडगा अगदी दृष्टिपथात आलेला आहे. सरकारला ठोस भूमिका घ्यावीच लागेल. काही कारखानदारांनी गाळप सुरू केले असले तरी शेतकरी तोडी स्वीकारत नाहीत. "स्वाभिमानी'ने आदेश दिल्याशिवाय सामान्य शेतकरी तोड घेत नाही. परिणामी, कितीही ढोल वाजवून हंगाम सुरू केला तरी काय स्थिती झालीय, सारे जाणतात.''

या मुद्द्यांवर चर्चा व्हावी
खासदार राजू शेट्टी यांनी यंदा उसाला पहिली उचल 3 हजार रुपये मिळावी, यासाठी काही मुद्दे हाती घेतले आहेत. शनिवारच्या बैठकीत त्यावर चर्चा व्हावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. ते असे -
* उसाचा परचेस टॅक्‍स हटवल्यास 140 रुपये मिळतात
* एक्‍साईजचे बिनव्यापी कर्ज मिळाल्यास टनास 125 रुपये
* साखरेचे मूल्यांकन सरासरी दरावर 3 हजार रुपये करा
* राज्य बॅंकेकडून कारखान्यांना 90 टक्के उचल द्यावी
* भाव टिकून ठेवण्यासाठी केंद्राने भूमिका ठरवावी
* 20 लाख टन साखर निर्यात करा, 500 रुपये अनुदान द्या
* 30 टक्के इथेनॉलसाठीचे धोरण ठरवा

शिल्लक साखरेची भीती नको
खासदार राजू शेट्टी म्हणाले, 'देशात सध्या 80 लाख टन साखर शिल्लक आहे. त्याची भीती घालू नका. कारण, 2009 ला 125 लाख टन साखर शिल्लक होती. त्यावर्षी 275 लाख टन उत्पादन झाले. यावर्षी स्थिती त्यातून चांगली आहे. यंदा 255 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. 20 लाख टन निर्यात केली तर विदेशी चलन चांगले मिळेल. विदेशातील साखर दर कमीच असले तरी रुपया घसरलेला असल्याने तोही परवडू शकतो.''
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: