षड्रसपूर्ण आहार

balaji-tambe
balaji-tambe

आहार कसा असावा याचे अतिशय उत्तम आणि समर्पक मार्गदर्शन आयुर्वेदात केलेले आढळते.


पञ्चमहाभूतात्मके देहे आहारोऽपि पांचभौतिकः, सम्यक्‌ विपक्वो भूत्वा स्वान्‌ गुणान्‌ अभिवर्धयति । स पुनः षड्रसात्मकः मधुराम्ललवणकटुतिक्‍तकषायभेदेन ।...सुश्रुत सूत्रस्थान


पंचमहाभूतांपासून तयार झालेल्या या शरीराचे भरण-पोषणसुद्धा पाच भौतिक आहारापासून होत असते. हा आहार षड्रसात्मक म्हणजे मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट या चवींनी परिपूर्ण असतो.


"संतुलित आहार' या संकल्पनेनुसार आहारात या सहाही चवींचा समावेश असायला हवा. या बाबतीत चरकाचार्य सांगतात,


तत्त्रिविधं प्रवरावरमध्यविभागेन सप्तविधं च रसैकैकत्वेन सर्वरसोपयोगाच्च ।
व्यक्‍ती किती प्रकारच्या चवी सेवन करू शकते किंवा करते त्यावरून प्रवर (श्रेष्ठ), अवर (हीन) आणि मध्य असे तीन प्रकार होतात.


तत्र सर्वरसं प्रवरम्‌ म्हणजे सर्व रसांचे सेवन करणे हे श्रेष्ठ समजले जाते.
अवरम्‌ एकरसम्‌ म्हणजे कुठल्यातरी एकाच रसाचे सेवन करणे हे हीन समजले जाते आणि ध्यमस्यु प्रवरावरमध्यपस्थम्‌ म्हणजे दोन, तीन, चार किंवा पाच रसांचे सेवन करणे हे मध्यम समजले जाते.


तत्र अवरमध्याभ्यां सात्म्यानां क्रमेण प्रवरम्‌ उपायदयेत्‌ म्हणजे जे हीन किंवा मध्यम प्रकारात मोडत असतील त्यांनी क्रमाक्रमाने "प्रवर' म्हणजे सहाही रसांचे सेवन करण्याची सवय, आवड निर्माण करणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्‍यक होय.


व्यवहारात आपण पाहतो, की एखादे लहान मूल गोड अजिबात खात नाही किंवा एखाद्या मुलाला फक्‍त गोडच खायला हवे असते, काही व्यक्‍तींना तिखट खायला अजिबात आवडत नाही, काही जण कडू चव सपशेल नाकारतात. या उलट मधुमेही व्यक्‍ती मधुर चव सेवन करणे पूर्ण थांबवून कडू रसाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करते. मात्र आयुर्वेदाच्या या सूत्रांवरून स्पष्ट होते, की प्रत्येक व्यक्‍तीने गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट या सहाही चवीच्या पदार्थांचे सेवन करणे हे आरोग्यासाठी आवश्‍यक आहे.


हे सहा रस ज्या क्रमाने उल्लेखलेले आहेत, त्या क्रमाने उपयुक्‍त असतात. म्हणजे मधुर रस सर्वांत महत्त्वाचा आणि त्यामुळे सर्वाधिक प्रमाणात सेवन करायचा असतो. त्याच्या खालोखाल आंबट, त्यापेक्षा कमी खारट, त्याहीपेक्षा कमी प्रमाणात तिखट व कडू आणि तुरट रस तर फारच कमी प्रमाणात सेवन करायचा असतो. थोडेसे गोड व खूप सगळे तिखट पदार्थ खायची सवय किंवा मधुमेहामुळे गोड पूर्णतः बंद करून कडू, तुरट चवीचा अतिरेक हा आरोग्यासाठी हितकारक ठरू शकत नाही. योग्य प्रमाणात आणि योग्य स्वरूपात प्रत्येक रस महत्त्वाचा असतो. म्हणून आहार प्रकृतीनुसार वेगवेगळा असला तरी त्यात षड्रस हे असावेच लागतात.


मधुरादी सहा रस योग्य प्रमाणात शरीरात गेल्यावर काय कामे करतात, कशासाठी उपयोगी पडतात हे सुद्धा आयुर्वेदात समजावले आहे. तसेच प्रत्येक रसाचा अतिरेक झाला तर त्याचे काय दुष्परिणाम होतात हेसुद्धा सांगितले आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे सांगता येतील.


