सुवास सौंदर्याचा

beauty
beauty

विश्वाच्या रचनेतील त्रिकोणात वरच्या बिंदूला संकल्पना आणि पायाच्या दोन बिंदूंना जडत्व व शक्‍ती असतात. संकल्पना हे सर्वस्व आहे. या सर्वस्वामुळेच जडत्व व शक्‍ती हे त्रिकोणाचे दोन बिंदू अस्तित्वात आहेत. जडत्व व शक्‍ती यांचे एकमेकांत रूपांतर चालू असते, त्यांच्यात एक संवाद चालू असतो. या संवादाचे नियंत्रण संकल्पनेकडून, जाणिवेकडून, परमस्वरूपाकडून होत असते. या त्रिकोणाचा मध्यबिंदू म्हणजे परमपुरुष परमात्मा. पृथ्वी व शक्‍ती या एकत्र असल्यामुळे पृथ्वी ही स्त्रीलिंगी वचनाची व पृथ्वीतत्त्वाशी संबंधित असलेली स्त्री ही जगाला वंद्य असते. ती महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती ठरली नाही तरच नवल. स्त्रीची विटंबना केल्यामुळेच सध्या जगाला त्रास भोगावे लागत आहेत. स्त्री हा फक्त मानवजातीचाच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांचा आकर्षण बिंदू आहे. आपला आकार, रूप, तेज व्यवस्थित ठेवणे हे स्त्रीच्या स्वभावातच असते. चेहऱ्यावर मुरुम नसणे, कांती गोरी असणे एवढ्यापुरते सौंदर्य अवलंबून नसते. डोळे पाणीदार असणे, नाक चाफेकळीसारखे असणे, ओठ धनुष्याकृती असणे, केस लांबसडक व दाट असणे (केस कापलेले असले तरी ते लांबसडक असलेले केस कापले आहेत हे लक्षात आले पाहिजे, कारण लांब केस स्त्रीच्या अस्थिसंस्थेच्या आरोग्याचे निदर्शक असतात) ही स्त्रीच्या सौंदर्याची काही परिमाणे होत. स्त्रीचा मांसल भाग हे तिच्या सौंदर्याचे एक परिमाण असले तरी शरीराच्या आत असलेल्या मजबूत हाडांवरच तिच्या कार्याचा डोलारा उभा असतो हे खरे. उंचीच्या प्रमाणात जाडी असावी किंवा स्त्री तसे ठेवण्याचा प्रयत्न करते. पुरुषाने सुद्घा सुदृढ बांधा, रुंद छाती, रुबाबदार तेजस्वी चेहरा यासाठी प्रयत्नशील राहायचे असते.

अमुक क्रीम वापरा, तमुक तेल वापरा, या गोळ्या घ्या, त्या कॅपसुल घ्या वगैरे जाहिरातींचा महापूर वर्तमानपत्रात, मासिकात, टीव्हीवर असलेला दिसतो. असे केल्याने कांती उजळ होईल, सौंदर्य मिळेल, सुवर्णकांती मिळेल अशी जाहिरात केलेली असते. सोन्यासारखा रंग गालाला लावल्यावर कांती सोनेरी दिसली नाही तरच नवल. परंतु असे कांतीचे सौंदर्य हे टिकणारे सौंदर्य नव्हे. कितीही सुंदर केशरचना केली तरी ती एका दिवसापुरती असते, दुसऱ्या दिवशी केस त्यांच्या नैसर्गिक स्वभावात जातात. केस छान बांधले वा त्यांची छान वेणी घातली तर ते कुठल्याही केशरचनेपेक्षा अधिक सुंदर दिसते. सांगायचा मथितार्थ असा की सौंदर्यासाठी वरून रसायने लावणे हे कायमसाठी चांगले नव्हे, तसेच चेहऱ्याच्या त्वचेतील वरच्या थरातील पेशींचा मलभाग कसा काढता येईल याचा प्रयत्न करताना चिकटपट्टी लावून ती खेचून काढून पेशींचे उच्चाटन करणे हा प्रकार गौणच म्हणावा लागेल. 

गर्भसंस्काराच्या पद्धतीने जन्मापूर्वी आणि आयुर्वेदाच्या पद्धतीने जन्मानंतर स्त्रीवर झालेल्या संस्कारांनी तसेच तिने आत्मसात केलेल्या वेगवेगळ्या कला, नाना तऱ्हेच्या व्यायामाच्या व इतर काम करण्याच्या पद्धतीतून घेतलेली मेहनत, संस्कारांमुळे तयार झालेली रुची, त्याप्रमाणे केलेला पेहराव, वेशभूषा, वागणे, बोलणे, चालणे आणि कर्तृत्व या सर्वांतून सौंदर्याचा एक आकर्षणबिंदू किंवा प्रेरणाबिंदू तयार होतो. 

तेव्हा आयुर्वेदाच्या मदतीने स्त्रीच्या शरीराचा आतून केलेला कायापालट हाच शेवटी सौंदर्य फुलवतो. या संबंधात वाचकांकडून अनेक प्रश्न विचारले जातात. उदा. चेहऱ्यावर मुरुम आहेत तर काय करू? एका विशिष्ट बदलांच्या वेळी चेहऱ्यावर  मुरुम येत असतात. 

सौंदर्यासाठी सर्वांत महत्त्वाची असते रक्‍तशुद्धी. रक्‍त जेवढे शुद्ध असेल, रक्‍तात जेवढी ताकद असेल, रक्‍तात जेवढी प्राणशक्‍ती असेल तेवढी त्वचा सुंदर, पातळ, तजेलदार, आरोग्यवान दिसते. मुरुम हा त्वचेवर असणारा स्थानिक विकार आहे. स्त्रियांच्या बाबतीत त्याच्या तरुणपणी पांढरे किंवा लाल जात राहण्याचा व चेहऱ्यावरील मुरुमांचा संबंध दिसतो, अशा वेळी डोळ्यांखाली काळे डाग येऊ शकतात, चेहरा निस्तेज होतो.
बाजारात अनेक चांगली-वाईट, उत्तम क्रीम्स मिळतात, पण त्यातील रासायनिक द्रव्यांचा त्रास होऊ शकतो. आयुर्वेदानुसार अनेक औषधी तेल-तूप यांचे प्रकार सुचविलेले असतात. त्यांचा त्रास होत नाही. क्रीम हे घराबाहेर जाताना व प्रवासात उपयोगी पडते, पण त्यात औषधी तेल-तूप हवेच. स्त्री किंवा पुरुषांच्या सौंदर्याचे गमक म्हणजे चेहऱ्यावर तेज असावे, शुक्रधातू भरपूर असावा व ओज असावे. त्याच बरोबर या शुक्रशक्‍तीमुळे आत्मविश्वास वाढला की चेहऱ्यावर तेज दिसतेच. दुसऱ्यास मदत म्हणजे प्रेमभाव जास्त असला की चेहऱ्यावर सात्त्विक भाव किंवा निरागसता दिसते (यालाच व्यवहारात क्‍यूट असे म्हटले जाते) आणि दुसऱ्यासाठी मनात आदर असला व स्तुती करावीशी वाटली की चेहऱ्यावर नम्रता दिसते व खरे सौंदर्य खुलते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com