दीपावलीनंतर

दीपावलीनंतर

दीपावली ही खरी अंतर्बाह्य स्वच्छतेची घेतलेली शपथ; कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता शांतपणे, श्रद्धेने जगण्याची घेतलेली शपथ. दिवाळीनंतर भीतीचे वातावरण सोबत घेऊनच नवीन वर्ष सुरू होत असेल, तर ते टाळले पाहिजे. भीतीशिवाय संपूर्ण वर्ष जगले तरच ते आनंदात व ताणरहित गेले असे म्हणायचे. एकमेकांमध्ये प्रेमभावना वाढवून आनंदात, उत्कर्षात, आरोग्याचा अनुभव घेत वर्ष गेले, तर पुढच्या वर्षीची दीपावली उजळून निघेल. 

‘शुभ दीपावली’ या शुभेच्छा दीपावलीनंतरही येतच राहतात. या वर्षी दीपावली तर खूप आनंदात गेली. दीपावलीत सगळ्यांनी अनेक दिवे लावले. पण पुढच्या वर्षी संपूर्ण वर्षभर जे ‘दिवे लावले जातील’ त्यावरच २०१८ ची दीपावली आनंदात जाणार की नाही हे लक्षात येईल. 

एक गोष्ट खरी, की वसुबारसेला सवत्स गाईला गंध लावून तीळ, बाजरी व उडदाचे वडे खाऊ घालून पूजन केले. नवीन भांड्यात धण्यांचा नैवेद्य दाखवून, दाराशी दिवे लावून, धन्वंतरींना ओवाळून, त्यांचे पूजन करून धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला. सकाळी सूर्योदयापूर्वी दिवे उजळले, यमाला ओवाळले, नवीन वस्त्र परिधान करून नरकचतुर्दशीचा दिवस साजरा केला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धंद्यासाठी नवीन वह्यांची पूजा केली किंवा नवीन धंदा सुरू करायचा मानस असल्यास संकल्प नवीन वह्यांमध्ये लिहून त्यांची पूजा केली. घरातील पैशांचे व सोन्याचे लक्ष्मी म्हणून पूजन केले. सरप्राइज द्यायचे म्हणून सौभाग्यवतीसाठी पतीने आणलेली भेटवस्तू आणि सौभाग्यवतीने पतीसाठी आणलेली भेट दोघांनी एकाच ठिकाणी लपविल्यामुळे त्यातील सरप्राइजवर चांगलाच प्रकाश पडला. भाऊबिजेच्या दिवशी बऱ्याच दिवसांनी बहिणीकडे जाण्याचा योग आला, तिने जेवणासाठी टीव्हीवर दाखविलेल्या काही पाककृती केलेल्या असल्यामुळे शेवटी जास्त ताव वरण-भातावरच मारावा लागला. बहिणीसाठी नेलेली साडी तिला आवडल्यामुळे वादाचा प्रसंग टळला व खूप आनंद झाला. परदेशात एक बरे असते, तेथे सरळ भेटकार्ड देतात, अगदीच वाटले तर एखादी मेणबत्ती किंवा फोन ठेवण्यासाठी एखादी छोटी पिशवी, एखादा वेडावाकडा वाकविलेला चमचा (चमचा कसा वापरायचा याची विचारणा केल्यावर कळते की तो केवळ शोभेचा आहे) असे काही दिले जाते. भेट ही प्रेमाचे प्रतीक असते.

एखाद्या व्यक्‍तीला आपली आठवण होती हे समाधान त्या भेटीपासून नक्कीच होते. मित्र-मैत्रिणींचे खूप ग्रुप असतात. अनेक ग्रुप असल्यामुळे किती भेटी देणार? तेव्हा सर्वोत्तम म्हणजे भेटकार्ड देणे. पण ते प्रत्यक्ष व्यक्‍तिशः द्यावे. पोस्टात टाकलेले भेटकार्ड आठ दिवसांनंतर मिळाले तर त्यावर तारीख वगैरे नसल्यास ते पुढच्या वर्षीच्या दिवाळीसाठी जपून ठेवण्याची वेळ येते.

या वर्षाची दीपावली तर छान झाली. आता पुढच्या वर्षीच्या दीपावलीची वाट पाहायची. ती कशी उजळून निघेल, महागाई किती वाढेल, बॅंकेत जमविलेल्या रकमेवर किती व्याज जमा होईल, नोकरीमध्ये कितपत बढती मिळेल, बोनस किती मिळेल या सगळ्यांचा विचार आतापासूनच सुरू होतो. हे सगळे मनासारखे झाले नाही तर काय करायचे? मध्येच घरात एखादी व्यक्‍ती वाढली तर वाढणाऱ्या खर्चाला तोंड कसे द्यायचे? पहिल्या अपत्याला या वर्षी शाळेत घालणे गरजेचे आहे, तेव्हा रांगेत कोण उभे राहणार, प्रवेशाच्या वेळी देणगी किती व कशी द्यावी लागणार अशा प्रकारे पुन्हा भीतीचे वातावरण सोबत घेऊनच नवीन वर्ष सुरू होते. नाही का टाळता येणार ही भीती?

