स्त्री संतुलन

स्त्री संतुलन

घराला घरपण देणारी, घरातील सर्व सदस्यांची देखभाल करणारी ही स्त्रीच असते.

सध्या तर स्त्रीला घरची आणि बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, यासाठी तिचे आरोग्य, तिची शक्‍ती, तिचे स्त्री संतुलन नीट असणे खूप महत्त्वाचे असते. आयुर्वेदात एक सूत्र आहे.

स्त्री हि रक्षति रक्षिता ।
....अष्टांगसंग्रह शारीरस्थान

स्त्रीचे रक्षण केले म्हणजेच तिच्या आरोग्याची नीट काळजी घेतली तर ती संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करते.

स्त्रीची विशिष्ट शरीररचना, गर्भाशयादी अवयव, मासिक पाळी वगैरेंच्या अनुषंगाने ती पुरुषांपेक्षा खूपच वेगळी असते आणि म्हणूनच तिच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यावश्‍यक असते. यामुळे स्त्रीआरोग्य या विषयाला आयुर्वेदशास्त्राच्या अष्टांगामध्ये वेगळे व विशेष स्थान आहे.

स्त्री आरोग्याचा आरसा म्हणजे प्रत्येक महिन्याला येणारी पाळी. पाळी योग्य वयात चालू होणे आणि नंतर ती नियमित येणे, हे स्त्री संतुलनाचे निदर्शक लक्षण असते.  पाळी येण्याची क्रिया रसधातूशी संबंधित असते. 

रसात्‌ रक्‍तं ततो स्तन्यम्‌ ।
...अष्टांगहृदय सूत्रस्थान


रसधातू संपन्न असला की पाळी वेळेवर आणि व्यवस्थित सुरू होते. वजन कमी असणाऱ्या किंवा अंगात कडकी असल्यामुळे रसधातू अशक्‍त असणाऱ्या मुलींना योग्य वयात पाळी येत नाही, असे दिसते किंवा प्राकृत कफदोषाची ताकद कमी पडली तर कफापासून  पित्तापर्यंतचे स्थित्यंतर लवकर होऊन पाळी कमी वयातच सुरू होते. मुलीच्या एकंदर शारीरिक, भावनिक, मानसिक आरोग्याच्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी अयोग्य होत. रसधातू संपन्न होण्यासाठी तसेच प्राकृत कफदोष व्यवस्थित राहण्यासाठी मुलींना सुरवातीपासून काळजी घेता येते. उदा., नियमितपणे चांगले म्हणजे शुद्ध म्हणजे रासायनिक प्रक्रिया न केलेले दूध पिणे. दुधामध्ये चैतन्य, शतावरीकल्पासारखा कल्प टाकणे. 

फळांचा रस ‘रसपोषक’ असतो. त्यामुळे प्रकृतीनुरूप फळांचा रस आहारात समाविष्ट करणे.

प्राकृत कफदोष हा धातूंच्या आश्रयाने राहतो अर्थात धातू जेवढे बळकट, स्थिर असतात तेवढा प्राकृत कफदोष चांगला असतो. त्यादृष्टीने वाढत्या वयात मुलींनी अंगाला तेल लावणे उत्तम असते. हाडांपर्यंत जिरण्याची क्षमता असणारे तेल असले की धातूंची ताकद वाढते, पर्यायाने पाळी लवकर सुरू होणे, पाळीच्या वेळेला खूप त्रास होणे वगैरे त्रास टाळता येऊ शकतात.

