रक्त आणि हाडे

रक्त आणि हाडे

आपल्या मांडीच्या हाडाचा वरचा भाग हा लवचिक हाडांचा बनलेला असतो. यावर कुर्चा असते. कुर्चा म्हणजे गुळगुळीत व पांढरेसे आवरण. या कुर्चामुळे आपण चालू शकतो. मांडीच्या हाडाचा पेशीसमूह (वरचा भाग) रक्तपुरवठ्याच्या अभावामुळे नष्ट होतो. (याला वैद्यकीय भाषेत एव्हीएन म्हणतात.) यामुळे त्या भागातील हाडे ठिसूळ होत जातात आणि ही ठिसूळ हाडे कालांतराने, उभे राहताना, चालताना अशा क्रियांमध्ये त्यांच्यावर सतत पडणाऱ्या भारामुळे तुटतात. नितंबाच्या हाडाची सांधेदुखी सुरु होते. मांडीचे अंतर्गत भाग लक्षात घेऊया. ॲसिटॅबुलम (उखळीच्या सांध्यातील खळगी, जिच्यामध्ये मांडीचे हाड बसविलेले असते), कुर्चा, मांडीच्या हाडाचा वरचा भाग, अस्थिबंधन, नाडीबंध, धमनी. रक्तपुरवठ्यात काही कमतरता आली की, हाडाचा वरच्या भागातील पेशीसमूह तग धरू शकत नाही. रक्तपुरवठ्याच्या अभावामुळे पेशीसमूह नष्ट झाला की, काही काळाने लवचिक हाडांचा वरचा भागही कोसळतो. अशावेळी कुर्चाचा पाया ढासळतो आणि त्यामुळे कुर्चा नष्ट होतो किंवा आपल्या जागेवरून हलतो. साहजिकच त्याचा परिणाम म्हणजे नितंबाच्या सांध्याचे संतुलन किंवा समानता नष्ट होते. मग नितंबाची सांधेदुखी सुरु होते.

‘एव्हीएन’ होण्याची करणे अजूनही स्पष्ट नाहीत. या आजारामुळे काय होते हे आपण समजू शकतो, पण का होते, हे समजणे वैद्यक शास्त्राला अजूनही शक्‍य झालेले नाही.

हा आजार का होतो हे कळले नसले, तरी या आजाराचे प्रमाण वाढण्यासाठी जबाबदार घटक कोणते आहेत, हे समजले आहे. ते पुढीलप्रमाणे - 
१) रक्तवाहिन्यांसंबंधी
सिकल सेल रोग
हिमोग्लोबिनोपथी (रक्त गोठणाऱ्या रक्तवाहिन्या)
गर्भावस्थेत वजनवाढीमुळे मांडीच्या हाडातील वरच्या भागातून रक्तस्त्राव होणे

२) संसर्ग
दूषित रक्ताची गुठळी

३) औषधे व विषारी औषधे
दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट 
दात घासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पेस्ट
स्टिरॉईड्‌स

४) दाहक गोष्टी
स्वादुपिंडाला संसर्गासारखे आजार

५) जन्मजात आजार
चयापचय क्रियेसंबंधी आजार

६) स्वयंप्रतिकार
संधिवातासारखे आजार

७) आघात / अपघात
मांडीच्या हाडाच्या केंद्रबिंदूमध्ये फ्रॅक्‍चर होणे

८) उत्सर्जित किरण   
अतिउष्णतेमुळे झालेली इजा म्हणजेच भाजणे किंवा हिमबाधा

९) अंतर्गतस्त्राव किंवा चयापचय
नैसर्गिक स्टिरॉइड्‌सचे आजार (कुशिंग डिसीज वगैरे)

हा आजार बहुतांश तरुण स्त्री-पुरुषांमध्ये आढळून आला आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे महिलांमध्ये याच्या वाढत्या प्रमाणाचे कारण म्हणजे अंमली पदार्थांच्या सेवनाचे वाढलेले प्रमाण. याचबरोबर शरीरयष्टी सुडौल ठेवण्यासाठी वापरली जाणारी औषधे, स्टेरॉईड्‌सयुक्त पावडरी (सप्लिमेंट्‌स), तसेच नत्रयुक्त संयुगांचा (क्रेटाइन) वापर सातत्याने करणाऱ्या स्त्रिया या आजाराला बळी पडतात. हाडांमध्ये होणाऱ्या वेदना, नितंबामध्ये किंवा गुडघ्यात आलेला कमकुवतपणा, जमिनीवर बसताना, मांडी घालून बसताना किंवा पायऱ्या चढताना होणाऱ्या त्रासाची तक्रार हा आजार असणाऱ्या लोकांकडून केली जाते.

