सुवर्णसिद्ध जल

सुवर्णसिद्ध जल

ज्याचा वर्ण सुंदर आहे आणि ज्याच्या उपयोगाने सतेज कांतीचा लाभ होतो ते म्हणजे सुवर्ण. सोने हे मौल्यवान वस्तूंमध्ये मोडत असले तरी भारतात घरोघरी थोडे का होईना पण सोने असतेच. सोने झिजणार नाही, परंतु सोन्याचे गुण मिळविता येतील, यासाठी भारतीय शास्त्रांनी आणि परंपरांनी ‘सुवर्णसिद्ध जल’ सुचवलेले आहे. 

तसे पाहता आयुर्वेदात सुवर्णाचा अनेक प्रकारांनी वापर केलेला आहे. सुवर्ण सहाणेवर उगाळून वापरायला सांगितले आहे. जेवणासाठी किंवा पाणी पिण्यासाठी सुवर्णाचे ताट, भांडे वापरण्यास सांगितले आहे. काही औषधे सुवर्णपात्रात साठवायला सांगितली आहेत, सुवर्णाचे अलंकार घालायला सांगितले आहेत, सोन्याचा वर्ख, सोन्याचे भस्म यांचे अनेक औषधी प्रयोग सांगितले आहेत. असाच एक साधा, सहजपणे व नियमितपणे करता येण्यासारखा सुवर्णाचा प्रयोग म्हणजे सुवर्णसिद्ध जलाचे सेवन. 

सुवर्णसिद्ध जल म्हणजे सुवर्णाने संस्कारित जल. संस्कार अनेक प्रकारांनी करता येतात. सुवर्णाच्या भांड्यात साठवलेले पाणीसुद्धा सुवर्णसिद्धच असते. पण संस्कार करण्याचे सर्वात प्रभावी माध्यम असते अग्नी. अग्नीद्वारा केलेला संस्कार सूक्ष्म पातळीपर्यंत होत असतो. म्हणूनच सोन्यासह पाणी उकळवून ते सुवर्णसिद्ध करण्याची पद्धत सुरू झाली असावी. आरोग्यरक्षणासाठी व जीवनशक्‍ती चांगली राहावी म्हणून सुवर्णाचा वापर करायचा असला तर त्यासाठी सुवर्णसिद्ध जल उत्तम होय. 

सुवर्णसिद्ध जलाचे फायदे माहिती करून घ्यायचे असतील तर त्यासाठी सुवर्णाचे गुणधर्म बघायला हवेत. 

सुवर्णं स्वादु हृद्यं च बृंहणीयं रसायनम्‌ । 
दोषत्रयापहं शीतं चक्षुष्यं विषसूदनम्‌ ।।...सुश्रुत सूत्रस्थान

सुवर्ण चवीला मधुर, हृदयासाठी हितकर, शरीरधातूंना पोषक व रसायन गुणांनी युक्‍त असते. तिन्ही दोषांना संतुलित करते, डोळ्यांसाठी हितकर असते आणि विषाचा नाश करते. 

रुच्यचक्षुष्यायुष्यकरं प्रज्ञाकरं वीर्यकरं स्वर्यं कान्तिकरं च ।
सुवर्ण रुची वाढवते, डोळ्यांसाठी हितकर असते, आयुष्य वाढवते, बुद्धी, स्मृती, धृती वगैरे वाढवून प्रज्ञासंपन्नता देते, वीर्य वाढवते, आवाज सुधारते आणि कांती उजळवते. 

हेम चायुःप्रदं प्रोक्‍तं महासौभाग्यवर्धनम्‌ । 
आरोग्यं पुष्टिदं श्रेष्ठं सर्वधातुविवर्धनम्‌ ।।...निघण्टु रत्नाकर

सुवर्ण आयुष्य तसेच सौभाग्यवर्धनात महान सांगितले आहे. सुवर्णामुळे आरोग्याचा लाभ होतो व सर्व धातू पोसले जाऊन दृढ शरीराचा लाभ होतो. 
स्वर्णं विधत्ते हरते च रोगान्करोति सौख्यं प्रबलेन्द्रियत्वम्‌ । 
शुक्रस्य वृद्धिं बलतेजपुष्टिं क्रियासु शक्‍तिं च करोति हेमम्‌ ।।
...निघण्टु रत्नाकर

सुवर्ण रोगांचा नाश करून सौख्य देते, इंद्रियांना सामर्थ्यवान बनवते. सुवर्णामुळे शुक्रधातू वाढतो, बल, तेज, पुष्टी यांची प्राप्ती होते व काम करण्याची शक्‍ती वाढते. 

सुवर्णामध्ये असे अनेक उत्तमोत्तम गुण असल्याने सुवर्णाचे नियमित सेवन करावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. 

कानकं सेवनं नित्यं जरामृत्युविनाशनम्‌, दृढकायाग्निकरणम्‌ ।
...निघण्टु रत्नाकर


सोन्याचे नियमित सेवन करण्याने वृद्धत्व येत नाही, अकाली मृत्यूची भीती राहात नाही, शरीर दृढ होते व जाठराग्नी उत्तम राहतो. 

सुवर्णाचे नियमित सेवन करण्यासाठी सुवर्णभस्म, त्या खालोखाल सुवर्णवर्ख व त्या खालोखाल सुवर्णसिद्ध जल उत्तम समजले जाते. सुवर्णभस्म व सुवर्णवर्खाची योग्य प्रकारे योजना केली तर सर्व रोग दूर होऊ शकतात असे उल्लेख आयुर्वेदात मिळतात. याच आधारावर सुवर्णसिद्ध जलामुळे आरोग्याचे रक्षण होते आणि रोग झाला असल्यास त्यातून बरे होण्यासाठी आवश्‍यक असणारी शक्‍ती मिळते असे म्हणता येईल.

जल सुवर्णसिद्ध करणे अतिशय सोपे असते. पाण्यात शुद्ध सोने (सध्याच्या प्रचलित भाषेत २४ कॅरटचे) टाकून ते पाणी साधारणपणे वीस मिनिटे उकळल्याने ते सुवर्णसिद्ध होते. यासाठी वापरायचे सोने वेढणे, साखळी वगैरे स्वरूपात असले तरी चालते, पण ते २४ कॅरटचे शुद्ध असावे आणि रोजच्या वापरातले असले तरी आधी स्वच्छ धुवून घ्यावे. सुवर्णसिद्ध जल बनविण्यासाठी वेढणे, साखळी वापरायला हरकत नसली तरी शुद्ध सोन्याचा पत्रा वापरणे सर्वोत्तम असते. यामुळे पाण्याबरोबर सुवर्णाचा अधिकाधिक संपर्क होऊ शकतो. त्यामुळे अधिक चांगल्या प्रतीचे सुवर्णसिद्ध जल तयार होऊ शकते. सुवर्णसिद्ध जल बनविण्यासाठी वापरात असलेले सुवर्ण झिजत नाही, वर्षानुवर्षे तसेच राहते. 

तान्ह्या बाळापासून ते घरातल्या ज्येष्ठ व्यक्‍तीपर्यंत सगळ्यांनी बाराही महिने असे सुवर्णसिद्ध जल पिणे उत्तम असते. गर्भारपण, बाळंतपण तसेच कोणत्याही रोगावस्थेत सुवर्णसिद्ध पिता येते. सुवर्णसिद्ध जल गरमच प्यायला हवे असे नाही. नेहमी कोमट पाणी पिणे हितकर व पथ्यकर असते असे आयुर्वेदाने सांगितले आहे. त्या दृष्टीने सुवर्णसिद्ध जल थर्मासमध्ये भरून ठेवून कोमट वा गरम असताना पिणे उत्तम, पण एरवी सुवर्णसिद्ध जल सामान्य तापमानाचे असताना प्यायले तरी चालते. दिवसभर पिण्यासाठी लागणारे पाणी रोज सकाळी सुवर्णसिद्ध करून ठेवणे उत्तम होय. सुवर्णसिद्ध जल तयार करताना जलसंतुलन करण्यासाठी त्यात काही विशेष द्रव्ये टाकणे अधिक प्रभावी असते.

थोडक्‍यात सुवर्ण आरोग्यासाठी, जीवनशक्‍ती व प्रतिकारशक्‍ती टिकून राहण्यासाठी तसेच रोगनाशनासाठी प्रभावी असते. रोगावर औषध म्हणून सुवर्णाचा वापर करायचा असला तर त्यासाठी तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन गरजेचे असते, पण रोग होऊ नयेत म्हणून जीवनशक्‍ती व प्रतिकारशक्‍ती संपन्न अवस्थेत राहावी म्हणून सुवर्णाचा वापर घरच्या घरीसुद्धा करता येऊ शकतो आणि त्यासाठी सुवर्णसिद्ध जल हा अगदी सोपा व सुरक्षित उपाय होय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com