दीपावलीनंतर

दीपावलीनंतर

दीपावली तना-मनाला चैतन्यस्पर्श करीत आली होती. अंतर्बाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटवत आली होती. कफदोष आणि मेदाचे विलयन करीत आली होती. दीपावलीनंतर हे सारे टिकवायचे आहे. भारतीय संस्कृतीने या सणामागे केलेला आरोग्यविज्ञानाचा विचार लक्षात घेतला, तर आपण आपले, कुटुंबीयांचे, शेजाऱ्यांचे आरोग्य सांभाळू आणि पर्यावरणाचेही रक्षण करू.

दीपावलीची तयारी करता करता ती कधी आली व कशी संपली हे कळतच नाही. घराची स्वच्छता, सजावट, फराळाची तयारी, नवीन कपडे, नवीन वस्तूंची खरेदी, पणत्या, आकाशकंदील हे सर्व जमा होईपर्यंत सुट्या सुरू होतात. त्या त्या दिवशीच्या पूजा, ओवाळण्या, एकमेकांना भेटवस्तू देता देता दीपावली तर संपून जाते, पण तिच्यामुळे मिळालेली ऊर्जा, वाढलेली तेजस्विता आणि आरोग्यपूर्ण दिनक्रमाची झालेली सुरवात तशीच टिकवून ठेवणे हे मात्र आपल्या हातात असते. 

भारतीय परंपरेने योजलेले सर्व सण, उत्सव हे आरोग्याला हातभार लावणारे असतात. दीपावली हा तर सर्वांत मोठा सण, तो साजरा करताना अनेक आरोग्यसवयी आपोआप रुजत जातात. उदा. दीपावलीच्या चार मुख्य दिवशी म्हणजे नरकचतुर्दशीपासून ते भाऊबिजेपर्यंत अभ्यंग करण्याची पद्धत असते. पत्नीने पतीला, बहिणीने भावाला, मोठ्यांनी लहानांना अशा प्रकारे घरातील सर्वांनी स्नानापूर्वी अभ्यंग केला जातो. एकमेकाला अभ्यंग करण्याने नातेसंबंध दृढ व्हायला मदत मिळते हे खरे, पण नंतर वर्षभर स्वतःला अभ्यंग करण्याचाही शुभारंभ असतो. आयुर्वेदातही ‘अभ्यंगं आचरेत्‌ नित्यम्‌’ असे सांगितलेले आहे. नियमित अभ्यंगाचे इतर फायदे याप्रमाणे असतात, 
सुस्पर्शोपचिताङ्‌गश्‍च बलवान्‌ प्रियदर्शनः । 
भवत्यभ्यङ्‌गनित्यत्वात्‌ नरोऽल्पजर एव च ।।
...चरक सूत्रस्थान
नियमित अभ्यंगाने त्वचा कोमल होते, सर्व अंगप्रत्यंग उचित म्हणजे हवे तसे सौष्ठवपूर्ण होतात, ताकद वाढते व ती व्यक्‍ती सुंदर, दर्शनीय होते. नियमित अभ्यंग करणाऱ्या व्यक्‍तीचे वय वाढले तरी वृद्धत्वाची लक्षणे अल्प मात्रेतच प्रकट होतात. अर्थातच वृद्धत्वापाठोपाठ येणारे कष्ट, त्रास यांना प्रतिबंध होतो. 
हे सर्व फायदे मिळण्यासाठी तेलही औषधांचा विधिपूर्वक संस्कार करून तयार केलेले असावे लागते. त्वचेतून आतपर्यंत जिरणारे, फक्‍त त्वचेलाच नाही तर संपूर्ण शरीराला उचित स्निग्धता देण्यास सक्षम असणारे अभ्यंग तेलासारखे तेल वापरणे श्रेयस्कर होय. 
अभ्यंगस्नानात अभ्यंगाबरोबरच उटण्याचाही समावेश असतो. 
उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलायनम्‌ । 
स्थिरीकरणमानां त्वक्‌ प्रसादकरं परम्‌ ।।
उटण्याने अनावश्‍यक, मलरूप कफदोष स्वच्छ होतो. मेदाचे विलयन झाल्याने लठ्ठपणा कमी होतो. त्वचा प्रसन्न अर्थात स्वच्छ, मऊ, नितळ व तेजस्वी होते. अकाली सुरकुत्या पडत नाहीत आणि सर्व अवयव रेखीव व स्थिर दिसतात.
तेलात किंवा दुधात उटणे कालवून संपूर्ण अंगाला लावता येते व कोमट पाण्याने स्नान करता येते. उटणे लावण्याने अतिरिक्‍त प्रमाणात येणाऱ्या घामाचे प्रमाण कमी होते आणि उटण्यातील सुगंधी द्रव्यांमुळे मनही प्रसन्न होते. चंदन, अगरू, वाळा, हळद यांसारख्या सुगंधी, कांतिवर्धक द्रव्यांनी युक्‍त उटणे आपल्या व पर्यावरणाच्या आरोग्यासाठीही शंभर टक्के सुरक्षित असते. अशा प्रकारच्या अभ्यंगस्नानाने ताजेतवाने वाटते, उत्सवाचा उत्साह येतो, शिवाय पुढील आयुर्वेदोक्‍त फायदेही मिळतात. 
दीपनं वृष्यमायुष्यं स्नानमूर्जाबलप्रदम्‌ । 
कण्डु-मल-श्रम-स्वेद-तन्द्रा-तृड्‌-दाहपाप्मजित्‌ ।।
स्नानामुळे शरीरातील अग्नी प्रदीप्त होतो. शरीरशक्‍ती, वीर्य यांची वृद्धी होते. दीर्घायुष्याचा लाभ होतो. त्वचेवरील मळ-घाम-कंड यांचा नाश होऊन श्रमाचा परिहार होतो. आळस दूर होतो, घशाला पडणारी कोरड कमी होते, शरीरदाह थांबतो आणि पापांचा म्हणजेच रोगांचा नाश होतो.
ऋतूचा विचार करता पावसाळ्यानंतर हिवाळ्याची सुरवात होते, त्या हिवाळ्याच्या सुरवातीच्या दिवसांत दिवाळी येते. कोजागरीच्या आसपास रात्री थंड व्हायला सुरवात झालेली असतेच, दिवाळीमध्ये दिवसही आल्हादायक होऊ लागलेले असतात. आयुर्वेदाने सांगितलेल्या ऋतुचर्येचा विचार करता दीपावलीचा सण विसर्गकाळात येतो. आयुर्वेदाने विसर्गकाळाचे वर्णन याप्रकारे केलेले आहे. 
दक्षिणाभिमुखेऽर्के कालमार्गमेघवातवर्षाभिहतप्रतापे, शशिनिचाव्याहतबले, माहेन्द्रसलिलप्रशान्तसन्तापे जगति, अरुक्षा रसाः, प्रवर्धन्तेऽम्ललवणमधुरा यथाक्रमं तत्र बलमुपचीयते नृणामिति ।।
....चरक सूत्रस्थान
या दिवसांत सूर्य क्रमाक्रमाने सौम्य होत जातो, वायूची रुक्षता कमी होते, चंद्राची शीतलता वाढत जाते, त्यामुळे तो सर्व प्राणिमात्रांना, धन-धान्य वनस्पतींना तृप्त करण्यास समर्थ असतो, निसर्गातही मधुर, लवण, आम्ल या रसांची अभिवृद्धी होते आणि मनुष्याच्या शरीरात क्रमाक्रमाने ताकद वाढू लागते. याला हातभार लावण्याच्या दृष्टीने दिवाळीच्या या दिवसांत अनारसे, करंजी, लाडूसारखे गोड पदार्थ तसेच चकली, शेव, चिवड्यासारखे तिखट पदार्थ आवर्जून बनवले जातात व खाल्ले जातात. पावसाळ्यानंतर हळूहळू प्रदीप्त होणाऱ्या अग्नीला साजेसा असा हा दीपावलीतील आहार असतो.
दीपावलीच्या निमित्ताने फराळाची सुरवात होते, पण नंतरही संपूर्ण विसर्गकाळात म्हणजे शिशिर ऋतू संपेपर्यंत धातुपोषक रसायने, रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत करणारे पदार्थ नियमित सेवन करण्याची सवय लावून घ्यायची असते. यात आयुर्वेदातील रसायने सर्वोत्तम असतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविलेला च्यवनप्राश, धात्री रसायन, अमृतप्राश, सुहृदप्राश ही रसायने, पंचामृत, बदामासारखे आहारपदार्थ यांना रोजच्या दिनक्रमात समाविष्ट करण्याने रोग दूर राहण्यास, आरोग्यपूर्ण जीवन जगण्यास हातभार लागत असतो. 

