अग्र्यसंग्रह

अग्र्यसंग्रह

‘रामबाण औषध’ असा शब्दप्रयोग प्रचलित आहे. शंभर टक्के लागू पडेल असे औषध म्हणजे रामबाण औषध. औषध लागू पडणे ही पुढची अवस्था असते, त्यापूर्वी औषधाची रामबाण योजना होणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी अग्र्यसंग्रह कामाला येतो. उपचार असोत, आहारयोजना असो, पंचकर्म असो किंवा मानसिक भाव असो, अग्र्यसंग्रहाला अनुसरून योजना केली तर ती रामबाण योजना ठरतेच, मागच्या वेळी आपण कुळीथ आम्लपित्त करणारे असतात, हे पाहिले. आता त्या पुढची माहिती घेऊ या.

माषा ः श्‍लेष्मपित्तजननानाम्‌ - उडीद कफ व पित्त उत्पन्न करणारे असतात. उडीद बाहेरून शेक करण्यासाठी उत्तम असतात, सेवन केले असता वातशामक असतात; मात्र, पचण्यास जड असल्याने पचले तरच वातशमनाचे कार्य करू शकतात. सर्व प्रकारच्या कडधान्यांत उडीद हीन समजले जातात.

वृष्यो वातहरः स्निग्धोष्णो मधुरो गुरुबहुर्मलो बल्यः पुंस्त्वदायी च ।

...चरक सूत्रस्थान
रक्‍तपित्तप्रकोपणे रोचनस्य ।....


उडीद शुक्रवर्धक, वातनाशक, शरीरात स्निग्धता उत्पन्न करणारे असतात, वीर्याने उष्ण असतात, चवीला मधुर असतात व पचण्यास जड असतात, मळ अधिक प्रमाणात तयार करणारे असतात, ताकद देतात, तसेच पौरुषशक्‍ती वाढविणारे असतात. मात्र, रक्‍तपित्तकर असतात. म्हणून उडीद चविष्ट असले तरी जपून खाणे सयुक्‍तिक असते. 

मदनफलं वमनास्थापनानुवासनोपयोगिनाम्‌ - मदनफळ वमन,  आस्थापन बस्ती (काढ्याची बस्ती) आणि अनुवासन बस्ती (सिद्ध तेलाची बस्ती) या तिन्ही कर्मांसाठी श्रेष्ठ समजले जाते. 

कटुः तिक्‍तमुष्णं कफवातघ्नं व्रणज्वरप्रतिश्‍यायगुल्मविद्रधि शोफहरं च ।....

चवीला तिखट, कडू, वीर्याने उष्ण, कफदोष तसेच वातदोषशामक असणारे मदनफळ मुख्यत्वे जखम, ज्वर, सर्दी, गुल्म (वाताचा गोळा), विद्रधि (गळू), सूज या व्याधींवर अधिक उपयोगी असते. वातशामक असल्याने व शरीरात गेल्यावर तत्काळ काम करण्यास सुरवात करत असल्याने बस्तीसाठीसुद्धा उपयोगी असते. 

त्रिवृत्‌ सुखविरेचनानाम्‌ - निशोत्तर नावाच्या वेलीचे मूळ व कांड सुखपूर्वक विरेचन होण्यासाठी सर्वश्रेष्ठ असते. विरेचनामध्ये त्रास होऊ नये, सुखपूर्वक परंतु व्यवस्थित पुरेसे विरेचन व्हावे, शरीरशुद्धी नीट व्हावी, यासाठी निशोत्तर उत्तम असते. विशेषतः तांबूस रंगाचे कांड असणारी निशोत्तर सुकुमार म्हणजे नाजूक प्रकृतीच्या व्यक्‍तींसाठी, लहान मुलांसाठी, वृद्ध व्यक्‍तींसाठी, हलक्‍या कोठ्याच्या व्यक्‍तींसाठी सर्वाधिक अनुकूल असते. 

चतुरंगुलो मृदुविरेचनानाम्‌ - बहावा हा हलके विरेचन करण्यासाठी श्रेष्ठ असतो. बहाव्याचा मध्यम आकाराचा वृक्ष असतो, त्याला फूटभर लांबीच्या काळ्या शेंगा येतात. या शेंगांमधला गर मृदू विरेचनासाठी वापरला जातो.  

बहाव्यामुळे विरेचनाचा अतियोग होऊ शकत नाही, पोट साफ होण्यासाठी तसेच विरेचनामध्ये मुख्य औषधाला सहायक म्हणून बहावा वापरणे सयुक्‍तिक असते. अशक्‍त प्रकृतीचा रोगी, हृद्रोगी, हलका कोठा असणारी व्यक्‍ती यांच्यामध्ये बहाव्याचे विरेचन चांगले लागू पडते.

स्नुक्‌पयस्तीक्ष्णविरेचनानाम्‌ - निवडुंगाचा चीक हा तीक्ष्ण विरेचनासाठी सर्वोत्कृष्ट असतो. हा चीक अत्यंत उष्ण व तीक्ष्ण असतो, त्यामुळे फार जपून वापरावा लागतो. सध्याच्या काळात याचा वापर सहसा करण्याची गरज पडत नाही. 

प्रत्यक्‌पुष्पा शिरोविरेचनानाम्‌ - आघाड्याचे बी डोक्‍यातील दोष बाहेर काढून टाकणाऱ्या नस्यासाठी सर्वश्रेष्ठ असते. हा उपचार वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करून घ्यावा. 

विडड्.घंक्रिमिघ्नानाम्‌ - वावडिंगाची फळे जंत नष्ट करण्यासाठी सर्वश्रेष्ठ असतात. म्हणूनच लहान मुलांना द्यायच्या बाळगुटीत वावडिंग असतात. मुलांना प्यायला द्यायचे पाणी तसेच दूधसुद्धा वावडिंगाबरोबर उकळून द्यायची पद्धत आहे. 

वावडिंगाची पूड करून रोज सकाळी अर्धा चमचा या प्रमाणात मधाबरोबर घेतली तर आठ-पंधरा दिवसात जंत कमी होतात. आठ दिवस सकाळ-संध्याकाळ, पाण्याबरोबर किंवा मधाबरोबर वावडिंगाचे चूर्ण घेतले आणि आठव्या दिवशी रात्री एरंडेलचा जुलाब घेतला, तर कोणत्याही प्रकारचे जंत पडून जातात. मोठ्या माणसांनीसुद्धा हा प्रयोग अधूनमधून करण्याने पचन व्यवस्थित होण्यास, शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com