काळजी हृदयाची

काळजी हृदयाची

सध्या अगदी तरुण वयात म्हणजे अगदी पस्तिशी-चाळिशीच्या सुमारालाही हृद्रोगाचे निदान होताना दिसते. विशेषतः वजन जास्ती असले, व्यायामाचा अभाव असला, मधुमेह-रक्‍तदाबासारखे विकार पाठी लागलेले असले तर एकाएकी हृदयाचा झटका येऊ शकतो. त्यामुळे धावपळ, मनस्ताप, शस्त्रकर्म या सगळ्यांतून जावे लागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच आहे. धूम्रपानाची सवय, चुकीचे किंवा बाहेरचे खाणे-पिणे हे सुद्धा हृद्रोगापर्यंत नेणारे असते. आयुर्वेदात हृदयाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केलेले आहे. 

शोणितकफप्रसादजं हृदयम्‌ । असे हृदयाचे वर्णन केलेले आहे. रक्‍तधातूच्या व कफाच्या प्रसादभागापासून म्हणजेच सारभागापासून हृदय तयार होते. या ठिकाणी लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे कफाच्या मागे दोष हा शब्द लावलेला नाही म्हणजे शरीरधारणाचे काम करणारा, स्थिरता, शक्‍ती देण्याचे काम करणारा जो प्राकृत कफ आहे, त्याच्या सारभागापासून आणि रक्‍ताच्याही उत्तम अशा सारभागापासून हृदय बनत असते. 

हृदय हा मातृज अवयव असतो. म्हणजेच हृदयावर आईच्या प्रकृतीचा प्रभाव अधिक असतो. म्हणून गर्भधारणेपूर्वी स्त्रीचे रक्‍त, स्त्रीचा कफ प्राकृत असणे, उत्तम स्थितीत असणे आवश्‍यक असते. गर्भधारणेनंतरही गर्भाचे हृदय तयार होत असताना रक्‍तवर्धक, कफपोषक आहार-औषधद्रव्ये घेणे जरुरी असते. 

गर्भ तयार होत असताना स्पंदनाच्या रूपात हृदयाचे अस्तित्व बरेच आधी समजत असले तरी प्रत्यक्ष अवयव म्हणून हृदयाची अभिव्यक्‍ती होण्यासाठी चवथा महिना उजाडावा लागतो. गर्भहृदय अभिव्यक्‍त झाले की गर्भवतीला डोहाळे लागतात, जे पूर्ण करणे गर्भाच्या एकंदर आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. हृदय हे रक्‍ताभिसरणाचे, अशुद्ध रक्‍त स्वीकारून, फुप्फुसांच्या मदतीने शुद्ध करून, शुद्ध रक्‍ताचा संपूर्ण शरीराला पुरवठा करण्याचे काम करत असतेच, पण हृदय हे चेतनेचे, प्राणाचे तसेच, मनाचेही स्थान असते. 

तद्विशेषेण चेतसः स्थानम्‌ ।
...सुश्रुत शारीरस्थान

चेतना विशेषत्वाने राहण्याचे स्थान म्हणजे हृदय. 
मनोऽधिष्ठानम्‌ ।।
...अष्टांगहृदय सूत्रस्थान

मनाचे अधिष्ठानही हृदयच होय. 

मनाचे आरोग्य टिकवायचे असेल तर ते ज्या ठिकाणी राहते ते हृदय नीट असावेच लागते, प्राणशक्‍ती वाढवायची असेल तर ती ज्या हृदयात प्रामुख्याने राहते ते हृदय मजबूत असणे आवश्‍यक असते आणि चैतन्याचा अनुभव घ्यायचा असला तरी चेतनास्थान असणाऱ्या हृदयाची काळजी घेणे भाग असते. 

एकंदरच फक्‍त शरीराच्या आरोग्यासाठीच नव्हे तर चैतन्यपूर्ण व उत्साही जीवन जगण्यासाठी, उत्तम मानसिक आरोग्यासाठीही हृदयाची काळजी घेणे खूपच आवश्‍यक असते. आयुर्वेदात निरोगी हृदयासाठी गर्भावस्थेपासून काय काळजी घ्यावी, हृदयाचे कार्य कसे चालते, हृदयाचे आरोग्य टिकविण्यासाठी काय काळजी घ्यावी येथपासून ते हृद्रोग कशामुळे होऊ शकतात, ते कोणकोणत्या प्रकारचे असतात, त्यांच्यावर काय उपचार करायचे या सर्व गोष्टी अतिशय समर्पकपणे समजावल्या आहेत आणि त्यांचा प्रत्यक्षात खूप चांगला उपयोगही होताना दिसतो.

सर्वप्रथम अपण हृदयाचा शरीरातील इतर कोणकोणत्या अवयवांशी, संस्थांशी सरळसरळ संबंध असतो याची माहिती घेऊ या. आयुर्वेदात ‘स्रोतस’ नावाची एक विशेष संकल्पना आहे. प्रत्येक स्रोतसाची काही विशिष्ट कामे असतात. उदा. अन्नवहस्रोतसाचे  काम अन्न स्वीकारणे, ते पचवणे, नंतर उरलेला मलभाग शरीरातून टाकून देणे असते. प्राणवहस्रोतसाचे काम श्वासामार्फत आलेला प्राण स्वीकारून उच्छ्वास बाहेर टाकण्याचे असते वगैरे. हदय हे रसवहस्रोतसाचे व प्राणवहस्रोतसाचे मूळ असते. म्हणूनच या दोन स्रोतसांमधला बिघाड हृदयाला बाधक ठरू शकतो आणि हृदयातील दोषामुळे या दोन स्रोतसांचे कार्य व्यवस्थित होऊ शकत नाही.