मधुर रस - रस आपल्या स्निग्ध, शीत, गुरू गुणामुळे मधुर रस वातदोषशमन करतो, तसेच शीततेमुळे पित्तशमन करतो. तसेच तो सर्व गुणांनी प्राकृत कफाला ताकद देतो. मधुर रस सप्तधातूंचे पोषण करतो, विशेषतः मज्जा, शुक्र, ओज यांची शक्‍ती वाढवतो. रस, रक्‍त वगैरे धातूतील पित्ताचे शमन करून त्यांचे प्रसादन करतो. सप्तधातूंचे सारस्वरूप ओजाचेही वर्धन मधुर रसाने होते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते. शरीरशक्‍ती उत्तम राहते, सर्व इंद्रियांना आपापले कार्य उत्तम प्रकारे करण्यासाठी शक्‍ती मिळते. उदा. तूप, पंचामृत. मधुर रस डोळ्यांची ताकद वाढवतो, केसांना पोषक असतो, कांतिवर्धक असतो, आवाजाला हितकर असतो, लहान वयात वाढ व्यवस्थित होण्यासाठी, बुद्धी व स्मरणशक्‍ती चांगली राहण्यासाठी मधुर रस आवश्‍यक असते. तरुण वयात ताकद कायम राहण्यासाठी तो गरजेचा असतो आणि उतार वयात वातशमन होण्यासाठी व शक्‍तीचा ऱ्हास कमीत कमी होण्यासाठी मधुर रस आवश्‍यक असतो. मधुर रस योग्य प्रमाणात घेतल्यास तारुण्य टिकते, म्हातारपण उशिरा येते म्हणजेच वय वाढले तरी त्याबरोबरीने येणारे त्रास टाळता येऊ शकतात.


पण म्हणून मधुर रस अति प्रमाणात घेता येत नाही, त्यामुळे कफदोष वाढतो व परिणामतः अग्नी मंद होऊ शकतो, तोंडाला पाणी सुटते, आळस येतो, जडपणा येतो, अंग थंड होते, शिथिलता निर्माण होते, खूप झोप येते, खोकला, प्रमेह, स्थौल्य, जंत वगैरे रोगही होऊ शकतात.


मधुर रसाचे नित्य सेवनास योग्य पदार्थ - दूध, तूप, लोणी, गूळ, शर्करा, शतावरी, ज्येष्ठमध, द्राक्षे, केळे, मध, जुने तांदूळ, साळीच्या लाह्या वगैरे.


मात्र साखरेच्या पाकापासून बनवलेल्या मिठाया, हरबऱ्याच्या डाळीपासून तयार केलेली पक्वान्ने, श्रीखंडासारखे पदार्थ जपून खाणे आवश्‍यक.
आंबट रस - आंबट रस वीर्याने उष्ण म्हणजे शरीरात गेल्यानंतर गरम स्वभावाचा असतो. तसेच गुणाने लघु व स्निग्ध असतो. उष्ण व स्निग्ध गुणामुळे अम्ल रस वाताचे शमन करतो, उष्ण गुणामुळे पित्त वाढवतो व कफाला पातळ करतो.
अम्ल रस तेज महाभूतापासून येत असल्याने अग्नि प्रदीप्त करतो. तसेच अग्नीला फुलवणाऱ्या समान वायूचेही संतुलन करतो. त्यामुळे जाठराग्नीची ताकद वाढते. उदा. ताक, डाळिंब. आंबट रस मनाला हवाहवासा व हृदयाला हितकर असतो. अम्ल रस, रक्‍त व रस धातूंना वाढवणारा असतो तसेच हृदयाची गती व वात दोष नियंत्रित करत असल्याने अप्रत्यक्षतः तो हृदयासाठी हितकर ठरतो. आम्ल रस मनाचेही समाधान करणारा असतो. उदा. लिंबाचे, कोकमचे सरबत सेवन केल्यास तृप्ती अनुभूत होतो. अम्ल रसामुळे अन्नाला चव येते, जीभ व मुखाचे प्रक्षालन झाल्यामुळे जीभ अधिक संवेदनशील होते व जिभेला चवीचे ज्ञान अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. जेवणाच्या प्रारंभी वरण-भातावर लिंबू पिळतात ते याचसाठी. अम्ल रसामुळे वात तर सरतोच पण बरोबरीने मल-मूत्र प्रवृत्तीही सुखाने व्हावयास मदत होते. अडून बसलेल्या वाताने होणारा पोट दुखणे वगैरे लक्षणेही नाहीशी होतात. जेवणाच्या अगोदर आल्या-लिंबाचा रस किंचित सैंधवाबरोबर घेतल्यास याचा प्रत्यय येऊ शकतो.


