तातडीचे उपचार

तातडीचे उपचार

इमर्जन्सी आल्यास तातडीने उपचार घेणे वेगळे आणि एखाद्या त्रासावर पटकन आराम मिळण्याच्या दृष्टीने इलाज करणे वेगळे. आयुर्वेदाच्या बाबतीत अनेकांच्या मनात हा गैरसमज असतो की आयुर्वेदिक उपचारांचा गुण यायला वेळ लागतो, परंतु उपचार सुरू करताना ही भावना मनात असली तरी काही त्रास बघता बघता बरे झाल्याचे आणि मुख्य म्हणजे पुन्हा न उद्‌भविल्याचे अनेक जण स्वतःहून सांगतात. अर्थात, शरीरातील क्रियात्मक बिघाडांमुळे झालेले आजार बरे होण्यासाठी त्या त्या प्रकृतीनुसार, जीवनशैलीनुसार, शक्‍तीनुसार, मानसिकतेनुसार कमी-अधिक वेळ द्यावाच लागतो. मात्र काही तक्रारी अशा असतात की त्यावर तातडीने उपचार करावे लागतात. आयुर्वेदिक संहितांमध्ये असे बरेच उपाय सांगितलेले आहेत, अनुभवातूनही लगेच गुण देणारे उपचार सिद्ध होत जातात. आज अशाच काही उपायांची माहिती घेऊया. 

मूळव्याधीचा अनुभव अतिशय वेदनाजनक असतो. यात शरीर व मन दोन्ही त्रस्त होऊन जातात. रक्‍त पडत असले तर व्यक्‍ती अगदीच घायकुतीला येते. यावर चरकसंहितेमध्ये खालील उपाय सुचविलेला आहे. 

लाजापेया पीता सचुक्रिका केशरोत्पलैः सिद्धा । 
हन्त्याशु रक्तस्राव...............।। ... चरक चिकित्सास्थान

चांगेरी, नागकेशर व नीळकमळ यांनी संस्कारित लाह्या पाण्यामध्ये शिजवून तयार केलेली पेज मूळव्याधीतून होणारा रक्‍तस्राव ताबडतोब थांबवते. 

रक्‍त पडणाऱ्या मूळव्याधीवर स्थानिक उपचारांच्या मदतीनेही तत्काळ गुण मिळविता येतो.

दूर्वाघृतप्रदेहः शतधौतसहस्रधौतमपि सर्पिः । 
व्यंजनपवनः सुशीतो रक्‍तस्राव जयत्याशु ।। .....चरक चिकित्सास्थान


दूर्वांच्या रसाबरोबर २०० वेळा किंवा १००० वेळा फेटलेले तूप गुदभागी लावण्याने आणि पंख्याची थंड हवा घेण्याने रक्‍त पडणे लगेच थांबते. 

व्यवहारातही चमचाभर ताजे, घरी बनविलेले लोणी, नागकेशर चूर्ण व खडीसाखर हे मिश्रण घेण्याने मूळव्याधीमुळे पडणारे रक्‍त थांबते असा अनुभव आहे. 

कधी कधी उचकी लागण्याचा अनुभव सर्वांनाच असतो. एखादा घोट पाणी पिण्याने किंवा काही क्षण श्वास रोखून धरण्याने सहसा उचकी बंद होते. मात्र जेव्हा वारंवार पाणी पिऊनही उचकी थांबत नाही तेव्हा मनुष्य फार बेचैन होतो. अशा वेळी उचकी लवकरात लवकर थांबण्यासाठी सुश्रुतसंहितेतील पुढील उपचार कामाला येतात.

मध्वाज्याक्‍तं बर्हिपत्रप्रसूतमेवं भस्मौदुम्बरं तैल्वकं वा । 
स्वर्जिक्षारं बीजपूराद्रसेन क्षौद्रोपेतं हन्ति लीढ्‌वाऽशु हिक्काम्‌ ।। .....सुश्रुत उत्तरतंत्र

मोरपिसाची राख मध व तुपात मिसळून चाटविल्याने, उंबर किंवा लोध्राच्या लाकडाची राख तूप-मधात मिसळून चाटविल्याने किंवा महाळुंगाच्या रसात सज्जीक्षार व मध मिसळून घेण्याने उचकी लागणे त्वरित बंद होते. 

वातरक्‍त नावाचा एक रोग असतो, ज्यात सांध्यांमध्ये, विशेषतः सुरवातीला पायांच्या बोटांच्या सांध्यात, घोट्याच्या ठिकाणी तीव्र वेदना होतात, त्या ठिकाणी सूज येते, त्वचा लालसर रंगाची होते आणि तो भाग संवेदनशील होतो. या त्रासावर लगेच बरे वाटण्यासाठी काही ना काही उपाय करणे गरजेचे असते. यासाठी पुढील उपाय करता येतो.

बोधिवृक्षकषायं तु प्रपिबेन्मधुना सह । 
वातरक्‍तं जयत्याशु त्रिदोषमपि दारुणम्‌ ।। ....चरक चिकित्सास्थान

पिंपळवृक्षाच्या सालीचा काढा मधाबरोबर घेण्याने त्रिदोषज वातरक्‍तसुद्धा शीघ्रतेने जिंकता येते. 
शरीरातून कोठूनही रक्‍त जात असले तर ते थांबण्यासाठी तातडीने   इलाज करावे लागतात. लघवीतून रक्‍त जात असले, तर वेदनाही खूप होतात आणि बरेच रक्‍त जाते. यासाठी चरकसंहितेत लगेच लागू पडणारा पुढील उपाय सांगितला आहे,

शतावरीगोक्षुरकैः श्रृतं वा श्रृतं पयो वाऽप्यथ पर्णिनीभिः। 
रक्‍तं निहत्याशु विशेषस्तु यन्मूत्रमार्गात्‌ सरुजं प्रयाति ।।....


