श्री भगवान बुद्धप्रार्थना

Representational Image
Representational Image

इंद्रियांनी आणलेली माहिती पहिल्यांदा असते मनाच्या ताब्यात. मन त्या माहितीची तोडफोड करत राहते, कारण मन ज्या इंद्रियाला वश असेल त्या इंद्रियाच्या सुखाचा विचार करते आणि त्या दृष्टीने मन आलेल्या माहितीचे भाग पाडते. मग बुद्धी व विवेक कामाला येतात. जीवात्म्याच्या फायद्याचे काय आहे याचा अत्यंत जागृत अवस्थेत बुद्धीने निर्णय घेणे म्हणजे विवेक. विवेक निर्णय घेण्याचे कार्य करतो.

‘संगतिसंगदोषेण’ म्हणतात तसे बुद्धीसुद्धा मनाच्या सहवासात राहून तिची दुर्बुद्धी झालेली असते. अशी बिघडलेली बुद्धी मनाला वश होते आणि मनाच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेतला जातो. बहुतेकांचा जीवनव्यवहार असाच चालतो. असे चुकीचे निर्णय घेत राहिल्यास नंतर भोगावे लागतात आजार, दारिद्य्र व दुःख.

बुद्धीला शुद्ध करण्यासाठी भगवंतांची आराधना करून म्हणजेच मन एकाग्र करून आत्मचिंतनाकडे वळवणे आवश्‍यक असते. असे झाल्याशिवाय बुद्धीवर अंकुश येऊ शकत नाही. इंद्रियाच्या मार्फत ज्ञान मिळणार असले, तरी इंद्रियांच्या वैयक्‍तिक सुखापेक्षा आत्मसुख हे सर्वांत मोठे असते. आणि आत्मसुख हाच शरीराचा मुख्य मानद होय. आत्म्याच्या सुखासाठीच सर्व व्यवहार करणे आवश्‍यक असते. परंतु आत्मचिंतनावर मन एकाग्र करणे सोपे नाही. व्यक्‍तीला स्वतः विषयाचा विचार करणे आवश्‍यक असते. एखाद्या व्यक्‍तीला श्रीखंड आवडत नसेल, तर श्रीखंडात दोष आहे असे सिद्ध करण्याचा मन प्रयत्न करते. परंतु दोष व्यक्‍तीत असू शकतो. तेव्हा स्वतःचे दोष पाहायला शिकणे आवश्‍यक असते. स्वार्थातून बाहेर पडण्यासाठी नेहमी दुसऱ्याला मदत करणे प्रभावी ठरते. ही मदत आर्थिकच असावी असे नाही तर एखाद्याला वेळीच धीर देणे, वृद्ध व्यक्‍तीला जिना चढता-उतरताना हात देणे, दुसऱ्याला त्रास न देणे ही सुद्धा एक प्रकारची मदतच आहे, समाजासाठी काहीतरी चांगले करणे, हे सगळे जमले नाही तर निदान स्वतःचा व्यवसाय इमाने इतबारे करणे, पैशाच्या मागे लागून स्वतःच्या व्यवसायात गैरव्यवहार, भ्रष्टाचार होऊ न देणे अशा तऱ्हेची काही बंधने आखून घ्यावी लागतात. यात देशानुसार, व्यक्‍तीच्या लिंगानुसार, व्यक्‍तीच्या वयानुसार फरक होऊ शकतो. शेजारचे दार उघडे असले तर सात वर्षांचा मुलगा ते लोटून घेऊ शकतो, ही मदतच आहे. मदत करणे, दान देणे हे शब्द आपल्या कामाचे नाहीत असे समजून त्यांना आपल्या जीवनातून हद्दपार करणे योग्य नाही. मदत करणे, दान देणे ही मनाची प्रवृत्ती आहे आणि भारतीय संस्कार हे अशी प्रवृत्ती तयार करण्यासाठी केलेले एक प्रकारचे कर्मकांड किंवा उपचार आहेत.

अशा प्रकारे हलके हलके अंतर्मुखता तयार झाली की बाह्य वस्तूत सुख असते तसे दुःखही असते, बाह्य वस्तूंपासून मिळणारे सुख अल्पकाळ टिकणारे असते व त्यातून निर्माण होणारे दुःख माणसाकडून उगाळत राहिल्यामुळे फार काळ टिकणारे असते असे लक्षात येऊ शकते. तेव्हा अंतर्मुखता आली की प्रज्ञा जागृत होते व ही प्रज्ञा विवेक करत असता बुद्धीवर लक्ष ठेवते आणि अशी बुद्धी आत्म्याचे, व्यक्‍तीचे, देशाचे, जगाचे कल्याण करण्याच्या वेगवेगळ्या योजना देऊ शकते. 