अम्ल रसाच्या अतिसेवनाने पित्त व कफ दोषाचा प्रकोप होतो, परिणामी रक्‍त दूषित होऊन त्वचाविकार होऊ शकतात, अंगाला खाज सुटू शकते, अंगावर पुटकुळ्या उठू शकतात, पित्त व कफ प्रकोपाने शरीरधातू शिथिल होतात. कफप्रकोपाने तेजस्वरूप दृष्टीला बाधा येते व दृष्टी क्षीण होऊ शकते. सकाळी उठल्यावर डोळे चिकट होणे, डोळ्यांना खाज सुटणे वगैरे लक्षणेही दिसतात.


आंबट रसाचे नित्य सेवनास योग्य पदार्थ -लिंबू, आवळा, डाळिंब, महाळुंग, कोकम, ताक, संत्रे, मोसंबे.


मात्र चिंच, कैरी, अननस, टोमॅटो, दही वगैरे आंबट गोष्टी प्रमाणात वापरणे श्रेयस्कर.
लवण (खारट) रस - लवण रस वाताचे शमन करतो, स्निग्ध व गुरू गुणांनी कफ वाढवतो, तर उष्ण गुणाने कफाला पातळ करतो. तसेच उष्णवीर्य, तीक्ष्ण गुणाने पित्तदोषाला वाढवतो.


आपल्या उष्ण, तीक्ष्ण गुणांमुळे खारट रस शरीरातील कोणत्याही प्रकारचा अडथळा मोडून काढू शकतो. कफदोष, मेदधातू अवाजवी प्रमाणात वाढून शरीरातील चलनवलनास अडथळा आणू लागल्यास लवण रस तो अडथळा दूर करू शकतो. तेज महाभूताचे आधिक्‍य असल्याने तसेच स्वतःच्या उष्ण गुणांमुळे लवण रस अग्नीला वाढवतो. तूप, तेल वगैरे स्नेहन करणाऱ्या द्रव्यांना लवण रस सहाय्यक असतो. अर्थात लवण रसासह तूप, तेल स्नेहनाचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. लवण रस पित्त वाढवत असल्याने स्वेदनासाठी उपयुक्‍त ठरतो. उदा. मिठाच्या पुरचुंडीने शेक दिला जातो. अम्ल रसाप्रमाणेच लवण रसही तोंडाला चव देतो. लवण रसाच्या सेवनाने तोंड, जीभ, घसा वगैरे ठिकाणातील मलरूप कफदोष काढून टाकून जिभेची संवेदनशीलता वाढते, जेणेकरून अन्नाची चव चांगल्या प्रकारे जाणवू शकते. लवण रस स्वतः तर रुचकर आहेच, पण तो बाकीच्या चवींनाही अधिक प्रभावी बनवू शकतो. उदा. लिंबाच्या रसात मीठ टाकले, की अधिक रुचकर लागतो, तुरट रसाच्या जांभळाला थोडे मीठ लावले तर ते अधिक चविष्ट लागते. तिखट आलेही मिठाच्या संयोगाने सहज खाता येते. शरीरातील वातदोषाचा अडथळा दूर करून मलरूप कफदोषाला पातळ करून काढून टाकण्याचे काम लवण रस करतो. त्यामुळे शरीरशुद्धी प्रक्रियात विशेषतः वमन म्हणजे उलटीद्वारे विषद्रव्ये बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत लवण रस आवर्जून वापरला जातो. योग्य प्रकारचा व योग्य प्रमाणात लवण रस वापरल्यास पोट साफ व्हावयासही मदत होते.


