#FamilyDoctor स्तन्य - बालकाचा जीवनाधार

#FamilyDoctor  स्तन्य - बालकाचा जीवनाधार

प्राणिमात्राला सर्वांत महत्त्वाची गरज असते अन्नाची. प्राचीन काळी गुहेत असताना मनुष्याने आजूबाजूचा एखादा प्राणी मारून खाल्ला असेल. प्राणी मारून खाता येतात हे त्याच्या लक्षात आले असेल. त्या वेळी लहान मुलांनी जवळपासच्या कीटकांना, बारीक प्राण्यांना, साचलेल्या पाण्यातील माशांना मारून खाल्ले असेल. एकूण पूर्वीपासूनच प्रत्येक जण भोजनाच्या व्यवस्थेस लागलेला दिसतो. स्वतःला संकटापासून वाचविणे व पोटाची व्यवस्था करणे ही दोन मुख्य कामे. शरीर अन्नापासूनच तयार झालेले आहे. जेव्हा कुटुंबात लहान मूल असेल तेव्हा स्त्री शिकारीला जाऊ शकली नसेल, तसेच नव बालकाला मांस खायला देणे शक्‍य नाही हे तिच्या लक्षात आले असेल, तेव्हा बालकासाठी अन्न म्हणून स्तन्य देता येते हे तिच्या लक्षात आले असेल. स्तन्य बालक आनंदाने पिते हेही तिच्या लक्षात आले असेल. भूक लागल्याचे रडून आपल्या मातेला दाखवून द्यायचे व त्यानंतर तिच्या कुशीत शिरून स्तन्यपान करायचे असते हेही बालकाला ज्ञात असे. 

एक गोष्ट नक्की की, मोठे झाल्यावर मनुष्याने मांस खाल्ले तरी त्याचे सुरुवातीचे शरीर स्तन्यातूनच निर्माण झालेले असते. ज्या वेळी काही कारणाने मातेला दूध येत नाही त्या वेळी कुठले दूध कशा प्रकारे द्यावे याच्या सूचना आयुर्वेदात दिलेल्या सापडतात. घरी गाय नसल्यामुळे अश्वत्थाम्याच्या आईने पाण्यात पीठ मिसळून त्याला दिल्यामुळे त्याला मस्तकावर फोडासारखा काही विकार झाला होता की असे दूध पिऊन तयार झालेल्या मानसिकतेतून तो दुर्योधनाच्या बाजूने लढण्यासाठी तयार झाला, हे कळायला मार्ग नाही. आईचे स्तन्य उपलब्ध नसल्यास असे अनैसर्गिक नॉन डेअरी व्हाईटनर (कुठलेतरी द्रव्य पाण्यात मिसळून तयार केलेला पांढऱ्या रंगाचा द्रव) लहान मुलाला फसवून, ते दूध आहे हे भासवून बालकाला द्यायची ही योजना दिसते. त्यातून बालकाच्या पोटात गेलेले पीठ पचले तर काही फायदा होत असावा. परंतु कुठल्याही बालकाच्या नशिबी असे पांढरे पाणी प्यायची वेळ येऊ नये. बहुधा अशी वेळ येतही नाही.  

स्तन्य पुरेशा प्रमाणात तयार व्हावे यासाठी आईने योग्य आहार घेणे, योग्य ती काळजी घेणे आवश्‍यक असते. स्तन्य योग्य, पुरेसे, कसदार यावे यासाठी तिचा आहार कसा असावा, कसा नसावा याबद्दल आयुर्वेदाने सूचना केलेल्या आहेत. यासाठी सर्वांना माहीत असलेले एक रसायन म्हणजे शतावरी कल्प. तशीच इतर द्रव्ये पण आहेत. 

बालकाला स्तन्यपान केल्यास स्तन ढिले होतात, खाली उतरतात, सुरकुत्या येतात व स्त्रीच्या सौंदर्याला बाधा येते अशी टूम मध्यंतरी निघाली होती. परंतु बालकाला स्तन्यपान दिल्याने असे काहीही होत नाही हे आता सर्वांच्या लक्षात आलेले आहे व अन्नासाठी चारही दिशांना जाऊ न शकणाऱ्या बालकाला पुन्हा एकदा स्तन्य मिळू लागले. 

