पथ्यापथ्य-रक्‍तपित्त

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

रक्तपित्तामध्ये रक्‍तधातू बिघडलेला असतो आणि पित्तदोष प्रकुपित झालेला असतो. या आजारात उपचार करताना शीतल औषधी द्रव्यांचा, तसेच आहारद्रव्यांचा वापर करायचा असतो. 

रक्‍तपित्त म्हणजे शरीरातील विविध मार्गांमधून रक्‍तस्राव होणे. उदा. नाकातून रक्‍त येणे, लघवीचे रक्‍त जाणे, तोंडातून रक्‍त येणे, इजा झालेली नसतानाही त्वचेखाली रक्‍त साकळणे वगैरे. यावर उपचार करताना शीतल औषधी द्रव्यांचा, तसेच आहारद्रव्यांचा वापर करायचा असतो. कारण या रोगात रक्‍तधातू बिघडलेला असतो. तसेच पित्तदोष प्रकुपित झालेला असतो. रक्‍तपित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्‍तींसाठी प्यायच्या पाण्यावर वाळा, चंदन, अनंतमूळ, वडाची साल, जांभळाची साल, रक्‍तचंदन वगैरे द्रव्यांचा संस्कार करायला सांगितला आहे. यासाठी ही द्रव्ये रात्रभर पाण्यात भिजवता येतात किंवा पाण्याबरोबर उकळता येतात. रक्‍तपित्तामध्ये पथ्य म्हणून पुढील योग सुचवले आहेत. 

मुद्गाः सलाजाः सयवाः सकृष्णाः सोशीरमुस्ताः ।
बलाजले पर्युर्षिताः कषाया रक्‍तं सपित्तं शमयन्त्युदीर्णम्‌ ।।
....चरक चिकित्सास्थान

बला वनस्पतीच्या काढ्यामध्ये मूग, लाह्या, जव, पिंपळी, वाळा, नागरमोथा व चंदन यांचे चूर्ण रात्रभर भिजत घालावे आणि सकाळी गाळून घेऊन प्यावे. 

वैदूर्यमुक्‍तामणिगैरिकाणां मृत्‌शंखहेमामलकोदकानाम्‌ ।
मधूदकस्येक्षुरसस्य चैव पानात्‌ शमं गच्छति रक्‍तपित्तम्‌ ।।
....चरक चिकित्सास्थान

वैडूर्यमणि, मोती, गैरिक, काळ्या मातीचे ढेकूळ, सुवर्ण, आवळा या गोष्टी रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी गाळून घेऊन पिण्याने रक्‍तपित्त दूर होते. या ठिकाणी मिळतील तेवढी द्रव्ये वापरली तरी हरकत नसते. तसेच मधाचे सरबत, उसाचा ताजा, स्वच्छ रस पिण्यानेसुद्धा रक्‍तपित्त शांत होण्यास मदत मिळते.

रक्‍तपित्तावर उशीरादि पेया
उशीरपद्मोत्पलचन्दनानां पक्वस्य लोष्टस्य च यः प्रसादः । 
सशर्करः क्षौद्रयुतः सुशीतो रक्‍तातियोगप्रशमनाय देयः ।।
....चरक चिकित्सास्थान

वाळा, कमळ, निळे कमळ, चंदन ही द्रव्ये भिजविलेल्या पाण्यात साखर व मध मिसळून पिण्याने रक्‍तपित्त दूर होते किंवा काळ्या मातीचे ढेकूळ तापवून पाण्यात भिजवून ठेवून वरचे स्वच्छ पाणी गाळून घेऊन त्यात साखर व मध मिसळून घेण्याने रक्‍तपित्त रोग शांत होतो, असे चरकसंहितेत सांगितले आहे.

रक्‍तपित्तामध्ये घ्यावयाचे विशेष पेय -
प्रियंगुका-चंदन-लोध्र-सारिवा-मधूक-मुस्ताभय-धातकीजलम्‌ ।
समृत्प्रसादं सह यष्टिकाम्बुना सशर्करं रक्‍तनिबर्हणं परम्‌ ।।
....चरक चिकित्सास्थान

प्रियंगू, चंदन, लोध्र, अनंतमूळ, ज्येष्ठमध, नागरमोथा, वाळा आणि धायटीची फुले ही द्रव्ये भिजवून, गाळून घेतलेले पाणी तसेच काळ्या मातीचे ढेकूळ तापवून पाण्यात विझवून, गाळून घेतलेले वरचे स्वच्छ पाणी आणि तांदूळ भिजवून ठेवलेले व नंतर गाळून घेतलेले पांढरट पाणी हे सर्व एकत्र करून बनविलेले पेय, त्यात साखर टाकून पिण्याने रक्‍तपित्त बरे होणे शक्‍य होते, असा पाठ चरकसंहितेत दिलेला आहे.

रक्‍तपित्तामध्ये घ्यावयाचे संस्कारित दूध -
रक्‍तपित्तामध्ये वारंवार रक्‍तस्राव होत असल्यास
बकरीचे दूध प्यावे किंवा
पाचपट पाण्याबरोबर उकळून घेतलेले गाईचे दूध घ्यावे किंवा
लघुपंचमुळासह (दशमुळातील पाच विशिष्ट वनस्पती) उकळलेल्या गाईच्या दुधात साखर व मध मिसळून घ्यावे. 
मनुकांबरोबर सिद्ध केलेले गाईचे दूध प्यावे. 
गोक्षुराच्या फळांनी संस्कारित गाईचे दूध प्यावे. 

रक्‍तपित्तामध्ये पथ्यकर आहारद्रव्ये : साठेसाळीचे तांदूळ, वरी, नाचणी, मूग, मसूर, मटकी, बकरीचे दूध, गाईचे दूध, तूप, गोड डाळिंब, आवळा, बडीशेप, शहाळे, कवठ, मनुका, खडीसाखर, उसाचा रस, साळीच्या लाह्या, गुलकंद वगैरे. 

रक्‍तपित्तामध्ये अपथ्यकर आहारद्रव्ये : मका, बाजरी, मेथी, शेवगा, वांगी, आंबट फळे, लसूण, मुळा, अति प्रमाणात मीठ, मद्यपान, तीळ, कुळीथ, उडीद, गूळ, मोहरी, दही, तिखट पदार्थ वगैरे.