भीतीशिवाय संपूर्ण वर्ष जगले तरच ते आनंदात व ताणरहित गेले असे म्हणायचे. सर्व गोष्टींचा ताण घेतल्यानंतर येणारे आजार धन्वंतरींना दोन फुले वाहून जाणारे नसतात. धन्वंतरींनी अनेक शिष्य निर्माण केलेले असतात व त्यांच्याकडे बरेच दिवस औषधयोजना करून घ्यावी लागते. औषध असते वैद्यांचे व आशीर्वाद असतो धन्वंतरीचा. पण मुळात ताण कशाला घ्यायचा? 

दीपावलीपूर्वी स्वच्छ केलेले घर पुन्हा पंधरा दिवसांत अडगळीची खोली कशी काय होऊ शकते? बाहेर रस्त्यांवर पुन्हा कचरा दिसू लागतो. कुठला तरी संप चालू असल्यामुळे रस्त्यांवरचा कचरा उचलला न गेल्यामुळे दिवाळीत उडविलेल्या फटाक्‍यांच्या कचऱ्याची त्यात भर पडलेली असते. अशा वेळी स्वच्छतेत राहायचे तरी कसे? दीपावली ही खरी अंतर्बाह्य स्वच्छतेची घेतलेली शपथ; कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता शांतपणे, श्रद्धेने जगण्याची घेतलेली शपथ. 

वसुबारसेला माणसात मनुष्यत्व दाखविण्याची केलेली प्रतिज्ञा. मातेसमान, मातेच्या दुधाच्या तोडीचे दूध देणाऱ्या गाईचे उतराई होण्याच्या हेतूने तिला वसुबारसेच्या दिवशी वडे वगैरे खाऊ घालणे व नंतर ती दूध देत नाही या कारणास्तव उपाशी ठेवणे याचाही उपयोग नाही. दुधात भेसळ केल्यामुळे व गाईला दिलेल्या हार्मोन्सच्या इंजेक्‍शनचा दुधात प्रभाव आल्यामुळे आजार वाढला, यातूनच कॅन्सर झाला असे म्हणत राहण्यात काही अर्थ नाही. देशी गाईचे सकस दूध आपण घेतले तर ते अमृतासमान असते ही वसुबारसेच्या दिवशी मिळालेली माहिती प्रत्यक्षात आणता येईल. यासाठी काही मित्र-मित्र एकत्र येऊन शहरात वा ते शक्‍य नसल्यास शहराच्या बाहेर दहा-बारा गाई पाळून आपल्या गाईंचे अमृतासमान दूध आपल्याला मिळू शकेल. 

घर म्हणजे चार भिंती नसून ती एक वास्तू आहे व ते पांथस्थाला, मित्रमंडळींना त्यांच्या गरजेनुसार आसऱ्याचे स्थान आहे, घर हे आपल्या मित्रमंडळींना अपॉइंटमेंट न घेता येण्याचे ठिकाण आहे अशा तऱ्हेने घराची व्यवस्था झाली, तर धनत्रयोदशी साजरी केल्याचा पुढे फायदा होऊ शकेल.

कष्ट करून, घाम घाळून केवळ चार पैसेच नव्हे, तर कोट्यवधी रुपये मिळविता येतात, पण त्यासाठी हातांबरोबर डोकेही चालवावे लागते. देवाचे आशीर्वाद असले तरी चार मित्रांचे मदतीचे हात पुढे आलेले असावे लागतात. श्रमप्रतिष्ठा सांभाळून वस्तूचे कष्टार्जन मूल्य वाढवून आलेल्या लक्ष्मीचे आपल्याला पूजन करायचे आहे हे लक्षात ठेवून आपला नोकरी-धंदा सचोटीने करत राहणे, अडीअडचणीला गरजूंना मदत करणे, ज्यांना पैशांची  अडचण आहे त्यांना आपल्या मिळकतीतील विशिष्ट रक्कम दान करणे, अन्नदान-ज्ञानदान या गोष्टींसाठी काही रक्कम खर्च करणे आवश्‍यक असते. असे सगळे केल्यानंतर आपल्याजवळच्या लक्ष्मीचे पूजन हे खरे लक्ष्मीपूजन. आणि घरातील ‘लक्ष्मी’चे पूजन म्हणजे स्त्रीप्रतिष्ठेचे पूजन. स्त्रीला सन्मान देणे आवश्‍यक असते, कारण संपूर्ण घराच्या चाव्या तिच्या हातात असतात, कुटुंबासाठीचे महत्त्वाचे सर्व निर्णय तिलाच घ्यायचे असतात. स्त्रीचे पूजन करताना तिच्या डोक्‍यात सोन्याची फुले घालायची असतात. 

अशा प्रकारे एकमेकांमध्ये प्रेमभावना वाढवून आनंदात, उत्कर्षात, आरोग्याचा अनुभव घेत वर्ष गेले तर पुढच्या वर्षीची दीपावली उजळून निघेल आणि वर्षभर काय दिवे लावले याची आठवण काढत बसण्यापेक्षा दीपावलीचे दीप प्रत्यक्षात उजळून निघतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com