कालमृत्यू, अकालमृत्यू

कालमृत्यू, अकालमृत्यू

"मृत्यू काळ वेळ सांगून येत नाही'
गंमत आहे की नाही? एकच शब्द तीन वेळा वापरून बनविलेले हे वाक्‍य! मृत्यू म्हणजेच काळ आणि काळ म्हणजेच वेळ. परंतु असे म्हणण्याची वेळच का आली? कारण सध्या अनेक वेळा असे ऐकिवात येते की, कर्तबगार तरुण व्यक्‍तीचा अचानक मृत्यू झाला, स्वतःचे काम अर्धवट ठेवून, इतरांना बुचकळ्यात टाकून ते जीवनपटावरून गायब झाले. या व्यक्‍ती भलतीच वेळ पसंत करून मृत्यूला का सामोरी गेल्या? सर्वांना याची आश्‍चर्ययुक्‍त भीतीही वाटायला लागली. मृत्यू एवढा स्वस्त झाला की काय, असा प्रश्नही मनात उभा राहिला. साधारणपणे 70-80 वर्षे मोजायला लागायची तेथे 35-40 वर्षे मोजल्यावर आयुष्य का संपावे? ज्या काळामध्ये अशा गोष्टी घडतात त्यालाच कलियुग म्हणायचे. युग म्हणजेही शेवटी काळच. मनुष्याला जन्म येतो त्या वेळी साधारणपणे त्याच्या नाडीचे ठोके 120 पडतील अशी शक्‍ती असते. ही शक्‍ती कमी होत होत शंभराव्या वर्षी मृत्यूसमयी साधारणपणे मिनिटाला 60च्या आसपास ठोके पडतील एवढीच शक्‍ती नाडीत असते. 120 + 60 = 180 तेव्हा प्रत्येक मिनिटाला साधारणपणे सरासरी 90 ठोके पडतात असे धरता येते. एकूण शंभर वर्षांच्या आयुष्यात लक्षावधी ठोके मारता येतील एवढी शक्‍ती-काळ घेऊन प्रत्येक व्यक्‍ती जन्माला येते. असे असताना अचानक मृत्यू का यावा? कुठे गेली ती शक्‍ती ज्या शक्‍तीच्या जोरावर शंभर वर्षे जगता येणार होते?

मला एक गोष्ट आठवते. एका व्यक्‍तीने आपल्या तीन मुलांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले आणि सांगितले की तुम्हाला आता महिनाभर घर चालवायचे आहे. तेव्हा या दहा हजार रुपयांचा उपयोग तुम्ही कसा कराल यावरून पुढचे पैसे कुणाच्या हातात द्यायचे हे मी ठरवणार आहे. एका भावाने पैसे बॅंकेत ठेवले व येणाऱ्या व्याजात घर चालविण्याचे ठरविले, पण त्याचा जमाखर्च बसेना तेव्हा त्याला थोडी काटकसर करावी लागली किंवा थोडे अधिक काम करावे लागले. दुसऱ्या भावाने महिनाभर अत्यंत स्वस्त अन्नधान्याची निवड केली, या वस्तू घरातल्यांना आवडतील, खाता येतील की नाही याकडे लक्ष दिले नाही. तिसऱ्या भावाला वाटले की दहा हजारात घर चालविणे अवघड आहे, हे पैसे घोड्यावर लावले तर त्यातून खूप पैसे मिळतील व आपण व्यवस्थित घर चालवू, असा विचार करून सरळ रेसकोर्सचा रस्ता धरला. घोडा घोड्याच्या वेगाने पळून गेला व त्याहीपेक्षा वेगाने पैसे पळून गेले. साहजिकच पहिल्या भावाची ज्याने पैसे बॅंकेत ठेवले होते व अधिक काम करण्याचे ठरविले होते त्याच्याकडे वडिलांनी कारभार सोपवला.

पण अधिक काम करण्याचे तारतम्य कधी सुटते हे कळत नाही. अधिक काम केले की अधिक पैसे मिळतात, पण पैसे हे जिवंत नसतात. नाडीचे ठोके देण्यासाठी त्यांचा उपयोग नसतो. त्यासाठी लागणारी शक्‍ती वेळात असते, काळात असते. वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. व्यक्‍ती किती हुशार, किती ज्ञानी आहे व किती श्रीमंत आहे हे त्याच्याजवळ असलेल्या वेळेवरच मोजता येईल.
म्हणजे शंभर वर्षे जगता तर आले पाहिजे; पण ते जगणे असे हवे की मृत्यूसमयी प्रत्येक जण हळहळेल; आता आम्हाला कोण मदत करेल या मानसिकतेतून त्यांना वाईट वाटत असेल. अशा व्यक्‍तीने जीवनात स्वतः तर आनंद घेतलेलाच असतो, परंतु इतरांना मदत करण्यात सुख मिळविले, तसेच आयुष्याचे नियोजन असे केले की पूर्ण शंभर वर्षे वापरून घेतली. कुठलाही मोठा अधिकारी, मोठा कलाकार यांनी "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण' याचा अनुभव घेतलेला असतो. या कठीण यातना कुठल्या तर त्याने अनुभवलेले वेळेचे दारिद्य्र. मोठ्या मंडळींना वेळच मिळत नाही. कलाकारांना एका विशिष्ट वेळेला मागणी असते. त्या वेळी अधिक काम करूनच चार पैसे गाठीला टाकले नाही, तर पुढे काय होईल, याचे भान त्यांना ठेवणे आवश्‍यक असते. परंतु हे भान ठेवत असतानाच अधेमधेच वेळ संपून गेली, तर काय, हाही विचार करणे आवश्‍यक असते. तेव्हा पैशामागे लागत असतानाच वेळेचे नियोजन नीट करणे अधिक फायद्याचे ठरते. मिळालेल्या पैशाचा विनियोग व्यवस्थितपणे करून, पैसे खर्च करत असताना त्यावर कसे नियंत्रण ठेवता येईल, हे पाहून चार पैसे शिल्लक ठेवणे महत्त्वाचे ठरते. हे करत असताना ज्याच्याजवळ पैसे असतात व ते खर्च करण्यासाठी वेळ असतो तोच खरा श्रीमंत.

मृत्यूचे कारण मुख्य ताणात असते. ताण मेंदूवर आलेला असतो. मेंदूत असते मनाचे स्थान. आणि हा मानसिक ताण रोगांना आमंत्रण देतो. बऱ्याच वेळा आपण चुकतो आहोत हे कळत असते, पण वळत नसते. यातून मानसिक ताण उत्पन्न होतो. औषधोपचार केल्यामुळे किंवा जन्मतः प्रकृती ठीक असल्याने अंथरुणात खितपत पडण्याइतपत आजारपण फार वेळा येत नाही. परंतु अचानक एक दिवशी तिजोरी रिकामी आहे असे कळते तसे अचानक नाडीची ठोके देण्याची शक्‍ती संपली हे लक्षात येते.




 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com