मात्र लवण रस अतिप्रमाणात घेतल्यास शरीराचे नुकसानही होऊ शकते. याच्या अतिसेवनाने पित्ताचा प्रकोप होतो, परिणामतः रक्‍त दूषित होते, मांसादी धातूत अवाजवी प्रमाणात जल महाभूत वाढल्याने ते शिथिल होतात. शिथिलतेबरोबर अशक्‍तता येते. हळूहळू ही अशक्‍तता मज्जा, शुक्र धातूपर्यंत पोचली की स्मृतिनाश, नपुंसकतासारखे गंभीर परिणाम होतात. लवण रसाच्या अतिरेकाने पित्त व रक्‍त दोघेही बिघडले की रक्‍तपित्त म्हणजे नाक, तोंड, डोळे, योनीमार्ग वगैरे ठिकाणाहून रक्‍तस्राव होण्यास सुरवात होते, अंगावर सूज येते, विविध त्वचाविकार, नागीण वगैरे रोग होऊ शकतात. आजकाल, केस गळणे, अकाली पांढरे होणे, डोक्‍यात चाई पडणे, केसांची चकाकी नाहीशी होणे असे बहुतांशी सर्वांना भेडसावणारे त्रास लवण रसाच्या अतिरेकाने होऊ शकतात. लवण रस शिथिलता उत्पन्न करत असल्याने याच्या अतिरेकाने त्वचादेखील लवकर सुरकुतते, पित्तप्रकोप झाल्याने असह्य तहान लागणे, तोंड येणे, अम्लपित्त होणे, हातापायांची जळजळ होणे वगैरे प्रकार होऊ शकतात.


सौवर्चल, सैंधव, सामुद्र, औद्भिद, बिड लवण, रोमक, पांसुज लवण व वनस्पतींचे क्षार ही लवण रसाची उदाहरणे होत. यातील सैंधव लवण सर्वश्रेष्ठ होय. रोजच्या स्वयंपाकात आपण वापरतो ते सामुद्र मीठ असते. पण आयुर्वेदिक औषधात मात्र मुख्यत्वे सैंधव मीठच वापरले जाते.


तिखट रस - उष्ण वीर्याने व सर्व गुणांनी तिखट रस पित्त वाढवतो, कफ कमी करतो व वात वाढवतो. तिखट रसामुळे मुखातील, जिभेवरील अनावश्‍यक कफदोष कमी करून जिभेची रुचिग्रहणशक्‍ती वाढते. उदा. आल्याचा तुकडा चावून खाल्ला की तोंडाला चव येते. तिखट रसामुळे पचनशक्‍ती वाढते. म्हणून जेवणाच्या सुरवातीला आल्याचा छोटा तुकडा खावा, असे आयुर्वेदशास्त्र सांगते. योग्य रूपात घेतलेल्या तिखट रसामुळे वात व पित्तदोषाला उत्तेजना मिळाल्याने शरीरात साठलेल्या विषद्रव्यांचा निचरा होण्यास मदत मिळते, अर्थात शरीरशुद्धी होण्यास उपयोग होतो. कफवर्धक आहारविहाराने शरीराला जो जडपणा येतो, तो तिखट रसामुळे कमी होऊ शकतो. अपचनामुळे तयार झालेला आमही शरीराला जखडवू शकतो. तीक्ष्ण गुणाचा तिखट रस कफदोषाचा तसेच आमाचाही अडथळा दूर करून सर्व स्रोतसे मोकळी करतो. उदा. मिरी, ओवा, सुंठ. तिखट रस शरीरातील अवास्तव ओलावा शोषून घेत असल्याने विविध कफ-पित्तज त्वचाविकारांवर तिखट रसाची द्रव्ये औषधे म्हणून वापरली जातात. विशेषतः पू, पाणी तयार होणाऱ्या व कंड येणाऱ्या त्वचाविकारांवर तिखट रसाची औषधे वापरली जातात. उदा. विडंग, चित्रक. अपचनामुळे आम वाढून आलेली सूज किंवा कफदोष अवाजवी प्रमाणात वाढल्याने आलेल्या सूजेवर तिखट रस उपयोगी पडतो. उदा. चित्रक, सुंठ. दुधापासून बनवलेल्या मिठाया, गुळाचे पदार्थ व इतर जड असणाऱ्या गोड पदार्थांच्या अति सेवनाने जंत होतात. तिखट रस कफदोष कमी करून तसेच स्वतःच्या उष्ण, तीक्ष्ण गुणांनी कफदोषासहित जंतांचाही नाश करतो. उदा. वावडिंग. अतिरिक्‍त मेदधातू कमी करणे व आमपाचन करणे ह्या दोन कार्यांमुळे तिखट रस लठ्ठपणा कमी करतो तसेच रक्‍तातील चरबी अर्थात कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइड्‌स वगैरेही योग्य स्वरूपात घेतलेल्या तिखट रसाने कमी होतात.