औषधांच्या जाहिरातींमध्ये साधारणतः सर्दी, खोकला, पोटातील गॅस, पचन, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी वगैरेंवर उपयोगात आणण्यासाठीच्या औषधांचा भरणा जास्त असतो. शरीर चांगले राहावे म्हणून विकल्या जाणाऱ्या औषधांमध्ये उंची वाढवणे, केस बळकट करणे, चेहरा गोरापान करणे, कांती सोन्यासारखी करणे, पायात ताकद आणणे वगैरेंच्या जाहिराती दिसतात. परीक्षेच्या हंगामामध्ये विद्यार्थ्यांच्या स्मृतीची आठवण होऊन त्यासाठी औषधांच्या जाहिराती केल्या जातात. थेंबे थेंबे तळे साचते, त्यासाठी काही काळ जावा लागतो. तसे स्मृती ही मेंदूची धनसंपत्ती एका दिवसात तयार होत नाही. तेव्हा मेंदूच्या औषधांच्या जाहिराती केवळ परीक्षांच्या काळात येऊन काय उपयोग? 

तपश्‍चर्या करून, तमोगुणाला संपूर्णतः रजा देऊन, बुद्धीला प्रज्ञेच्या अंमलाखाली आणून श्री गौतम बुद्धांनी जगापुढे एक आदर्श ठेवला. त्या श्री गौतम बुद्धांचे स्मरण करत असताना त्यांच्या डोक्‍यावर असलेल्या जटाभाराकडे किंवा ऐकण्याचे इंद्रिय असलेल्या लांब कानांकडे आणि बाह्य गोष्टींकडे लक्ष केंद्रित न करणाऱ्या मिटलेल्या डोळ्यांकडे लक्ष जाते. या गोष्टी लक्षात ठेवून व बुद्धीला प्राधान्य देऊन श्री भगवान गौतम बुद्धांची उपासना केली तर जगातील गुन्हेगारी कमी होईल, मानसिक ताण कमी होईल, मारामाऱ्या कमी होतील, युद्धे कमी होतील. त्यामुळे मेंदूची काळजी घेणे प्रत्येकासाठी अपरिहार्य आहे. 

मेंदूची काळजी घ्या
काळजी घेण्यासाठी आयुर्वेदात वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना केलेल्या आहे, वेगवेगळी औषधे सुचवलेली आहेत. यांचा आपण या ठिकाणी वेगळा विचार करणार आहोतच. मेंदूला काही गोष्टींचे कुपथ्य असते. खोटे बोलणे, उष्णता, सतत जडाचा, पैशांचा विचार करणे, मला अधिकात अधिक सर्व मिळाले पाहिजे असा सतत विचार करणे वगैरे गोष्टी मेंदूला घातक ठरतात. स्नानाच्या वेळी डोक्‍यावर फार गरम पाणी घेऊ नये. खांद्याच्या खाली स्वतःला झेपेल त्या तापमानाचे गरम पाणी घ्यावे. स्नान झाल्यावर डोके टॉवेलने खसखसून पुसावे. त्या निमित्ताने डोक्‍याला मसाज होतो. दोन्ही कानशिलांवर, डोळ्यांवरच्या कपाळावर, टाळूवर, मानेच्या वरच्या भागाला सौम्य मसाज करून मेंदूला चेतना द्यावी. मेंदूचे कार्य मेंदूजलाच्या आरोग्यावर चालते. हे मेंदूजल शरीरभर संचार करेल व शुद्ध होईल याकडे लक्ष ठेवणे म्हणजे मेंदूचे कार्य नीट ठेवणे.

दिव्याच्या ज्योतीवर दिवसातून दहा मिनिटे त्राटक करणे सुद्धा मेंदूसाठी हितकर असते. बुद्धिरूपाने, विवेकरूपाने, खऱ्या खोट्याची समज देणारा असा आतमध्ये असणारा आत्मप्रकाश, आत्मज्योत म्हणून कार्यरत होण्यासाठी हा बाहेरचा निरांजनाचा प्रकाश उपयोगी पडतो. बोटांच्या अग्रभागाने आपण जशी दारावर टिकटिक करतो त्या प्रकारे रात्री झोपण्यापूर्वी डोक्‍यावर (मेंदूवर) मसाज करून स्वस्थ झोपावे. रात्रीचे जेवण कमी असावे, कारण पोटाला तडस लागली की झोप येत नाही. झोपेच्या वेळेत मेंदू खरा कार्यरत असतो आणि झोप व्यवस्थित लागली नाही की स्मरणशक्‍ती, मेंदूचे आरोग्य वगैरेंना बाधा पोचते. अशा प्रकारे मेंदूचे आरोग्य सांभाळणारे, शांतताप्रिय असे जे आहेत तेच खरे श्री भगवान बुद्धांचे भक्‍त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com