पावसाळ्यातील मरगळ दूर करण्यासाठी जणू दीपावली येते आणि शरीर-मनाला चैतन्यस्पर्श करून जाते. हे चैतन्य नंतरही टिकवायचे असेल तर नियमित व्यायाम, योगासने, चालणे, दीर्घश्वसनादी श्वसनक्रिया यांचा सराव करणे उपयुक्‍त असते. हवामानातील बदलामुळे प्रदीप्त होत असलेल्या अग्नीला यामुळे प्रेरणा मिळते, पर्यायाने आरोग्य सुरक्षित राहणे शक्‍य होते. दीपावलीत केलेली घराची स्वच्छता हीसुद्धा आरोग्याला पूरक असते. याचीच पुढची पायरी म्हणून परिसर स्वच्छ ठेवणे, रस्त्यावर कचरा न टाकणे, सध्याची कचऱ्याची समस्या लक्षात घेता ओला कचरा, सुका कचरा वेगळा करणे, प्लॅस्टिकसारख्या पर्यावरणाला, पर्यायाने आपल्या आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या गोष्टींचा वापर मर्यादित करणे तसेच वापर करावा लागला तरी त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे होते आहे का याकडे लक्ष ठेवणे, घराची-परिसराची साफसफाई करताना विषारी केमिकल्सचा वापर न करणे, पॅराफिनच्या मेणबत्त्या न वापरता तेलाचे दिवे लावणे, रासायनिक सुगंधापासून तयार केलेल्या उदबत्त्या न वापरता नैसर्गिक तेल, अत्तरांपासून तयार केलेल्या उदबत्त्या लावणे, घर-अंगणात धूप करणे अशा कितीतरी सवयी दीपावलीच्या निमित्ताने लावून घेता येतात आणि त्यातून आरोग्य रक्षणास मदत मिळत जाते. 

अशा प्रकारे दीपावली साजरी करण्यामागचा भारतीय संस्कृतीचा उद्देश लक्षात घेतला, परंपरांमागचे विज्ञान समजून घेतले, तर दीपावली संपून सुरू झालेल्या नवीन वर्षात आपण आपले स्वतःचे, आपल्या कुटुंबीयांचे, शेजारी राहणाऱ्यांचे, इतकेच नाही तर पर्यावरणाचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com