तिखट रसाच्या अतिरेकाने वात-पित्त दोष प्रमाणाबाहेर वाढल्याने धातूंची ताकद कमी होते. विशेषतः शुक्रधातू कमी होतो, शोष पडतो, तहान लागल्यावर कितीही पाणी प्यायले तरी समाधान होत नाही, चक्कर येते हातापायाचे तळवे, डोळे किंवा संपूर्ण शरीराचाही दाह होतो. वातप्रकोपामुळे कंप सुटतो, पाठ कंबर दुखावयास लागतात. शरीरातील मांसपेशी, स्नायू वगैरे आकुंचित पावतात. म्हणून नुकसान न होता केवळ फायदाच होईल अशा बेताने तिखट पदार्थ खाणे चांगले.


हिंग, मिरे, सुंठ, पिंपळी, मिरची, विडंग, लसूण, ओवा, बिब्बा ही तिखट रसाची द्रव्ये होत.


कडू रस - कडू चव सहसा आवडणारी नसते मात्र त्यामुळे जीभ मुख, स्वच्छ झाले की इतर रसांची चव अधिक चांगल्या प्रकारे लागते. कडू रस शरीरात शीतता निर्माण करतो तसेच कडू रस लघु, सूक्ष्म व रुक्ष गुणांचा असतो. कडू रस कफाचे शमन करतो, पित्तशमन करतो, मात्र वात वाढवतो.


कडू रस मुखातील व घशातील मलरूप कफाचा नाश करून तोंडाला चव देतो. उदा. कडुनिंब. योग्य प्रमाणात घेतला असता कडू रस जंत नाहीसे करतो. पोटातील जंत तसेच जखमेतील इन्फेक्‍शन कडू रसामुळे नष्ट होते. म्हणजे कडू रसाने जंत नाहीसे होतातच पण पुन्हा होण्यास प्रतिबंध होतो. उदा. हळद, वावडिंग. उचित प्रमाणात घेतलेला कडू रस रक्‍तधातूतील पित्तदोषाचे शमन करून रक्‍तशुद्धी करतो, तसेच शरीरात आम म्हणजे अपचनामुळे तयार झालेले विषद्रव्य वाढले असता कडू रस आमपचन करून शरीरातील विषारांना कमी करतो. उदा. चंदन, नागरमोथा. कडू रस आमाचे पचन करत असल्याने तापावर सर्वश्रेष्ठ होय. विशेषतः उपवास, हलके अन्न, घाम आणणे वगैरे उपचारांनंतरही शिल्लक राहिलेला आम पचवण्याचे काम कडू रस करू शकतो. विशेषतः पित्त व कफ असंतुलनातून व अपचनातून आलेल्या तापावर कडू रसाचा चांगला उपयोग होताना दिसतो. उदा. गुळवेल, नागरमोथा. कडू रस आकलनशक्‍ती वाढवतो. अर्थात योग्य प्रमाणात कडू रसाची द्रव्ये घेतल्यास विकृत किंवा अवास्तव वाढलेला कफदोष, जो बुद्धीला जड करतो, कमी होतो व ग्रहणशक्‍ती वाढते. उदा. शंखपुष्पी. अंगावरच्या दुधाची शुद्धी करणे हा कडू रसाचा एक महत्त्वाचा उपयोग आहे.


कडू रसाच्या अतिरेकाने धातूक्षय होऊन विविध घोर, कष्टकारक वातव्याधी होतात त्यामुळे कडू रस प्रमाणात घेणेच श्रेयस्कर होय वाळा, चंदन, कडुनिंब, हळद, दारुहळद, नागरमोथा, गुळवेल, मेथी, कारले, कडू पडवळ, कुटकी वगैरे कडू रसाची उदाहरणे होत.