प्राथमिक अवस्थेमध्ये केवळ एक्‍स-रेमधून या आजाराचे निदान होत नाही. त्यामुळे प्राथमिक अवस्थेमध्ये निदानासाठी नितंबाचे एमआरआय करण्याचा सल्ला दिला जातो. त्याचबरोबर प्राथमिक अवस्था उलटून गेलेल्या घटनांमध्ये आजाराचा किती परिणाम झाला आहे, हे कळण्याकरिताही नितंबाचे एमआरआय करण्याचा सल्ला दिला जातो. काही घटनांमध्ये आजाराचे टप्पे समजून घेण्यासाठी सीटी स्कॅन करायला सांगितले जाते. आजाराच्या स्वरूपाची निश्‍चित कल्पना येण्यासाठी याचा उपयोग होतो.

यावरील उपचारांसाठी बिस्फोस्फोनेट हा औषधांचा संच वापरला जातो. यामुळे हाडांचा ताठरपणा, कडकपणा वाढतो. परिणामी ती हाडे ढासळण्यापासून वाचू शकतात. इतर औषधे ही प्रामुख्याने  जीवनसत्व ‘डी’ व ‘बी’ यांची शरीरातील कमतरता भरून काढण्यासाठी दिली जातात. गरज असल्यास फूड सप्लिमेंट्‌सचाही त्या त्या आहारानुसार सल्ला दिला जातो. प्रेगाबॅलीन्स ही वेदनाशामक गोळ्यांना पर्याय म्हणून दिली जातात. वेदनाशामक गोळ्या आजाराच्या प्राथमिक अवस्थेमध्ये दैनंदिन हालचाल, कामे व्यवस्थित होण्याकरता दिल्या जातात. यामध्ये लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की, वेदनाशामक गोळ्या वेदना होऊ नयेत यासाठी दिल्या जातात. हा आजार वाढू नये किंवा त्याची वाढ रोखली जावी यासाठी वेदनाशामक गोळ्या उपयोगी नसतात. ही औषधे घेताना वैद्यकीय सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. अन्यथा अशा औषधांचा यकृत व मूत्रपिंड यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. 

पूर्वी या आजारामध्ये रुग्णाला सर्व हालचाली बंद करून संपूर्ण ‘बेड रेस्ट’ घ्यायला सांगितले जात असे. परंतु आता असे होत नाही. आत्ताच्या प्रगत वैद्यकीय काळात रुग्णाला त्याचे कुटुंब, समाज व कामाला अनुसरून सर्व हालचाली करण्यास प्रोत्साहन दिले जाते. फक्त दुखऱ्या भागाला अजून इजा पोचेल अशा प्रकारचे कोणतेही व्यायाम करायला परवानगी दिली जात नाही. कोणत्याही दैनंदिन हालचाली किंवा कामांमुळे रुग्णाच्या आजारात वाढ होत नाही. परंतु वेदना सहनशीलतेच्या पलीकडच्या असतील तर, काही काळ विश्रांती घेऊन रुग्णाला पुन्हा दैनंदिन कामे करण्यास परवानगी दिली जाते. आपल्या शरीरातील हाडांची कार्यक्षमता वाढण्यासाठी व्यायामप्रकार करण्यास रुग्णांना प्रोत्साहन दिले जाते. सायकल चालवण्याचा व्यायाम रुग्ण करू शकतात, तर पोहणे हा यासाठी उत्तम व्यायामप्रकार मानला जातो. धावणे, उड्या मारणे यासारखे एकदम ताण येणारे व्यायामप्रकार टाळण्याचा सल्ला दिला जातो. खाली जमिनीवर बसू नये, मांडी घालून बसू नये, कमोडचा वापर करावा अशा गोष्टींचा सल्ला या रुग्णांना दिला जातो. नितंबाच्या सांध्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी या रुग्णांनी सर्व कामांसाठी टेबल-खुर्चीचा जास्त वापर करणे केव्हाही उत्तम ठरते. 

