फॅमिली डॉक्‍टर 700 वा अंक 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
शुक्रवार, 19 मे 2017

"फॅमिली डॉक्‍टर'चा आजचा 700वा अंक!! गणितात, व्यवहारात, अध्यात्मात 7 किंवा 9 या आकड्यांचे एक विशेष महत्त्व असते. सप्तलोकाची कल्पना आपल्याला माहिती असेलच. भुः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः, सत्यः अशी सप्तलोकांची कल्पना प्राचीन भारतीय ऋषिमुनींनी केलेली आहे.

"फॅमिली डॉक्‍टर'चा आजचा 700वा अंक!! गणितात, व्यवहारात, अध्यात्मात 7 किंवा 9 या आकड्यांचे एक विशेष महत्त्व असते. सप्तलोकाची कल्पना आपल्याला माहिती असेलच. भुः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः, सत्यः अशी सप्तलोकांची कल्पना प्राचीन भारतीय ऋषिमुनींनी केलेली आहे. 22 भागिले 7 या पाय संकल्पनेतही सात या आकड्याचा उपयोग अनादी कालापासून केलेला आहे. पृथ्वीतत्त्वाकडून आकाशतत्त्वाकडे, चौकोनातून गोलाकाराकडे अशी जी झेप आहे, त्याची गणिते करत असताना 22 भागिले 7 याचा उपयोग होतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आधुनिक विज्ञानाने जे काही शोधून काढले असे आपण समजतो व त्याचा उपयोग करून आपले जीवन अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न करतो, तोच प्रयत्न आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी पूर्वी केलेला दिसतो. 

चरकाचार्यांचे एक सूत्र आहे, प्रत्यक्षं हि अल्पम्‌, अनल्पं अप्रत्यक्षम्‌ म्हणजे आपण डोळ्यांनी खूप सारे पाहतो (ज्यांना चांगले दिसत नाही त्यांना चष्मा वगैरे वापरता येतो; मात्र वेगवेगळ्या यंत्रांची मदत घेऊन इंद्रियांची शक्‍ती वाढवता येत असली, तरी सरतेशेवटी त्यालाही मर्यादा असतात), कानांनी खूप सारे ऐकतो, सर्वच इंद्रियांनी आपण ज्ञान करून घेत असतो. मन हेसुद्धा एक इंद्रिय आहे, असे म्हणायला हरकत नाही. आपल्या सर्व इंद्रियांना कळलेले थोडे आहे व त्यांना जे कळलेले नाही ते मात्र अफाट, अनंत आहे. म्हणूनच "मला ज्ञान झालेले नाही', असे जो मनुष्य म्हणतो त्याला थोडे तरी ज्ञान झालेले असते, असे म्हणतात. जो मी ज्ञानी आहे, मी पूर्णत्वाला पोचलेलो आहे, असे म्हणतो, त्याला प्रत्यक्षात काहीच कळलेले नसते. 

मनुष्य शरीराचा एक धर्म आहे, त्याला काही मर्यादा आहेत. त्या मर्यादेत मनुष्य विश्वाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो; मात्र या मर्यादांच्या पलीकडे एक विश्व आहे व या विश्वात प्रवेश तरी करता यावा हा या ऋषिमुनींचा प्रयत्न. असा प्रयत्न त्यांनी मंत्र, तंत्र, आयुर्वेद अशा वेगवेगळ्या मार्गांनी केलेला दिसतो. 

"मनुष्य शरीरावर होणारे वातावरणाचे परिणाम' हे कोडे पूर्णपणे सुटलेले नाही. मनुष्याच्या शरीरात उत्पन्न होणाऱ्या वेगवेगळ्या प्रथिनांवर हा परिणाम होतो, हे मात्र निश्‍चित आहे. हा परिणाम त्याच्या ठिकाणी असलेल्या मानसिक शक्‍तीचा असेल, वातावरणात असलेल्या चुंबकीय शक्‍तीचा असेल, विद्युतभारित वातावरणाचा असेल किंवा अन्य कशाचा असेल; परंतु एखाद्या वस्तूत प्रत्यक्ष दुसरी वस्तू न मिळवता वस्तूच्या गुणांमध्ये बदल होतो, गुण अधिक श्रेष्ठतेला पोचतात, हा सध्याचा क्वांटम फिजिक्‍सचा सिद्धांत आयुर्वेदाने पूर्वीपासूनच मान्य करून घेतलेला आहे. 

"फॅमिली डॉक्‍टर' च्या या 700व्या अंकामध्ये केलेल्या आयुर्वेदीय उपासनेला खूप चांगला व भरघोस लोकाश्रय मिळाला. हा लोकाश्रय अंकाला आणि आयुर्वेदाला मिळालेला आहे. आज आयुर्वेद सर्व जगभर आकर्षणाचा, समजून घेण्याचा व उपचाराचा विषय होऊ पाहात आहे. 

आयुर्वेद हे केवळ भौतिकीशास्त्र नव्हे. त्यात भौतिकापलीकडे, इंद्रियांनी मिळवता येणाऱ्या ज्ञानाच्या पलीकडे असणाऱ्या जगताचा विचार करून त्या दृष्टीने मनुष्यावर होत असलेले परिणाम शोधलेले असतात. म्हणून उपचारासाठी येणारा रुग्ण कुठल्या दिशेने आला, कसा आला वगैरेंवरही वैद्य काही निर्णय घेत असतात किंवा रुग्णाची खोली कशी असावी, त्याचे भोवतालचे वातावरण कसे असावे यावरही भर दिलेला दिसतो. सध्याच्या आधुनिक वैद्यकातही हॉस्पिटलची रचना सुंदर केलेली असते, जेणेकरून रुग्णावर वातावरणाचा परिणाम होऊन त्याला आपण बरे होणार, अशी खात्री पटायला लागते. 

