स्त्रीपर्व

स्त्रीपर्व

पूर्ण स्त्रीपर्वामध्ये म्हणजे स्त्रीच्या वयात येण्यापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत थोडी जरी अस्वस्थता किंवा विकृती निर्माण झाली तर स्त्रीच्या आनंदी आणि कार्यक्षम आयुष्यावर विपरित परिणाम होतो. सामान्यतः आढळून येणाऱ्या मासिक पाळी संबंधित तक्रारींवर होमिओपॅथी हमखास गुणकारी ठरते.

वेदनामय पाळी
ही तक्रार नुकत्याच वयात आलेल्या तरुण मुलींमध्ये मुख्यत्वे दिसून येते. ओटीपोटात प्रचंड दुखणे, जुलाब होणे, मळमळणे, थकवा अशा तक्रारींचा पाळीच्या पहिल्या दोन दिवसांत अक्षरशः कहर होतो. तरुण स्त्रियांमध्ये अंतर्गत दोष नसूनसुद्धा अशा तक्रारी दिसून येतात. प्रौढ स्त्रियांमध्ये मात्र अशा तक्रारी दिसून आल्यास गर्भाशयातील आवरणाची वाढलेली जाडी, गिर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन, फ्रायक्रॉइड्‌स ही कारणे असू शकतात. ज्यासाठी काही चाचण्या आवश्‍यक ठरतात. व्यक्तीचा आणि तिच्या तक्रारींचा सर्वांगीण विचार करून होमिओपॅथिक औषधे दिली गेल्यास पाळीतील वेदना व जुलाबासारख्या तक्रारी थांबवता येतात आणि त्या काळातही स्त्री कार्यक्षम राहू शकते. असे दिसून आले आहे की नियमित व्यायाम करणाऱ्या स्त्रियांमध्ये अशी तक्रार कमी आढळून येते. त्यामुळे व्यायामाला  पर्याय नाही.

पी.एम.एस.
या तक्रारींना प्री मेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम म्हणजे पाळीच्या आधी होणारा त्रास असे म्हणतात. यात मानसिक व शारीरिक दोन्हीही प्रकारच्या तक्रारी दिसून येतात. चेहऱ्यावर मुरूम पुटकुळ्या येणे, स्तन दुखणे, जड होणे, पोट वाताने फुगल्यासारखे वाटणे, थकवा, चिडचिड आणि मानसिक अस्थिरता या प्रकारचे त्रास पाळी यायच्या आधी सहा-सात दिवस अगदी शिगेला पोचतात व मासिक रक्तस्राव सुरू झाल्यावर कमी कमी होत जातात. यामागील नेमके कारण ज्ञात नसले तरी हार्मिनल असंतुलनामुळे हे होत असावे, असा कयास आहे. मीठाचे प्रमाण आहारात कमी ठेवणे, नियमित व्यायाम, शांत मन याबरोबरच बेलाडोनी, लॅक कॅन यासारखी अनेक होमिओपॅथिक औषधे या तक्रारींवर मात करू शकतात.

पाळीतील अतिरक्तस्राव
साधारणतः सात दिवसांपेक्षा जास्त दिवस मासिक रक्तस्राव होणे, दर एक तासाने सॅनिटरी नॅपकिन बदलायला लागणे, रात्रीही मध्येच बदलण्याची गरज भासणे, रक्तस्रावात मोठ्या गाठी जाणे - इतक्‍या रक्तस्रावामुळे दैनंदिन कामे करणेही शक्‍य होते. या सर्व गोष्टींचा अंतर्भाव अतिरक्तस्रावात होतो. पाळीतील या अतिरक्तस्रावामुळे हिमोग्लोबीनची पातळी कमी होणे, दम लागणे ही लक्षणेही स्त्रीला जाणवतात.

अशा प्रकारच्या रक्तस्रावाची कारणे मानसिक चिंता, ताणतणाव, गर्भाशयाच्या आतील श्‍लेष्मल आवरणाची जाडी वाढणे, फायब्रॉइड्‌स अशी असू शकतात. डिस्फन्क्‍शनल युटेराइन ब्लिडिंग (dysfunctional uterine bleeding) म्हणजे अंतःस्त्रावी ग्रंथींच्या असंतुलनामुळे होणारा अतिरक्तस्राव हे सर्वांत जास्त स्त्रियांमध्ये आढळून येणारे कारण आहे.