शतावरी व गोक्षुर यांच्या काढ्याबरोबर सिद्ध केलेले दूध पिण्याने किंवा सालवण, पिठवण, मुद्गपर्णी, माषपर्णी यांच्या काढ्यासह संस्कारित केलेले दूध पिण्याने मूत्रावाटे जाणारे रक्‍त थांबते व त्यामुळे होणाऱ्या वेदना लगेच शांत होतात. 

रक्‍तपित्त नावाचा एक रोग असतो, ज्यात एका किंवा एकाहून अधिक ठिकाणाहून रक्‍तस्राव होतो म्हणजे तोंड, नाक, कान, मूत्र, गुदभाग, योनी वगैरे. या रोगावरही लवकरात लवकर इलाज होणे खूप गरजेचे असते.  

वासां सशाखां सपलाशमूलां कृत्वा कषायं कुसुमानि चास्याः । 
प्रदाय कल्कं  विपचेत्‌ घृतं तत्‌ सक्षौद्रमाशु एव निहन्ति रक्‍तम्‌ ।। 


अडुळशाच्या फांद्या, पाने आणि मूळ यांचा काढा आणि अडुळशाच्या फुलांचा कल्क यांच्यापासून सिद्ध केलेले तूप मधाबरोबर घेतल्यास रक्‍तपित्तामुळे पडणारे रक्‍त लगेच थांबते.

काही अनुभवसिद्ध व ताबडतोब गुणकारी ठरणारे उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतील.

पित्त वाढल्यामुळे मळमळत असेल, पोटात आग होत असेल तर कोरड्या साळीच्या लाह्या चावून खाण्याने लगेच बरे वाटते. गाडी लागण्याच्या तक्रारीवरही साळीच्या लाह्या खाण्याचा उपयोग होतो. 

डोक्‍याला गार वारे लागल्यामुळे डोके जड होऊन दुखत असेल, तर डोक्‍यावर आल्याचा रस चोळण्याने बरे वाटू लागते. 

उचकी थांबत नसली तर अहळीव कामाला येतात. साधारण २० ग्रॅम अहळीव ग्लासभर पाण्यात भिजत घालावेत, काही वेळाने अहळीव उलून येतात आणि पाणी थोडे दाट होते. हे दाट पाणी गाळून घेऊन थोडे थोडे पिण्याने उचकी थांबते.

दिवसा किंवा रात्री वारंवार लघवीला होत असेल तर ते फार त्रासदायक असते. यावर ओव्याचे एक चमचा चूर्ण, एक चमचा तीळ व एक चमचा गूळ हे मिश्रण दिवसभरात थोडे थोडे खाल्ले तर लघवीचे प्रमाण कमी होते. 

तापामध्ये घाम येणे चांगले असते, कारण त्यामुळे ताप उतरतो. मात्र जर एकाएकी अधिक प्रमाणात घाम येऊ लागला तर कमालीचा थकवा येतो, गळून गेल्यासारखे वाटते. अशा वेळी दोन चमचे भाजलेल्या ओव्याचे बारीक चूर्ण संपूर्ण अंगाला चोळले तर घाम येणे कमी व्हायला सुरवात होते. 

लघवीला साफ होत नसेल, प्रमाणही कमी असेल आणि लघवी करताना दुखत असेल तर पळसाची फुले वाफवून त्याचा ओटीपोटावर लेप करण्याने मोकळी लघवी होते.

झोप लागत नसेल तर जायफळ तुपात उगाळून तयार केलेले गंध हळूहळू कपाळावर चोळल्याने गाढ झोप येते. 

तापामुळे किंवा इतर कोणत्याही रोगांत फार तहान लागत असेल व पाणी पिऊनही शमत नसेल तर खडीसाखर टाकून गोड डाळिंबाचा रस घोट घोट घेण्याने बरे वाटते. 

तापामध्ये उष्णता डोक्‍यात जाऊ नये यासाठी दूर्वा व तांदूळ एकत्र वाटून तयार केलेला कपाळावर व टाळूवर जाडसर पद्धतीने करण्याची पद्धत आहे.

नागिणीमध्ये फार दाह होत असला तर त्यावरही दूर्वा आणि तांदळाचा जाडसर लेप करण्याने बरे वाटते आणि नागीण बरी होण्यास मदत मिळते. 

अशा प्रकारे अजून किती तरी कितीतरी उपाय सांगता येतील, जर अशाप्रकारे जर इमर्जन्सी परिस्थितीमध्ये सुद्धा आयुर्वेदिक औषधे काम करत असतील तर एरवी गुणकारी असणारच आहेत. त्या त्या रोगाप्रमाणे ठरावीक वेळ हा उपचारांना आणि शरीरात पुन्हा संतुलन प्रस्थापित करण्यासाठी द्यावाच लागतो, त्यात उशीर वगैरे काही नसते. आयुर्वेदाची उपयुक्तता समजली आणि त्यामुळे शास्त्रावर श्रद्धा बसली तर निरामय आयुष्याचा आनंद घेता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com