तुरट रस - जीभ जड करणारा, तोंड सुकवणारा व छातीमध्ये आवळले गेल्याची भावना प्रतीत करणारा तो तुरट रस होय. शीत वीर्याने व रुक्ष गुणामुळे तुरट रस वातदोष वाढवतो, मात्र पित्तदोषाचे शमन करतो. रुक्ष गुणांनी कफदोष कमी करतो.
तुरट रसाचे स्तंभन हे मुख्य कार्य आहे. शीत वीर्यामुळे व गुरू गुणामुळे शरीरातील कोणत्याही द्रवाची अतिप्रवृत्ती थांबवण्याचे काम हा रस करू शकतो. जुलाब किंवा उलट्या होत असल्यास, कोठूनही अतिरक्‍तस्राव होत असल्यास, घाम जास्ती येत असल्यास, मूत्रप्रवृत्ती अत्याधिक प्रमाणात होत असल्यास तुरट रसाची द्रव्ये उपयोगी पडतात. उदा. मलप्रवृत्ती बांधून होत नसल्यास तुरट रस वापरला जातो उदा. जायफळ, आंब्याची कोय. योनीमार्गातून अति प्रमाणात रक्‍त जात असल्यास तुरट रसाची धायटी उत्कृष्ट काम करते. जखमेमध्ये पाणी, पू झाल्यास जखम भरून येत नाही, अशा वेळेस तुरट रसाची द्रव्ये पू व पाणी शोषून घेतात व व्रणशुद्धी करतात. तसेच गुरू व शीत गुणामुळे जखम भरून आणण्यास मदत करतात. उदा. हळद, अर्जुन, मध. तुरट रस रक्‍तधातूतील अतिरिक्‍त पित्तदोषाचे शमन करवून शुद्धी होण्यास मदत करतो. त्यामुळे या रसाची द्रव्ये अनेक त्वचाविकारात उपयोगी पडतात. अभ्यंगानंतर त्वचेवरील तेलाचा ओशटपणा घालवण्यासाठी स्नान करताना तुरट रसाची द्रव्ये वापरतात. उदा. आवळा, हिरड्याचे चूर्ण, मसुराचे पीठ. अतिप्रमाणात घाम येत असल्यास तुरट रसाच्या द्रव्यांचा उटणे म्हणून वापर करतात. उदा. चंदन, तुरटी. तसेच त्वचेला प्राकृत घट्टपणा आणण्यासाठी तुरट रस उपयोगी पडतो. उदा. चंदन, डाळिंबाच्या सालीच्या चूर्णाचा लेप लावल्यास त्वचा सुरकुतण्यापासून प्रतिबंध होतो तसेच त्वचा चमकदारही होते.


तुरट रस षड्रसांमध्ये सर्वांत शेवटचा सांगितला आहे. कारण तो सर्वांत कमी प्रमाणात सेवन करायचा रस आहे. तुरट रस अतिप्रमाणात घेतल्यास वात वाढतो, वाढलेला वात धातुक्षय करतो व त्यामुळे अनेक त्रास संभवतात. मलावरोध, गॅसेस त्यामुळे छातीत अस्वस्थता प्रतीत होऊ शकते, वजन कमी होणे, ताकद कमी होणे, शुक्राणू नष्ट होणे, कंबर, पाठ, सांधे वगैरे अवयवांच्या ठिकाणी वेदना होणे यासारखे त्रास होऊ शकतात.


सुपारी, काथ, मध, तुरटी, कच्चा पेरू,आवळा, जांभूळ, कच्चे कवठ, उंबर, हिरडा, बेहडा, प्रवाळ ही कषाय रसाची उदाहरणे होत.


तेव्हा प्रत्येक रस शरीराला निश्‍चितच आवश्‍यक आहे, मात्र प्रत्येकाचे प्रमाण आयुर्वेदाने सांगितलेल्या क्रमानुसार योजावे. मधुर रस पहिला आहे तो सर्वाधिक असावा. कडू, तुरट शेवटच्या चवी आहेत त्यांचे प्रमाण मधुर रसाच्या तुलनेत नक्कीच कमी ठेवावे. कोणत्याही चवीचा अतिरेक मात्र करू नये किंवा एखादी चव आवडत नाही म्हणून पूर्णतः टाळूही नये.


आहारद्रव्ये व औषधद्रव्ये दोघांचीही योग्य योजना करण्यासाठी त्यांच्या रसांची माहिती असावी लागते. स्वयंपाकाचा बेत आखताना गृहिणीने व औषधांची योजना करताना वैद्याने रसांचे फायदे तोटे ध्यानात ठेवले तर आरोग्य राखणे अवघड जाणार नाही.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com