कोणतीही दृश्‍य विकृती नसूनही केवळ हार्मोनल असंतुलनामुळे हा त्रास उद्‌भवतो. मनातील ताण, चिंता या सर्वांचा प्रभाव, मेंदूतील हायपोथॅलॅमस या भागावर पडतो. हायपोथॅलॅमसचा पिट्युटरी या अंतःस्त्रावी ग्रंथीवर पूर्णपणे ताबा असतो. भावभावनांमुळे हायपोथॅलॅमसचे कार्य बदलणे, त्याचा प्रभाव पिट्युटरीच्या स्रावांवर होणे साहजिकच असते. मनाने आनंदी, ताणविरहित राहणे, सतत कार्यलग्न राहणे, स्थूलतेकडे वेळीच लक्ष देणे या गोष्टींनी असे असंतुलन कमी होते, तरीही औषधांची मदत इथे आवश्‍यक ठरते. होमिओपॅथीत विशेषतः डिस्फन्क्‍शनल युटेराइन ब्लिडिंगवर उत्तम औषधे आहेत, जी  मनाचे, शरीराचे असंतुलन सुधारून ही तक्रार बरी करतात. फायब्रॉइडच्या बाबतीत शस्त्रक्रिया अटळ असली तरी मधल्या काळात रक्तस्राव कमी करण्यासाठी व शस्त्रक्रिया लांबविण्यासाठी होमिओपॅथी मदत करते.

रजोनिवृत्ती 
हा स्त्रीच्या पाळीपर्वातील अखेरचा टप्पा! पाळीचे चक्र ओव्हरिजमधील बीजांडे संपल्यामुळे हळूहळू थांबत जाते आणि आपोआप इस्ट्रोजेन नावाचे हार्मोन जे तिला ‘स्त्री’त्व देते तेही नाहीसे होते. हे हार्मोन शरीरात बऱ्याच ठिकाणी काम करत असल्यामुळे त्याचे प्रमाण कमी होणे किंवा नाहीसे होणे हे अनेक लक्षणांमधून स्त्रीला जाणवते. झोप कमी येणे, भावना विवशता वाढणे, वजन वाढणे, योनीमार्ग कोरडा होणे, गरम वाफा येणे, हाडे ठिसूळ होणे या सगळ्या गोष्टींमुळे हा टप्पा थोडा क्‍लेशकारक होतो खरा!

हा पाळीपर्वातील अखेरचा टप्पा असला तरी आयू यातचा अखेरचा टप्पा नव्हे! यापुढेही स्त्रीची कार्यशीलता, उत्साही वाटचाल तेवढीच नव्हे, तर त्याहीपेक्षा जास्त वाढू शकते. हे शरीराबरोबरच मनाच्याही परिपक्वतेचे आयुष्यातील वळण आहे, अशा सकारात्मक दृष्टीनेच आपण याचा विचार केला पाहिजे. या वळणावरची स्त्रीची जिवाभावाची मैत्रीण बनू शकते होमिओपॅथी!

वर सांगितलेल्या सर्व लक्षणांचा होमिओपॅथीत अंतर्भाव होतो आणि या सर्व तक्रारींवर उपाय करून होमिओपॅथिक औषधे तुमच्या आयुष्याचा हा हिस्सा अगदी आनंदी बनवू शकतात.

सारांश काय ! स्त्री निरोगी आणि आनंदी, तर कुटुंब आणि समाज निरोगी आणि प्रसन्न! आणि स्त्रीची प्रसन्नता आयुष्याच्या अनेकविध वळणांवर होमिओपॅथी टिकवून ठेवू शकते. तिची सखी बनून तिचे आयुष्य अधिक हसरे आणि आनंदी बनवू शकते.

१४.३ टक्के - मासिक पाळी सुरू होण्याच्या काळात त्रास
४.९ टक्के- युवावस्थेच्या काळात त्रास
२७.८ टक्के - मेनॉपॉजच्या काळात त्रास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com