आयुर्वेदातील अग्निसंकल्पना

आयुर्वेदातील अग्निसंकल्पना

आयुर्वेदातील अग्निसंकल्पना
अग्नी कार्यक्षम असला तरच एकंदर आरोग्य, उत्साह व शक्‍ती उत्तम राहते आणि अग्नीची कार्यक्षमता मुख्यत्वे आहारावर अवलंबून असते. म्हणून आरोग्य टिकवायचे असो किंवा रोग बरा करायचा असो, आहार हितकर व प्रकृतीला अनुकूल असणे गरजेचे असते. आहाराचे अनेक प्रकार असतात, आपल्या रोजच्या जेवणातही काही ना काही विकल्प (व्हरायटी) असतोच. याला "आहारविधी' असे म्हटले जाते. हा आहार हितकर तरी असतो किंवा अहितकर तरी असतो, अर्थात हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरत असते. याला आहारविधीची विशेषता असेही म्हटले जाते. या फरकाला कारणीभूत असणारे जे मुख्य आठ मुद्दे आहेत त्यांना आयुर्वेदात "अष्ट आहारविधिविशेषायतन' असे संबोधले जाते.


तत्र खलु इमानि अष्टौ आहारविधिविशेषायतनानि भवन्ति ।
तद्यथा - प्रकृतिकरणसंयोगराशिदेशकालोपयोग संस्थोपयोक्‍त अष्टमानि ।
....चरक विमानस्थान


प्रकृती, करण किंवा संस्कार, संयोग, राशी, देश, काल, उपयोग संस्था आणि उपयोक्‍ता असे आठ आहारविधीचे आठ विशेष हेतू होत.
प्रकृती - तत्र प्रकृतिरुच्यते स्वभावो यः ।


प्रत्येक आहारद्रव्याचा स्वभाव ही त्याची प्रकृती. उदा. उडीद हे गुरू म्हणजे पचण्यास जड असतात, तर मूग हे लघू म्हणजे पचण्यास हलके असतात. प्रत्यक्ष अनुभवावरून तसेच अनुमानाच्या किंवा तर्काच्या मदतीने प्रत्येक आहारद्रव्याची प्रकृती जाणून घ्यायची असते. आयुर्वेदाच्या ग्रंथात त्या काळी उपलब्ध असणाऱ्या सर्व आहारद्रव्यांचे तसेच औषधद्रव्यांचे गुणधर्म सांगितलेले आहेत. तेच निकष लावले तर सध्या उपलब्ध असलेल्या किंवा परदेशात मिळणाऱ्या द्रव्यांची प्रकृती समजून घेता येते. उदा. "चीज' हे द्रव्य आयुर्वेदाच्या ग्रंथात वर्णन केलेले नाही. मात्र चीजमधील घटक, ते बनविण्याची पद्धत आणि खाल्ल्यानंतर येणारा अनुभव लक्षात घेतला तर ते पचण्यास जड आहे हे सहज समजू शकते. स्वतःची प्रकृती जाणून घेतली आणि आहारद्रव्यांची प्रकृती समजून घेतली तर स्वतःसाठी हितकर काय, अहितकर काय हे समजू शकते व त्यातून अग्नीची पर्यायाने आरोग्याची देखभाल करता येते.

करण -
करणं पुनः स्वाभाविकानां द्रव्याणां अभिसंस्कारः ।संस्कारो हि गुणान्तराधानं उच्यते ।
आहार स्वतःच्या प्रकृतीला अनुकूल बनविण्यासाठी तसेच अधिक गुणकारी ठरण्यासाठी "करण' किंवा "संस्कार' हा महत्त्वाचा हेतू होय. द्रव्यावर केले जाणारे संस्कार म्हणजे "करण' होय. द्रव्यातील वाईट गुण नष्ट करणे व चांगले गुण वाढवणे हा त्यामागचा उद्देश असतो. अग्निरक्षणासाठी हा सर्वांत महत्त्वाचा हेतू आहे असे म्हणायला हरकत नाही, कारण "अन्नयोग' किंवा "पाकशास्त्र' यावरच आधारलेले आहे. गहू, तांदूळ शेतात तयार झाले तरी ते आपण जसेच्या तसे खाऊ शकत नाही. सर्वप्रथम ते पूर्णपणे तयार होण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो, हासुद्धा एक प्रकारचा संस्कार असतो. त्यानंतर ते काही वेळासाठी साठवून ठेवायचे, त्यावरील तुसे काढून टाकायची, मग ते मळायचे, दळायचे व त्यानंतरच त्याची पोळी वा भाकरी करून ते खायचे. हा सर्व क्रम पाळावाच लागतो. या संपूर्ण प्रक्रियेला "करण' किंवा संस्कार म्हटले जाते. तांदळाचा भात बनवितानासुद्धा आधी तांदूळ धुऊन घेणे, किंचित स्नेहाबरोबर भाजून घेणे नंतर योग्य प्रमाणात पाणी घालून शिजविणे हे सर्व संस्कारच असतात.


संस्कार अनेक प्रकारांनी करता येतात, तसे पाहता पाचही महाभूतांच्या मदतीने द्रव्यातील पाच महाभूतांवर संस्कार करून त्याचा गुणोत्कर्ष करता येतो. मात्र, त्यातील सर्वांत महत्त्वाचा असतो तो अग्निसंस्कार. स्वयंपाक करताना अग्नी लागतोच. वाफवणे, पाणी घालून शिजवणे, भाजणे, तळणे वगैरे रोजच्या सरावाच्या क्रिया हे निरनिराळे अग्निसंस्कारच असतात.


अष्टांगहृदयात अग्निसंस्काराचे निरनिराळे प्रकार आणि त्याचे गुण याप्रमाणे वर्णन केलेले आहेत,
कुकूलकर्परभ्राष्ट-कन्द्वारविपाचितान्‌ ।एकयोनील्लघुन्‌ विद्यात्‌ अपूपानुत्तरोत्तरम्‌ ।।...अष्टांगहृदय सूत्रस्थान टीका
कुकूल - म्हणजे पाण्याच्या वाफेवर शिजवणे
कर्पर - म्हणजे मातीच्या भांड्यात शिजविणे
भ्राष्ट - म्हणजे सच्छिद्र खापरावर भाजणे
कन्दु - म्हणजे लोखंडाच्या तव्यावर भाजणे
अंगार - म्हणजे अंगारावर, प्रत्यक्ष अग्नीवर भाजणे


हे सर्व अग्निसंस्काराचे प्रकार सहसा अपूप म्हणजे पिठापासून बनविलेल्या विविध पदार्थांसाठी वापरले जातात, उदा. पोळी, भाकरी, पराठा, धिरडी, बाटी, पानगी वगैरे. हे उत्तरोत्तर लघू असतात. म्हणजे निखाऱ्यावर भाजून तयार केलेला पदार्थ अग्नीच्या प्रत्यक्ष स्पर्शामुळे पचण्यास सर्वांत सोपा असतो. पाण्याच्या वाफेवर शिजविलेला पदार्थ तेवढा हलका नसतो.
संस्काराविषयी अधिक माहिती आपण पुढच्या वेळी पाहू.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com