आजाराच्या प्राथमिक अवस्थेमध्ये औषधांचा आणि डॉक्‍टरांच्या सल्ल्याप्रमाणे रुग्णाने बदललेल्या जीवनशैलीचा काहीच उपयोग झाला नाही, तर शस्त्रक्रियेचा पर्याय निवडावा लागतो. शस्त्रक्रियेद्वारे अस्थिमज्जा संकुचित होण्यापासून प्राथमिक अवस्थेमध्येच थांबवली जाते, साहजिकच हाडाला योग्य हालचाल करण्यासाठी जागा मिळते. एखाद्या घटनेत, हाड ढासळलेच तर तिथे ‘कोर डीकम्प्रेशन’ किंवा ‘ड्रिलिंग’ या शस्त्रक्रियेने काहीही फरक पडणार नसतो. कारण नैसर्गिक पद्धतीनेच हाडाचे आकुंचन रोखले जाते. अशा घटनांमध्ये रुग्णाच्या हाडांची कार्यक्षमता चांगली असेल तर केवळ औषधे देऊन हाडांची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो. जर रुग्णाची हाडे योग्य प्रकारे कार्यरत नसतील किंवा असहनशील वेदनांना रुग्णाला सामोरे जावे लागत असेल आणि त्यामुळे ओघाने त्याच्या हालचालींवर मर्यादा येत असेल, तर त्याला संपूर्ण नितंब बदलण्याच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्ण योग्यप्रकारे त्याची दैनंदिन कामे करू शकेल. रुग्णाच्या हाडाचा गोलाकार भाग व्यवस्थित व निरोगी असेल, तर फक्त मांडीच्या हाडाचा वरचा भाग बदलता येणे शक्‍य असते. यालाच ‘नितंब बदलण्याची अंशिक शस्त्रक्रिया’ असे म्हटले जाते. परंतु या उपचारानंतर कालांतराने संपूर्ण नितंब बदलण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. 

तरुण रुग्णांमध्ये सिरॅमिकवर सिरॅमिकचे आवरण असलेल्या बेअरिंगचा वापर शस्त्रक्रियेत केला जातो, तर जरा वृद्ध लोकांमध्ये सिरॅमिकवर प्लॅस्टिकचे आवरण असलेल्या बेअरिंगचा अवयव बदलण्यासाठी वापर केला जातो. हे पर्याय बेअरिंगच्या आवरणावर अवलंबून असतात. नितंब बदलण्याच्या शस्त्रक्रियेनंतर कोणतेही मैदानी खेळ खेळण्यास परवानगी दिली जात नाही, परंतु चालणे, पोहणे यासारखे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णांना चारचाकी किंवा दुचाकी गाडी चालवणे किंवा दैनंदिन कामे करणे, यावर बंधन घातले जात नाही.

अलीकडे एव्हीएनमध्ये ‘स्टेम सेल थेरपी’चा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसत आहे. मात्र अजूनही ही शास्त्रोक्त पद्धती म्हणून सिद्ध झालेली नाही. प्रयोगात्मक उपचार पद्धती म्हणूनच अजून या पद्धतीचा वापर केला जातो. त्याबद्दल अजून ज्ञान प्राप्त होईल, तेव्हा आपण हा आजार बरा करायला स्टेम सेल पद्धतीचा उपयोग सर्रास करू शकू. 

या आजारापासून दूर राहण्यासाठी स्वतःच प्रयत्न करायला हवेत. सर्व प्रकारच्या अंमली पदार्थांचे सेवन (दारू, गुटखा, तंबाखू) कटाक्षाने टाळले पाहिजे. वैद्यकीय सल्ला न घेता स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळले पाहिजे. डॉक्‍टरांनी सांगितलेल्या उपाययोजना करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. फूड सप्लिमेंट्‌स किंवा स्टेरॉईड्‌स वापरून शरीर पुष्ट, सुडौल बनवण्याचा हव्यास आपल्याला खूप महागात पडू शकतो, हे जाणले पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com