अग्नी बिघडण्याची कारणे 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

सेवन केलेला आहार जाठराग्नीने व्यवस्थित पचवला तर त्यातून आरोग्याचा लाभ होतो, पण जर आहाराचे नीट पचन झाले नाही तर त्यातून रोगाची उत्पत्ती होते, असा साधा पण महत्त्वाचा सिद्धांत आयुर्वेदात सांगितलेला आहे. आहाराचे पचन नीट होण्यासाठी मुळात अग्नी कार्यक्षम राहणे महत्त्वाचे असते. 

"अग्निं रक्षेत्‌ प्रयत्नतः' म्हणजे अग्नीचे प्रयत्नपूर्वक रक्षण करावे असे आयुर्वेदात आवर्जून सांगितलेले आहे. कारण आरोग्य किंवा अनारोग्य हे प्रामुख्याने जाठराग्नीवर अवलंबून असते असे दिसते. सेवन केलेला आहार जाठराग्नीने व्यवस्थित पचवला तर त्यातून आरोग्याचा लाभ होतो, पण जर आहाराचे नीट पचन झाले नाही तर त्यातून रोगाची उत्पत्ती होते, असा साधा पण महत्त्वाचा सिद्धांत आयुर्वेदात सांगितलेला आहे. आहाराचे पचन नीट होण्यासाठी मुळात अग्नी कार्यक्षम राहणे महत्त्वाचे असते. ही कार्यक्षमता कमी होण्यामागे अनेक कारणे असतात. यांना अग्निदुष्टीकर भाव असे म्हटले जाते. चरकाचार्यांनी याची माहिती अशी दिली आहे, 
अभोजनात्‌ अजीर्णातिभोजनात्‌ विषमाशनात्‌ । 
असात्म्य-गुरु-शीताति-रुक्षसंदुष्टभोजनात्‌ ।। 
विरेकवमनस्नेहविभ्रमाद्‌ व्याधिकर्षणात्‌ । 
देश-कालर्तुवैषम्याद्वेगानां च विधारणात्‌ ।। 
दुष्यत्यग्निः स दुष्टोऽन्नं न तत्‌ पचति लघ्वपि ।।....चरक चिकित्सास्थान 
भूक लागलेली असूनही काही न खाणे, अगोदर खाल्लेले अन्न पचलेले नसतानाही पुन्हा खाणे, अति प्रमाणात खाणे, आहार सेवन करताना पाळायचे नियम न पाळणे, स्वतःच्या प्रकृतीला अनुकूल नसणारे अन्न खाणे, पचण्यास जड, अतिशय थंड, फार कोरडे, खराब झालेले अन्न खाणे, पंचकर्मादी उपचार करताना पथ्य न पाळणे, व्याधीमुळे शरीर कृश झालेले असणे, देश, काळ, ऋतू यांचा विचार न करता आहारयोजना करणे, वेगांचे धारण करणे वगैरे कारणांनी अग्नी दुष्ट होतो आणि असा अग्नी आहार योग्य प्रकारे पचवू शकत नाही. 

1. अभोजन - 
ज्याप्रमाणे बाह्यसृष्टीत अग्नी तेवत ठेवायचा असेल, तर त्याला योग्य प्रमाणात इंधन देत राहणे गरजेचे असते, त्याप्रमाणे अग्नी कार्यक्षम ठेवायचा असेल तर योग्य वेळी योग्य प्रमाणात आहार घेणे महत्त्वाचे असते. दीर्घकाळ उपवास करणे किंवा शरीराला सहन होत नसतानाही दिवसेंदिवस काही न खाता पिता उपवास करणे हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले नाही. जेवणाची वेळ झाली तरी कामात गुंतून राहिल्यामुळे न जेवणे हेसुद्धा अग्नीसाठी घातक होय. 

2. अजीर्णभोजन - 
पहिला आहार पूर्ण पचण्यापूर्वी पुन्हा खाल्ल्यास त्याला अजीर्णभोजन म्हणतात व हे सुद्धा अग्नी बिघडण्याचे कारण असते. खाल्लेले अन्न पूर्णतः पचण्यासाठी सहसा तीन तासाचा अवधी लागतो. म्हणून जेवणानंतर तीन तासांपर्यंत पुन्हा काही खाऊ नये, असे सांगितले जाते. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यास आधीच्या अन्नाचा अर्धपक्व आहाररस आणि नवीन अन्नाचा आहाररस यांच्या मिश्रणातून तीनही दोषांचा प्रकोप होतो व आमदोषाची निर्मिती होते. म्हणून अजीर्णभोजन टाळणेच श्रेयस्कर असते. अजीर्णाशनाची सवय आरोग्यासाठी फारच हानिकारक ठरते. स्थूलता, आम्लपित्त, डोकेदुखी, अंगावर सूज, आमवात, त्वचारोग असे अनेक रोग अजीर्णाशनातून तयार होतात. बऱ्याचदा पोट भरलेले असूनही आवडीचा पदार्थ समोर आला की रुचिपोटी खाल्ला जातो किंवा प्रवासात नंतर खायला मिळणार नाही म्हणून आधीच खाल्ले जाते. परंतु यातून अजीर्णाशन घडले, की अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकते. 

3. अतिभोजन - 
भूक भागलेली समजणे आणि त्यानुसार प्रमाणात जेवण करणे हे फार महत्त्वाचे असते. समोरच्याला आग्रह करणे किंवा छोट्या बाळाला जबरदस्ती खाऊ घालणे हे खरे तर अयोग्यच होय. प्रत्येकाची खाण्याची मर्यादा वेगवेगळी असते. एखाद्याचे चार पोळ्या खाऊन पोट भरते तर एखाद्याला एखादी पोळी पुरेशी असते. केवळ नियम म्हणून ठराविक मात्रेत जेवण करायचेच असे ठरविले तर त्यातून अतिभोजन घडू शकते. खाण्याच्या स्पर्धा किंवा मित्रामित्रांमध्ये लावलेली चढाओढ हे पुढे अनारोग्याचे मोठे कारण ठरू शकते. 

4. विषमाशन - 
जेवणाची वेळ टळून गेल्यावर जेवणे, भूक लागलेली आहे त्यापेक्षा अधिक जेवणे किंवा फारच कमी जेवणे हे सर्व प्रकार विषमाशनात मोडतात व ते सुद्धा अग्निदुष्टीचे मोठे कारण असते. 

अग्निदुष्टीच्या इतर कारणांची माहिती आपण पुढच्या वेळेस घेऊया.