#FamilyDoctor अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

#FamilyDoctor अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

अग्र्यसंग्रहातील निरनिराळ्या विषयांची माहिती आपण घेतो आहोत. वेगधारण हे अनारोग्याला कारणीभूत असणाऱ्या कारणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे हे आपण मागच्या आठवड्यात पाहिले. आता यापुढची माहिती घेऊ या. 

गुरुभोजनं दुर्विपाककराणाम्‌ - अपचनाला कारण असणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये गुरुभोजन अर्थात पचण्यास जड पदार्थांचे सेवन करणे प्रमुख होय. 

अन्न सेवन करण्यापूर्वी ते प्रकृतीला अनुकूल आहे किंवा नाही हे माहिती असावे लागते. यात अन्नाचा रस, वीर्य, विपाक, गुण वगैरे अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागतो. गुरु आणि लघु यातीलच दोन महत्त्वाचे गुण होत. गुरु म्हणजे पचण्यास जड आणि लघु म्हणजे पचण्यास हलके. काही अन्नपदार्थ स्वभावतःच गुरु असतात. उदा. अंडी, मांसाहार, चीज, सोयाबीन, चवळी, पावटा वगैरे. गुरु अन्न पचण्यासाठी सहसा अधिक वेळ लागतो तसेच अग्र्यसंग्रहातील वरील सूत्रावरून गुरु अन्न सेवन केल्यावर अपचन होण्याची शक्‍यता अधिक असते. भरपूर शारीरिक श्रम, व्यायाम व स्वभावतःच प्रखर अग्नी असणाऱ्या व्यक्‍तींसाठी गुरु वस्तूंचे सेवन हानिकारक ठरत नाही असेही दिसते. म्हणूनच स्वतःच्या जीवनशैलीचा व पचनशक्‍तीचा विचार करून जे अन्न सहज पचू शकते तेच अन्न सेवन करणे श्रेयस्कर होय. तसेच अपचनाची लक्षणे जाणवत असली असली उदा. वेळच्या वेळी भूक न लागणे, खाण्याची इच्छा न होणे, पोटात तसेच एकंदर शरीरात जडपणा जाणवणे, पोटात वायू धरणे, आंबट-करपट ढेकर येणे, वजन वाढणे किंवा कमी होणे, मलावष्टंभ किंवा जुलाब होणे वगैरे लक्षणांतील एक वा अनेक लक्षणे जाणवत असली तर आहाराचे नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे हे समजते. 

एकाशनभोजनं सुखपरिणामकराणाम्‌ - दिवसातून एकदा जेवण करणे हे पचनास मदत करणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वश्रेष्ठ असते. 

दिवसातून एकदा मुख्य जेवण आणि इतर वेळी अगदी हलके अन्न खाणे हे पचनसंस्थेला अत्यंत हितावह असते. सकाळी उठल्यावर गरम नाश्‍ता, दुपारी मुख्य जेवण आणि संध्याकाळी पुन्हा हलके जेवण हा क्रम सांभाळला तर पचन चांगले राहते. पर्यायाने आरोग्याचेही रक्षण होते. मात्र सोयीपरत्वे किंवा सवयीमुळे दुपारी कमी जेवण आणि रात्री पोटभर जेवण करण्याने अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकते. आयुर्वेदात ‘लंघन’ ही संकल्पना सुद्धा याच दृष्टीने मांडलेली आहे. जेवण्याची इच्छा नसणे, भूक न लागणे ही

अपचनाची लक्षणे असतात, जी शरीराकडून व्यक्‍त केलेली असतात. अशा वेळी जबरदस्ती होता कामा नये, उलट व्यवस्थित भूक लागेपर्यंत लंघन केले, अन्नाऐवजी आल्याचे पाणी किंवा लिंबू सरबत घेतले तर अपचन दूर होते, शिवाय भूकही चांगली लागते. आठवड्यातून एकदा रात्री काही न खाणे हे यादृष्टीनेही चांगले होय. 

अनशनं आयुषो ऱ्हासकारणम्‌ - आयुष्य कमी करणाऱ्या कारणांमध्ये काहीही न खाणे, पिणे हे सर्वश्रेष्ठ होय. 

‘अन्नं सर्वे प्रतिष्ठितम्‌’ असे म्हटले जाते, कारण संपूर्ण जीवन हे अन्नावरच अवलंबून असते. सर्व सजिवांना अन्नाची गरज असते. प्राणशक्‍ती, तेजस्विता, उत्साह तसेच मन-इंद्रियांची सर्व कार्ये सुरळीत चालण्यासाठी अन्नासारखा दुसरा आधार नसतो. म्हणूनच दिवसातून एकदा मुख्य जेवण व इतर वेळी भूक, जीवनशैलीनुसार थोडे खाणे आवश्‍यक असते. आठवड्यातून एकदा उपवास करणे चांगले, मात्र दिवसेंदिवस न खाणे तसेच खाण्यापिण्याची आबाळ करणे हे आयुष्य कमी करणारे असते. सध्या अन्नाचा कस कमी झालेला आहे. अशा परिस्थितीत शक्‍तीसाठी फक्‍त अन्नावर अवलंबून न राहता रसायन सेवन करणे हे सुद्धा आवश्‍यक होय. च्यवनप्राश, सॅनरोझसारखी रसायने चवीलाही उत्तम असतात, शिवाय सर्व प्रकृतीच्या व्यक्‍तींना अनुकूल असतात. यालाच प्रकृतीनुरूप रसायनांची जोड देता येते. उदा. वातप्रकृतीसाठी मॅरोसॅन, जीवनीय घृतासारखे रसायन; पित्तप्रकृतीसाठी धात्री रसायनासारखे रसायन, कफप्रकृतीसाठी पिप्पलीरसायनासारखे रसायन घेणे हितावह असते. अन्न, प्रकृतीला संतुलित ठेवण्यासाठी औषध आणि रसायन यांची त्रिसूत्री जमवली तर निरोगी दीर्घायुष्याचा लाभ होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com