पाळी सुरू झाल्यानंतरही रसधातू व रक्‍तधातू संपन्न राहतील यासाठी प्रयत्न करायचे असतात. वात-पित्तदोष वाढणार नाही, यासाठी काळजी घ्यायची असते. पाळी अनियमित असणे, पाळीच्या वेळेला पोटदुखी, पाठदुखी वगैरे त्रास होणे, प्रमाणापेक्षा कमी रक्‍तस्राव होणे, गाठी पडणे, वजन वाढणे या सर्व गोष्टी वातदोषाच्या असंतुलनामुळे होत असतात, तर अंगावरून अधिक प्रमाणात जाणे, अठ्ठावीस दिवसांच्या आधीच पाळी येणे, केस गळणे, चेहऱ्यावर व त्वचेवर मुरमे-पुटकुळ्या येणे वगैरे त्रास पित्ताशी संबंधित असतात.

प्रजननाचे सामर्थ्य निसर्गाने स्त्रीला दिलेले आहे. स्त्रीचे सौंदर्य, स्त्रीमधील मार्दवता, घराला बांधून ठेवण्याची मानसिकता या सगळ्या तिच्या शक्‍तिस्वरूप असतात आणि या शक्‍तींचे रक्षण करणे, त्यांना वृद्धिंगत करणे स्त्रीच्या हातात असते. आहार-आचरणात काही चांगल्या सवयी लावल्या, स्त्री-संतुलनास मदत करणाऱ्या विशेष रसायनांचे सेवन केले, योग्य वेळी आवश्‍यक ते उपचार करून घेतले तर या 

शक्‍ती कायम राहणे शक्‍य आहे. आचरणाचा विचार करता सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रजोप्रवृत्तीच्या वेळेला विश्रांती घेणे. या संदर्भात सांगितले आहे, 

आर्तवस्रावदिवसात्‌ अहिंसाब्रह्मचारिणी ।
शयीत दर्भशय्यायां पश्‍चोदपि पतिं न च ।।
करे शरावे पर्णे च हविष्यं त्र्यहमाहवेत्‌ ।
अश्रुपातं नखच्छेदमभ्यंगं अनुलेपनम्‌ ।।
नेत्रयोरंजनं स्नानं दिवास्वापं प्रधावनम्‌ ।
अत्युच्चशब्दश्रवणं हसनं बहुभाषणम्‌ ।।
आयासं भूमिखननं प्रवातं च विवर्जयेत्‌ ।।
... भावप्रकाश


रजोदर्शन झाल्यावर मैथुन वर्ज्य समजावे, पतीपासून वेगळे झोपावे, आहार हलका व मोजका असावा, रडू नये, नखे कापू किंवा तोडू नयेत, स्नान (विशेषतः डोक्‍यावरून) करू नये, दिवसा झोपू नये, धावू नये, अतिशय मोठा आवाज ऐकू नये, फार बोलू नये, फार हसू नये, श्रमाची कामे करून नयेत, अंगावर वारा घेऊ नये. थोडक्‍यात, या दिवसात कोणत्याही प्रकारचा शारीरिक-मानसिक ताण येणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घ्यायला हवी. पूर्वीच्या काळी सांगितले जाणारे पाळीचे नियम हे स्त्रीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेच होते, हे यावरून लक्षात येते. 

पाळीचे आरोग्य नीट राहावे, पर्यायाने स्त्रीचे आरोग्य कायम राहावे, काही असंतुलन झाले असले तर ते बरे करणे यासाठी आयुर्वेदिक जीवनशैलीचा अवलंब करणे आणि साधे उपाय करणे याचा उत्तम फायदा होताना दिसतो. उदा. 

पाळीच्या दिवसात शक्‍य तेवढी विश्रांती घेणे, अतिश्रम, अतिताण निश्‍चित टाळणे, मन-बुद्धी उत्तेजित होईल असे वाचन, दर्शन टाळणे.
पाळीच्या चार दिवसांत स्वच्छतेच्या दृष्टीने जागरूक राहणे.
एकंदर गर्भाशयादी अवयवांना रक्षण व पोषणाच्या दृष्टीने ‘संतुलन फेमिसॅन तेला’सारख्या औषधसिद्ध तेलाचा पिचू, ‘संतुलन शक्‍ती धुपा’सारख्या औषधीद्रव्यांच्या मिश्रणाची धुरी वगैरे उपाय सुरू करणे. 
स्त्रीसंतुलनासाठी ‘संतुलन सुहृद तेला’सारखे विशेष औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले तेल स्तनांना लावणेही उत्तम असते. यामुळे स्तनांचे आरोग्य व सौंदर्य या दोन्ही गोष्टी नीट राहतात. 

रोज रोज बाहेरचे खाणे, सारखी जागरणे करणे टाळणे. 

 रसधातू व रक्‍तधातूच्या पोषणाच्या दृष्टीने आहारात दूध, मनुका, अंजीर, फळांचे रस, साळीच्या लाह्या, शतावरी कल्प, धात्री रसायन, ‘सॅनरोझ (शांती रोझ)’सारखे रसायन वगैरेंचा अंतर्भाव करणे. 

 स्त्री-संतुलनाच्या दृष्टीने योगासने व संगीत हेही अतिशय प्रभावी उपचार होत. फुलपाखरू क्रिया, ‘संतुलन समर्पण क्रिया’, मार्जारासन, ‘संतुलन अमृत क्रिया’, अनुलोम-विलोम श्वसनक्रिया, नियमित चालायला जाणे, ‘स्त्री संतुलन’ हे विशेष संगीत ऐकणे हे सर्व स्त्रीआरोग्य टिकून राहण्याच्या दृष्टीने उत्तम असतात. 

उत्तरबस्तीसुद्धा स्त्री संतुलनासाठी उत्तम असते. तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सिद्ध तेल व काढ्याच्या मदतीने उत्तरबस्ती घेता येते. खालून शक्‍ती धुपाची धुरी घेण्यानेसुद्धा जंतसंसर्ग मुळापासून बरा होण्यास, तसेच गर्भाशय, बीजाशयाच्या शुद्धतेस मदत होते. 

स्त्रीच्या आयुष्यातले सर्वांत अवघड स्थित्यंतर म्हणजे रजोनिवृत्ती, अर्थात पाळी थांबणे. पित्तावस्थेतून वातावस्थेत जातानाची ही स्थिती बहुतेक स्त्रियांसाठी अवघड असते. कारण, स्त्रीविशिष्ट बदलांना वात-पित्तदोषांच्या असंतुलनाची जोड मिळालेली असते. यातूनच अचानक घाम येणे, एकाएकी गरम होणे, भोवळ येणे, डोके सुन्न होणे, घाबरण्यासारखे वाटणे, नको नको ते विचार डोक्‍यात येणे, सांधे-कंबर-पाठ दुखायला लागणे वगैरे त्रास सुरू होतात. 

अगोदरपासूनच पाळीसंबंधी काळजीपूर्वक व्यवहार केला असला, गर्भाशयादी अवयवांना तेलाचा पिचू, धुरी वगैरेंच्या साहाय्याने निरोगी ठेवले असले तर रजोनिवृत्तीही सहजासहजी होऊ शकते. रजोनिवृत्तीची लक्षणे दिसू लागली की लवकरात लवकर स्त्रीसंतुलनासाठी पंचकर्म व उत्तरबस्ती करून घेणे सर्वांत चांगले असते. यामुळे स्त्रीविशिष्ट अवयवांची जीवनशक्‍ती वाढते व वात-पित्तदोषांचे संतुलनही साधता येते. 

थोडक्‍यात, स्त्रीने तिच्या स्त्रीत्वाची ओळख करून घेऊन, त्रास होण्याची वाट न पाहता सुरवातीपासूनच स्त्रीसंतुलनासाठी प्रयत्न केले, योग्य आहार-आचरणाला साध्या औषधयोजना, संगीत, योगासनांची जोड दिली तर तिला आरोग्य टिकवता येईल व स्वतःबरोबर संपूर्ण घराचेही रक्षण करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com