Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

सामाजिक जागृती करणाऱ्या चित्र प्रदर्शनाला रत्नागिरीत प्रतिसाद

- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, February 12, 2014 AT 01:15 AM (IST)
Tags: ratnagiri,  konkan,  civil issue
रत्नागिरी : व्यसनमुक्ती, वृक्षलागवड, प्रौढ साक्षरता, ग्रामस्वच्छता, स्त्री-मुक्ती, वैद्यकीय शिबिरे याद्वारे नानासाहेब धर्माधिकारी आणि कुटुंबीयांनी सामाजिक जागृतीचे कार्य केले. या कार्याच्या बोलक्‍या चित्रांचे प्रदर्शन रत्नागिरीजवळ नाचणे येथे भरले असून त्याला जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. दररोज बारा हजारपेक्षा अधिक लोक प्रदर्शनाला येत आहेत. येत्या रविवारपर्यंत (ता. 16) प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

रेवदंडा (जि. रायगड) येथील धर्माधिकारी कुटुंबाच्या प्रत्येक पिढीने चारशे वर्षांपासून समाजजागृतीचे कार्य केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. नारायण विष्णू ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पश्‍चात त्यांचे पुत्र दत्तात्रय ऊर्फ अप्पासाहेब व नातू सचिन ऊर्फ दादासाहेब यांनी हा वसा पुढे नेला आहे. याचे चित्ररूपी प्रदर्शन नाचणे ग्रामपंचायतीच्या मागील पटांगणात कालपासून सुरू आहे.

नानासाहेबांचा जन्म 1922 मध्ये झाला. समाजातील अनिष्ट रूढींविरोधात त्यांनी 1943 पासून 2008 पर्यंत संत शिकवणुकीतून असंख्य लोकांना सन्मार्ग दाखवला. हेच कार्य लोकमनावर ठसविण्याची जबाबदारी पुढे अप्पासाहेब करत आहेत. गेल्या चार दशकांपासून अप्पासाहेब समाजजागृतीचे कार्य समर्पित वृत्तीने करत आहेत. दादासाहेबसुद्धा या जागृतीच्या कार्यात उत्साहाने व समर्पित भावनेने सहभागी झाले आहेत. अशा प्रकारे धर्माधिकारी कुटुंबाचे जनजागृतीचे कार्य कोट्यवधी लोकांपर्यंत पोचले आहे.

धर्माधिकारींच्या सभेसाठी लाखोंची गर्दी होत असे. त्यांच्या कार्याने लोक प्रभावित होत. त्यांचे हेच कार्य चित्रांच्या माध्यमातून गावोगावी पोचण्यासाठी प्रदर्शन भरवले आहे. यापूर्वी हे प्रदर्शन मुंबईत जहॉंगीर आर्ट गॅलरी, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नाशिक, पेण येथे भरवले आहे. प्रदर्शनाला होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रत्येक तालुक्‍याला दिवस ठरवून दिला आहे.

धर्माधिकारी प्रतिष्ठानने राष्ट्रीय एकात्मता, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यपुरवठा, नदी, सरोवरांची स्वच्छता, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्रे, मुंबई शहरात स्वच्छता, श्रवणयंत्र वाटप, बस थांबे, अपंगांना मदत, संसारोपयोगी साहित्यवाटप अशी विविध कार्ये केली आहेत.
त्याचे दर्शन घडविणाऱ्या या प्रदर्शनात माणसाने निसर्गाकडे केलेले दुर्लक्ष पर्यावरणाच्या असमतोलाला कसे कारणीभूत आहे, हे दाखविण्यात आले आहे. निसर्गाकडून आपल्याला जे मिळाले आहे, ते त्याला परत देण्यासाठी प्रेरित करण्याचा संदेश डॉ. धर्माधिकारी यांनी दिला आहे. त्यामुळेच दरवर्षी वृक्षारोपण, संवर्धनाचे कार्य यशस्वीरीत्या राबविले जाते. याची बोलकी चित्रे येथे आहेत.
प्रतिष्ठानमार्फत आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या जीवनपद्धतीत योग्य बदल घडविले जात आहेत. समृद्ध जीवनाची मानसिकता त्यांच्यात रुजवली जात आहे. त्यातूनच सभोवतीचा परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्याचीही सुरेख चित्रे प्रदर्शनात लोकांच्या मनाचा ठाव घेत आहेत.

 एसटीच्या जादा गाड्या

नाचणे येथे भव्य पटांगणावर भरलेल्या या सामाजिक जागृती चित्र प्रदर्शनासाठी दररोज एसटीच्या सुमारे वीस गाड्या आरक्षित केल्या आहेत. त्यातून एसटीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. एसटी गाड्यांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

अप्रतिम नियोजन
प्रदर्शनामुळे नाचणे गावाला जणू जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे; मात्र अप्रतिम नियोजनामुळे प्रदर्शन व्यवस्थितपणे सुरू आहे. हातखंब्यापासून शहरात विविध ठिकाणी स्वयंसेवक कार्यरत आहेत. नमस्कार करून प्रदर्शनाला कोठे, कसे जायचे, आदी माहिती ते देत आहेत. प्रदर्शनस्थळी प्रत्येक व्यक्तीची नावनोंदणी करून प्रवेश दिला जातो. येथील देवीच्या मंदिराच्या आवारात गाड्यांचे पार्किंग, नाचणे शाळेच्या आवारात दुचाकींचे पार्किंग अशी व्यवस्था आहे. तेथे तीनशेहून अधिक स्वयंसेवक कार्यरत आहेत.

प्रसन्न वातावरण

चित्र प्रदर्शनासाठी भव्य सेट उभारला आहे. नमस्कार करणारी ही सर्वच मंडळी येणाऱ्या-जाणाऱ्यांना विनम्र वागणूक देत आहेत. बैठक व्यवस्था, आकर्षक फुलांची आरास, झुंबरांची मांडणी केली आहे. प्रदर्शनाच्या मुख्य दालनात श्री गणेशाची मूर्ती व नानासाहेब धर्माधिकारींची प्रतिमा आकर्षक फुलांची आरास करून मांडली आहे.

बोलकी छायाचित्रे

ग्रामस्वच्छता मोहीम, नदी व सरोवरांची स्वच्छता, विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी शिक्षण केंद्र, हुंडाप्रथेचा अंत, स्त्री-मुक्ती, वैद्यकीय शिबिरे, मुंबईतील स्वच्छता मोहीम, श्रवणयंत्र वाटप, शुद्धजल यंत्र वाटप, बसथांबे बांधणे, अपंगांना मदत, संसारोपयोगी साहित्य वाटप, करिअरविषयक मार्गदर्शन इत्यादी उपक्रमांची बोलकी चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: