बालदमा 

asthma
asthma

वाढते प्रदूषण, कस नसलेले अन्न आणि आहाराच्या बाबतीतील अज्ञान किंवा दुर्लक्ष यामुळे सध्या लहान मुलांमध्ये श्वसनसंस्थेशी संबंधित विकारांमध्ये मोठी वाढ झालेली दिसते. वारंवार सर्दी-खोकला होत असला, विशेषतः प्रतिजैविक औषधांची गरज भासत असली, तर बाळाला बालदमा तर नाही ना याचे तज्ज्ञांकडून निदान करून घेणे गरजेचे असते. लहान वयात सर्दी, खोकला होणारच अशी समजूत मनात ठेवणे किंवा बाळ मोठे झाले की बालदमा आपोआप आटोक्‍यात येईल अशी धारणा ठेवणे मुलाच्या भावी आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले नाही. 

तेव्हा बालदमा म्हणजे नेमके काय आणि तो होऊ नये किंवा त्याची प्रवृत्ती बळावू नये यासाठी काय प्रयत्न करता येतात याची माहिती आपण घेणार आहोत. 
दमा होण्यास कफ व वात हे दोन दोष मुख्यत्वे कारणीभूत असतात. लहान वयात कफाचे आधिक्‍य स्वाभाविक असते, त्याला वाताची जोड मिळाली तर त्यातून "बालदमा' होऊ शकतो.

 का होतो बालदमा? 
बालदम्याची कारणे याप्रमाणे सांगता येतात, 
- आई-वडिलांपैकी एकाला वा दोघांना गर्भधारणा होण्यापूर्वी खोकला वा दम्याचा त्रास असणे किंवा त्यांच्यात कफ-वातदोषाचे असंतुलन असणे. 
- गर्भवती स्त्रीने गर्भारपणात कफ-वात वाढेल असा आहार-आचरण करणे. 
- लहान मुले अतिशय संवेदनशील असतात. डोक्‍या-कानाला वारा लागू नये यासाठी मुलांना टोपडे घालण्याची पद्धत असते. अंघोळीनंतर डोके तसेच अंग ओलसर राहू नये यासाठी धुरी द्यायची प्रथा असते. या प्रकारची काळजी वेळेवर घेतली नाही, तर त्यामुळेही वात-कफदोषामध्ये बिघाड होऊन बालदम्याची सुरवात होऊ शकते. 
- सातत्याने वातानुकूलित वातावरणात राहणे, पंखा, कूलर वगैरेंचा थंड हवेचा झोत सरळ अंगावर घेणे.

- लहान वयात कफ वाढण्याची प्रवृत्ती असतेच, त्यात केळे, सीताफळ, फणस, श्रीखंड, दही, बर्फी, चॉकलेट, चीज, पनीर, क्रीम वगैरेंच्या अतिसेवनाची भर पडल्यामुळे कफ अजूनच वाढतो व बालदम्याचे बीज रोवले जाऊ शकते. 
- थंड पदार्थांमुळेही कफ वाढू शकतो. केक, कोल्ड्रिंक्‍स, आइस्क्रीमसारख्या थंड गोष्टी सातत्याने, कोणत्याही ऋतूत सेवन करण्याची सवयही दम्यास कारणीभूत ठरू शकते. 
पचनसंस्थेतील बिघाडसुद्धा बालदम्याचे कारण ठरू शकतो, विशेषतः पोटात जंत असणे, मलावष्टंभाची प्रवृत्ती असणे या दोन कारणांमुळे हळूहळू दम्याची लक्षणे उद्‌भवू शकतात. 
श्वसनसंस्थेची ताकद कमी असल्यानेही दम्याला आमंत्रण मिळू शकते. वारंवार सर्दी-खोकला होणे, नाक बंद पडल्याने श्वास नीट न घेता येणे वगैरे लक्षणे श्वसनसंस्था कमकुवत असल्याची निदर्शक असतातच, त्यातून जर यावर फक्‍त रोग दबविणारे उपचार केले गेले, तर त्यामुळे अजूनच असंतुलन होऊन त्याचे पर्यवसान दम्यात होऊ शकते. 

दमट हवामानात, ओल आलेल्या घरात राहणेसुद्धा दम्याला पोषक ठरू शकते. 
बालदम्याची लक्षणे 

बऱ्याच मुलांमध्ये सर्दी-खोकल्याने दम्याची सुरवात होते, छातीत कफ दाटतो, श्वास घ्यायला त्रास होतो, श्वसनाची गती वाढते. पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने मूल कासावीस होते. कैक वेळा मुलांमध्ये आपणहून उलटी होऊन कफ पडून गेला, तर वाताचा अवरोध नाहीसा झाल्याने बरे वाटते. 