स्मशानात गेल्यानंतर मनात शंका, कुशंका, भीती असे भाव उत्पन्न होतात. हा तेथील वातावरणाचाच परिणाम असतो, प्रत्यक्षात तेथे काहीही नसते; परंतु तेथल्या प्रसंगाला धरून जी व्याकुळता असते, त्यातून मनात शंका, कुशंका येतात व त्यांची भीती वाटते. 

भरलेले ताट पाहिल्यानंतर त्याची चव घेण्यापूर्वीच तोंडाला पाणी सुटते. हा अनुभव सर्वांचा असतो. हासुद्धा अन्नाच्या सुगंधाचा आणि दर्शनाचा रसनेंद्रियावर अप्रत्यक्ष झालेला परिणाम असतो. 

औषधींवर संस्कार केल्यावर मूळ द्रव्याचा कायापालट होतो व त्यात असलेल्या चांगल्या गुणांचा उत्कर्ष झाल्यामुळे औषध अप्रतिम लागू पडते. आयुर्वेदात भस्मांना खूप महत्त्व दिलेले दिसते. भस्मप्रकियेत धातूवर वनस्पतीचे गुण फक्‍त आरोपित केले जातात. धातू व वनस्पती यांचे संयुग होत नाही. 

आयुर्वेदात सकारात्मक मनाने औषधावर व एकूण उपचारावर विश्वास ठेवून इलाज करून घेतला असता गुण चांगला व लवकर येतो, असा अनुभव आहे. निसर्गरम्य अशा वातावरणात जेथे हिरवीगार दाट झाडी आहे, अनेक वृक्ष, वेली, फुले आहेत, शांतता आहे, वातावरण स्वच्छ आहे; जेथे प्रत्येक जण आपापल्या कामात व्यग्र आहे, जेथे नियमित रूपात ध्यानधारणा व प्रार्थना होतात. "सर्वांना एकत्र शक्‍तीची प्राप्ती होऊन समाजाचे कल्याण व्हावे,' अशी प्रार्थना करून जेथे सर्व एकत्र येऊन भोजन करतात, अशा तऱ्हेच्या वातावरणात जेव्हा रुग्ण येतो, तेव्हा त्याच्या मूळ रोगावर उपचार सुरू करण्यापूर्वीच पहिल्या 2-3 दिवसांतच त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागते, याचा अनुभव घेण्यासारखा आहे. 

आयुर्वेदात अनेक छोटी-मोठी औषधे समजावली आहेत. त्यांचे पाठ हे धन्वंतरीसारख्या असलेल्या पूर्वीच्या वैद्यांनी लिहून ठेवलेले, सांगितलेले तसेच वापरलेले असतात. एका व्यक्‍तीपुरते औषध बनविणे सध्या जमत नसल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे आयुर्वेदिक ग्रंथांतून दिलेले असे अनेक पाठ वा औषध योजना लुप्त होऊ पाहात आहेत. त्यावर प्रयोग व संशोधन केल्यास सध्या आधुनिक जगात दिसणाऱ्या नवनवीन व कष्टसाध्य रोगांवर उपचार करणे सोपे व्हावे. फक्‍त यासाठी अशी श्रद्धा नक्की हवी की 1+1 = 2 होत नाहीत, तर अदृश्‍य अशा अस्तित्वाचाही परिणाम होऊ शकला तर 1+1 = 3 होऊ शकतात. 

"आयुर्वेदीय औषध पद्धती' असे म्हणत असताना त्यातून आधुनिक औषध पद्धती वेगळी होऊ शकत नाही. निदान करण्यासाठी, तेथल्या भौतिकतेवर प्रथम लक्ष देण्यासाठी आधुनिक औषध पद्धतीने खूप संशोधन केलेले आहे व त्याचा रुग्णाला चांगला उपयोग होऊ शकतो. प्रश्‍न आहे तो केवळ तेवढ्यावरच थांबायचे, की त्याच्या पुढेही काही आहे याकडे लक्ष द्यायचे? म्हणून सध्या "क्वांटम फिजिक्‍स' या अदृश्‍य परिणामांच्या विज्ञानाचा स्वीकार करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे नवीन नवीन येणारे असाध्य रोग आटोक्‍यात येतील, ते कष्टसाध्य न राहता साध्य होऊ शकतील, त्यांच्यावर सोपा इलाज सापडू शकेल. 

या ठिकाणी "फॅमिली डॉक्‍टर'च्या सर्व वाचकांचे, आणि "फॅमिली डॉक्‍टर' टीमपैकी सौ. वीणा तांबे, डॉ. भाग्यश्री झोपे, श्रीमती विजया कोल्हे यांचे, तसेच "सकाळ' वृत्तपत्राच्या संचालकांचे आणि "सकाळ'च्या संपूर्ण टीमचे आभार निश्‍चित मानावे लागतील. "फॅमिली डॉक्‍टर' या पुरवणीचा हा 700वा वाढदिवस सर्वांच्या आयुर्वेदावरील प्रेमामुळेच शक्‍य झालेला आहे.