आयुर्वेदातील अग्निसंकल्पना 

cooking
cooking

व्यवहारात ज्याप्रमाणे अग्नीला सांभाळले जाते, तसेच जाठराग्नीसुद्धा संधुक्षित राहील आणि बिघडणार नाही यासाठी कायम दक्ष राहावे लागते. यासाठी सर्वांत महत्त्वाची असते आहारात घेतलेली दक्षता. आहार कसा असावा हे ज्या मुद्द्यांच्या मदतीने ठरते, त्यांना "आहारविधी विशेषायतन' म्हटले जाते. यातील "करण' म्हणजे संस्कारांची माहिती आपण घेतो आहोत. 

"स्वयंपाक' या शब्दातच "पाक' म्हणजे "अग्निसंस्कार' हा अर्थ आलेला आहे. पाक म्हणजे शिजवणे असा सर्वसामान्य अर्थ घेतला, तरी अन्न कशा प्रकारे शिजवले आहे, यावर त्याचा गुण व उपयुक्‍तता अवलंबून असते. उदा. तळलेले पदार्थ आणि उकडलेले पदार्थ हे दोन्ही शिजलेले असले, तरी तळलेले पदार्थ पचण्यास अवघड असतात. त्यामानाने उकडलेले पदार्थ पचण्यास सोपे असतात. भांड्यामध्ये शिजविलेला भात आणि प्रेशर कुकरमध्ये वाफेच्या दाबाने शिजविलेला भात यांच्या गुणातसुद्धा मोठा फरक असतो. तव्यावर भाजणे, मातीच्या खापरावर भाजणे किंवा प्रत्यक्ष निखाऱ्यावर भाजणे या प्रत्येक प्रक्रियेचे वेगवेगळे परिणाम होत असतात. एक गोष्ट नक्की की कोणतीही वस्तू नीट शिजण्यासाठी पुरेसा वेळ देणे महत्त्वाचे असते. तळण असो, भात असो किंवा ओव्हनच्या मदतीने बेक करून बनविलेला पदार्थ असो, तो कमी वेळात तयार होण्यासाठी आच वाढवली तर पदार्थ एक वेळ जळेल पण नीट शिजणार नाही. आणि नीट न शिजलेला पदार्थ खाण्याने शरीरातील अग्नीला अधिक काम करावे लागते, पर्यायाने त्याची शक्‍ती कमी होऊ शकते. 

पाकसंस्कारांव्यतिरिक्‍त अजून काही महत्त्वाचे संस्कार चरकाचार्य याप्रमाणे सांगतात, 
ते गुणास्तोयाग्नि सन्निकर्षशौचमन्थनदेशकालवासनभावनादिभिः कालप्रकर्षभावनादिभिश्‍चाधीयन्ते ।। 
...चरक विमानस्थान 

1. तोयसन्निकर्ष - पाण्याच्या साह्याने केलेले संस्कार 
2. अग्निसन्निकर्ष - अग्नीच्या मदतीने केलेले संस्कार 
3. शौच - पदार्थातील दोष दूर करण्यासाठी केलेले संस्कार 
4. मंथन - घुसळणे 
5. देश - विशिष्ट ठिकाण किंवा स्थळ किंवा प्रदेशाचा असा होणारा संस्कार 
6. काळ - ऋतुमानाचा होणारा संस्कार 
7. वासन - सुगंधाच्या मदतीने केलेला संस्कार 
8. भावना - वेगवेगळ्या द्रव्यांच्या भावना देणे 
9. कालप्रकर्ष - विशिष्ट वेळ 
10. भाजन - विशिष्ट पात्र 

1. तोयसन्निकर्ष - पाण्याच्या मदतीने अनेक संस्कार करता येतात. उदा. स्वयंपाक करताना धान्याचे पीठ पाण्यात भिजवून नंतरच त्यापासून पोळी, भाकरी बनवता येते किंवा डाळी वगैरे अगोदर काही वेळासाठी पाण्यात भिजवून ठेवायच्या असतात. यामुळे द्रव्याला मऊपणा येतो, त्यातील कोरडेपणा कमी होतो. औषध बनवितानासुद्धा काढा वगैरे करण्यापूर्वी काढ्याची द्रव्ये रात्रभर पाण्यात भिजविण्याने त्यांचा अर्क पाण्यात अधिक चांगल्या प्रकारे उतरतो असे दिसते. पदार्थ जसा आहे तसा शिजविणे आणि काही वेळ पाण्यात भिजत घालून शिजविणे याचे गुणधर्म वेगवेगळे असतात. 

2. अग्निसंस्कार - याचे महत्त्व आपण यापूर्वीच पाहिलेले आहेत. 

3. शौच - शौच म्हणजे शुद्धी. बाहेरून केलेली शुद्धी म्हणजे पदार्थ नीट धुऊन घेणे. उदा. भाजी करण्यापूर्वी भाजी नीट निवडून, नंतर धुऊन घ्यायची असते. औषध बनवितानासुद्धा मूळ घटक द्रव्ये त्यात असलेली काडी, गवत, कचरा वगैरे काढून टाकून, नीट धुऊन, वाळवून ठेवायची असतात. शंख, शिंपले वगैरे समुद्रात मिळणारी द्रव्ये शुद्ध करण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर केला जातो. 

सुवर्ण, चांदी, तांबे वगैरे धातूंची भस्मे करण्यापूर्वी सुद्धा प्रथम त्यांची शुद्धी व नंतर विशेष शुद्धी केली जाते. हिंगासारख्या उष्ण, तीक्ष्ण, द्रव्याची शुद्धी करण्यासाठी ते तुपावर परतून घ्यायचे असते किंवा तेलातील आमदोष वाढविण्याचा दोष घालविण्यासाठी तेलावर हळदीचा संस्कार करायचा असतो. म्हणून भारतीय पद्धतीने स्वयंपाक करताना फोडणीमध्ये हळद, हिंग टाकण्याची पद्धत आहे. 
यापुढच्या इतर संस्कारांची माहिती आपण पुढच्या वेळी घेऊया. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com