प्राणवहस्रोतसाचे एक मूळ हृदय असते तर दुसरे मूळ असते महास्रोत म्हणजे मुखापासून ते गुदापर्यंतचा भाग. स्रोतसाचे एक मूळ बिघडले तर त्याचा परिणाम दुसऱ्या मुळावर होणेही स्वाभाविक असते. थोडक्‍यात रसवहस्रोतस, प्राणवहस्रोतस किंवा महास्रोतसात बिघाड झाला तर त्याचा परिणाम म्हणून हृदयात विकार उत्पन्न होऊ शकतात. 

या तीन स्रोतसांमध्ये, पर्यायाने हृदयामध्ये, बिघाड कोणत्या कारणांनी होतो हे पुढील श्‍लोकांवरून समजते.

हृदय व प्राणवहस्रोतस 
क्षयात्‌ सन्धारणात्‌ रौक्ष्यात्‌ व्यायामात्‌ क्षुधितस्य च ।
प्राणवाहिनि दुष्यन्ति स्रोतांस्यन्यैश्‍च दारुणः ।।
...चरक विमानस्थान

धातूंचा क्षय झाल्याने, मल-मूत्र वगैरे वेगांचे धारण करण्याने, रुक्ष वस्तूंचे अतिप्रमाणात सेवन करण्याने, भूक लागली असतानाही व्यायाम करण्याने व स्वशक्‍तीच्या आवाक्‍याबाहेर कार्य करण्याने प्राणवहस्रोतस बिघडते आणि त्याची परिणाम हृदयावर होतो. 
स्रोतस व हृदय
अतिमात्रस्य चाकाले चाहितस्य च भोजनम्‌ ।
अन्नवाहिनी दुष्यन्ति वैगुण्यात्‌ पावकस्य च ।।
...चरक विमानस्थान

 

अवेळी अतिप्रमाणात भोजन करण्याने, प्रकृतीला अहितकर भोजन करण्याने व अग्नीतील बिघाडामुळे पचनसंस्थेत बिघाड होतो व त्याचा परिणाम म्हणून हृदयात विकार उत्पन्न होऊ शकतात. 

रसवहस्रोतस व हृदय
गुरुशीतमतिस्निग्धं अतिमात्रं समश्नताम्‌ ।
रसवाहिनी दुष्यन्ति चिन्त्यानां चाति चिन्तनात्‌ ।।
...चरक विमानस्थान

 

पचण्यास जड, अतिथंड, अति स्निग्ध पदार्थ खाण्याने, अतिमात्रेत भोजन करण्याने व अति चिंता करण्याने रसवहस्रोतस बिघडते. रसवहस्रोतसाचे मूळ हृदय व हृदयातून निघणाऱ्या धमन्या असल्याने रसवहस्रोतस बिघडले की त्याचा परिणाम सरळ हृदयावर होताना दिसतो. 

‘माधवनिदाना’त हृद्रोगाची कारणे पुढीलप्रमाणे दिलेली आहेत, 
अत्युष्ण-गुर्वन्न-कषाय-तिक्‍त-श्रमाभिघाताध्यशनप्रसंगैः ।
सचिन्तनैः वेगधारणैश्‍च ।।

 

अति उष्ण, पचण्यास जड, तुरट, कडू चवीचे भोजन करण्याने, अति श्रम, अति भोजन, शारीरिक वा मानसिक आघात, अतिमैथुन, अतिचिंता व मलमूत्रादि वेगांचे धारण या कारणांनी हृद्रोग होऊ शकतो. 

हृद्रोगाची संप्राप्ती म्हणजे हृदयरोग कसा होतो हे पुढील सूत्रावरून समजते,
दूषयित्वा रसं दोषा विगुणं हृदयं गताः ।
हृदिबाधा प्रकुर्वन्ति हृद्रोगं तं प्रचक्षते ।।
...माधव निदान

कारणानुरूप ज्या कोणत्या दोषात बिघाड होतो तो दोष रसधातूला बिघडवतो. बिघडलेला रसधातू हृदयात पोचला की त्या ठिकाणी बाधा उत्पन्न करतो आणि हृद्रोग होतो. 

यावरून एक गोष्ट लक्षात येते की, कारणानुरूप जो दोष बिघडेल त्यानुसार हृद्रोगाची लक्षणे बदलतात. नेमका कोणता दोष कारणीभूत आहे हे पाहून उपचारांची दिशा ठरवावी लागते. हृद्रोगातील लक्षणांचा निश्‍चित अभ्यास करून व नाडीपरीक्षा करून हृद्रोगाबाबतचा निर्णय वैद्याने घ्यायचा असतो. एखाद्या लक्षणावरून हृदयविकार झाला असे समजून घाबरून जाऊ नये.

नेमक्‍या कोणत्या दोषामुळे हृदयविकार झाला आहे हे ज्या लक्षणांवरून समजून घ्यायचे असते त्यांची माहिती आपण पुढच्या वेळेला पाहूया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com