स्तन्यासाठी मातेने आपली स्वतःची काळजी घेणे आवश्‍यक आहे. आपण काय खातो-पितो यावर तिने लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. कारण तिने खालेल्या अन्नापासूनच स्तन्य तयार होणार असते. मातेने काय खाल्ले आहे त्यावर तयार होणाऱ्या स्तन्याचे गुण ठरत असतात. तिने असंतुलित आहार केला तर बालकाची तब्येत बिघडू शकते, त्याच्या शरीरातील वात-पित्त-कफ यांचे असंतुलन होऊ शकते व याचा परिणाम पुढे आयुष्यभर होऊ शकतो.

दुधाची ॲलर्जी, तीही मातेच्या दुधाची ॲलर्जी, ही खरे पाहताना चमत्कारिक व आश्‍चर्यकारक गोष्ट ठरावी. एखाद्या वेळी असे घडलेच तर आयुर्वेदाच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, तिच्या आहारात बदल करून स्तन्यात योग्य ते बदल करता येतात. लहानपणी मातेचे स्तन्य मिळालेल्या बालकांचे पुढे दात, हाडे बळकट होण्यास मदत मिळते. बालकाला गाईचे दूध देण्याची वेळ आलीच तर त्यात किती पाणी घालावे, किती गरम करावे, गरम करताना त्यात सुंठ, वावडिंग, डिकेमाली वगैरे घालावे, ज्यामुळे दूध बालकाला पचण्यास सोपे होईल, याबद्दलही आयुर्वेदात सांगितलेले आहे.    

बाळाने शरीर नीट धरावे, त्याचा योग्य विकास व्हावा व बाळ पटपट मोठे व्हावे असे सर्वांनाच वाटते. बाळाची वाढ नीट असावी हे म्हणत असताना बहुतेक पालक बाळाची उंची व वजन मोजत राहतात. परंतु वजन हे वाढीचे परिमाण असू शकत नाही. बाळाची दृष्टी तेज आहे का, बाळाचे कान सूक्ष्म ऐकू येईल असे बनत आहेत का, सूक्ष्म वास त्याला येतो की नाही, त्याला चव कळते की नाही, त्याची जागरूकता किती आहे, त्याचे मल-मूत्र विसर्जन कसे आहे, याही गोष्टी तितक्‍याच महत्त्वाच्या असतात.

तान्ह्या बाळासाठी आईचे दूध हा सर्वांग परिपूर्ण आहार ठरतो. आईच्या दुधाला तोड नाही. आईचे दूध बाळाला पचत नाही असे सहसा होत नाही. बाळाला आईच्या दुधाची ॲलर्जी आहे असे म्हणून काही वेळा बाळाला बनावटी दूध दिले जाते. नंतर जरा मुले मोठी झाली की दुधात अमुक घातल्याने स्मरणशक्‍ती वाढेल, तमुक घातल्याने उंची वाढेल, हे घातले की बुद्धी वाढेल असे त्यांच्या मनावर बिंबवले जाते. पण त्यातून काय निष्पन्न होणार कोणास ठाऊक!  स्पर्धेचे जग असले तरी प्रत्येकाला पहिले येता येत नाही. आणि मुख्य म्हणजे, सर्वांना बरोबर घेऊन जाण्यातच खरे यश असते; याही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या असतात.

बाळाला आईचे दूध चालू असताना आईचा आहार सकस व षड्‌रसपूर्ण असावा, केवळ जिभेला चटकदार अन्न नसावे. आईच्या आहारात असे चटकदार अन्न असले तर बालकाचे पोट फुगणे, लाळ गळणे, उलटी होणे, शौचाला पांढरी होणे, शौचाला न होणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे बालक आईचे स्तन्यपान करत असेपर्यंत मातृप्रेम पूर्णत्वाने विकसित असावे. स्वतःच्या चैनीसाठी पण बालकाच्या अकल्याणाचे असे काहीही हातून घडणार नाही यासाठी दक्ष असावे.

या स्तन्यसप्ताहामध्ये स्तन्यपानाचा सर्व स्त्रियांपर्यंत विशेषतः नवदांपत्य, गरोदर स्त्रिया, नवप्रसूता स्त्रिया यांच्यापर्यंत प्रचार व्हावा आणि त्यांना स्तन्यपानाची योग्य माहिती मिळावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com