असा करावा उपचार 
बालदम्यावर करावयाच्या उपचारांचे वर्गीकरण दोन प्रकारांत करता येते, 
1. दम्याचा वेग आला असता करायचे उपचार. 
2. वेग नसताना करायचे उपचार 

* दम्याचा वेग आला असताना छातीला व पाठीला वात-कफशामक द्रव्यांनी सिद्ध केलेले तीळ तेल लावून शेक करण्याचा उपयोग होतो. उदा. नारायण तेल किंवा "संतुलन अभ्यंग तेला'त थोडे सैंधव टाकून तेल थोडे गरम करावे आणि छातीवर तसेच पाठीवर जिरवता येते, हे तेल थोडेसे रुईच्या पानांनाही लावून त्यांच्या साह्याने दहा-बारा मिनिटे शेकण्याचा उपयोग होतो. 
* रुईची पाने उपलब्ध नसल्यास ओव्याच्या पुरचुंडीनेही शेकता येते. 
* ज्या मुलांना वाफारा घेणे जमते, त्यांना गरम पाण्यात आले, तुळशीची पाने, ओवा, निलगिरीची पाने किंवा तेल वगैरे टाकून वाफारा द्यावा. 
* वैद्यांच्या सल्ल्याने मधासह शृंगादी चूर्ण, मयूरपिच्छा मषी, श्वासकुठाररस, अभ्रक भस्म, "प्राणसॅन योग' वगैरे औषधी योग देता येतात. 
वेग नसताना एका बाजूने दम्याचा त्रास होऊ नये यासाठी उपचार करावे लागतात, दुसऱ्या बाजूने प्राणवहस्रोतसाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी सितोपलादी चूर्ण, "तालिसादी चूर्ण", ब्रॉन्कोसॅन सिरप वगैरे औषधी योग उत्तम होत. च्यवनप्राश, "सॅनरोझ' सारखी रसायने घेण्याचाही चांगला उपयोग होताना दिसतो. 

खोकला होतो आहे असे वाटल्यास लगेचच पुढीलप्रमाणे काढा देणे गुणकारी असते, चार कप पाण्यात ज्येष्ठमधाची बोटभर लांबीची कांडी, एक बेहडा व अडुळशाचे एक पिकलेले पान घालून मंद आचेवर एक कप उरेपर्यंत उकळू द्यावे. तयार झालेला काढा गाळून घेऊन साखरेसह द्यावा. 

बालदमा असणारे मूल घरात असले तर त्यांच्या खाण्या-पिण्यात विशेष काळजी घ्यायला हवी. उदा. स्वयंपाक करताना आंबट चवीसाठी दही, चिंच, कैरीऐवजी कोकम वापरता येते; स्वयंपाक करताना आल्याचा, मिरी, पिंपळीचा वापर करता येतो; दूध, दही, दुधापासून बनविलेल्या मिठाया रात्री खाणे टाळता येते; गरम पाणी पिण्याची सवय लावता येते; सातत्याने ए.सी.चा वापर टाळण्याचाही उपयोग होतो. 

मूल मोठे झाले की त्रास आपोआप बरा होईल अशा कल्पनेमुळे बालदम्याचा त्रास बऱ्याच वेळा उपेक्षित राहतो. परंतु असे करणे चुकीचे होय. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास एक तर मुलाचे प्राणवहस्रोतस कमकुवत राहून जाते, ज्याचा त्याला भविष्यात कधीही त्रास होऊ शकतो आणि दुसरे म्हणजे लहान वयात अपेक्षित असणाऱ्या शारीरिक, बौद्धिक विकासासाठी प्राणवायूचा व प्राणशक्‍तीचा पुरेसा पुरवठा होणे अपरिहार्य असते. दम्यामुळे ही प्राणशक्‍ती कमी मिळाली तर ते मुलांच्या वाढीला, एकंदर विकासाला घातक ठरू शकते. 

घरामध्ये दम्याचा इतिहास असला तर दमा पुढच्या पिढीत संक्रामित होऊ नये यासाठीही प्रयत्न करता येतात. यामध्ये गर्भसंस्कार करण्याचा, विशेषतः गर्भधारणेपूर्वी व गर्भावस्थेत विशिष्ट औषधोपचार घेण्याचा उपयोग होताना दिसतो. 
थोडक्‍यात, सांगायचे तर बालदम्यावर वेळेवारी व योग्य उपचार केले गेले, त्याला योग्य आहाराची जोड दिली, मुलाला वारंवार सर्दी, खोकला होणार नाही याकडे लक्ष दिले आणि प्राणवहस्रोतसाची ताकद वाढवली, तर बालदम्यासारखा त्रासदायक विकार आटोक्‍यात आणता येणे शक्‍य आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com