व्यक्तिमत्त्वातील दोष

व्यक्तिमत्त्वातील दोष

आपली संस्कृती आपले विचार आणि आपले आचार ठरविते. आपल्यावर झालेल्या भारतीय संस्कारामुळे आपण मान देण्याकरता बहुमानार्थी अनेकवचनांचा उपयोग करतो. तशी पद्धत इंग्रजी भाषेत नाही. आपण (उजव्या) हाताची बोटे वापरून जेवतो. पाश्‍चिमात्य संस्कृतीत काटे- चमचे- सुऱ्या वापरून अन्न घेतात. जेव्हा एखाद्या संस्कृतीत वाढलेली व्यक्ती आपले संस्कार सोडून जगाकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागते, वेगळ्या पद्धतीने बोलू लागते, समाजमान्य पद्धत सोडून इतर पद्धतीने वागू लागते, तेव्हा ते तसे वागणे त्या व्यक्तीकडून अपेक्षित नसते. अशा व्यक्तीमध्ये काहीतरी ‘व्यक्तिमत्त्वातील दोष’ असल्याचे मानले जाते. उदाहरणार्थ सुनेने सासूचा मान ठेवावा आणि सासूला उद्देशून ‘तुम्ही’ किंवा ‘आपण’ असे संबोधावे हे महाराष्ट्रीय संस्कृतीत अपेक्षित आहे. जर एखादी नव्याने लग्न होऊन घरी आलेली सून आपल्या सासूला ‘अग- तुग’ म्हणू लागली किंवा एखादा विद्यार्थी आपल्या शिक्षकांना ‘अरे- तुरे’ करू लागले तर हे निश्‍चितच अनपेक्षित आहे, गैरवर्तन आहे. संस्कारांत कोठे तरी गफलत झाली आहे. व्यक्तिमत्त्वाबद्दल दोष आहे. पर्सनॅलिटी डिसॉर्डर आहे. अशा दोषांवर औषधांचा वापर फारसा उपयोगी नाही. इतर सामाजिक घटकांपेक्षा अशा व्यक्तींचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. असा दोष जडण घडणीतील संस्कारामुळे किंवा ज्याच्या त्याच्या जीवनातील अनुभवामुळे निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारचे व्यक्तिमत्त्वातील दोष असणाऱ्या व्यक्तींचे वागणे या व्यक्ती बदलू शकत नाहीत. त्यांच्या वागण्या-बोलण्यातील ‘दोषांची’ त्यांना ‘जाणीव’ ही नसते. आपले वागणे- बोलणे इतरांना खटकते आहे हेदेखील त्यांच्या ध्यानात येत नाही. कोणी त्यांना तसे सांगितले तरी आपल्या पद्धतीत दुरुस्ती करण्याची त्यांना मनापासून आवश्‍यकता वाटत नाही. ज्या एखाद्या व्यक्तीबद्दल असा दोष असणाऱ्या माणसांच्या मनात नितांत आदर आहे. अशा ‘आदरणीय’ व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा मात्र फायदा होणे शक्‍य आहे. ज्यांना आपण ‘गुरुस्थानी’ मानलेले आहे अशा व्यक्तीने सांगितल्यावर काहींनी दारू पिणे सोडण्याची आणि काहींनी अनैतिक संबंधापासून कायम दूर राहण्याची उदाहरणे आहेत. एखाद्या धार्मिक अथवा आध्यात्मिक गुरुंच्या संप्रदायाचे सभासद होणे या घटनांचादेखील फायदा होताना व झालेला आढळतो.

व्यक्तिमत्त्वातील ठळक दोषांपैकी एक दोष म्हणजे समाजमान्य वागणुकीची कदर करणे सोडून देणे. समाजमान्य वागणुकीविरुद्ध वागणारी माणसे अहंकारी असतात. आपल्या मनाप्रमाणे ही माणसे इतरांना वागावयाला लावतात. जी कृत्ये समाजात सभ्य माणसाकडून अपेक्षित असतात (खरे बोलणे, चोरी न करणे, व्यवहारात व कुटुंबसंस्थेच्या कार्यकारिणीत नीतिमत्ता पाळणे) त्या विरुद्ध त्यांचे वागणे सदोदित होत राहते. आपल्या वागण्या- बोलण्याचा त्यांना कधीही पश्‍चात्ताप होत नाही. इतरांच्या दुर्दैवाबद्दल किंवा संकटाबद्दल अनुकंपा किंवा दया वाटत नाही. दुसऱ्या व्यक्तीच्या दुःखाला, नुकसानीला किंवा अपमानाला (काही प्रमाणात तरी) आपण जबाबदार आहोत अशा विचाराने त्यांना अस्वास्थ्य येत नाही. पश्‍चात्ताप होणे राहिले दूरच. समाजात एक टक्का व्यक्ती अशा ‘विकृत’ मनोवृत्तीच्या असाव्यात असा समाजशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. तुरुंगातील ‘गुन्हेगार’ व्यक्तींपैकी पंधरा वीस टक्के व्यक्तींमध्ये असा दोष असावा. ‘समाजमान्य संकल्पना झुगारणारी व्यक्ती’ असे वर्णन अठरापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना लावता येते. तथापि या मंडळींच्या बालपणापासून त्यांची पावले पाळण्यात ओळखता येऊ लागतात. उनाडक्‍या करणे, शाळा बुडवणे, कौटुंबिक आणि सामाजिक शिस्त न पाळणे, लहान- सहान चोऱ्या करणे, अंमली पदार्थांचे सेवन करण्याची प्रवृत्ती असणे, घरातून पळून जाणे आणि गुंडगिरीची/ हाणामारीची वृत्ती अशा ‘गुणांची’ झुळक लहान वयात दिसू लागते. पौगंडावस्थेपासून कायदे मोडण्याचा कल दिसू लागतो. बोलण्यात असभ्यता प्रकट होते, तोंडात अपशब्द (शिव्या) येऊ लागतात. जबाबदारीची जाणीव पुसट होत जाते. इतरांच्या गरजांची कदर नाहीशी होते. त्यांच्या वागण्या- बोलण्यामुळे इतरांना होणाऱ्या त्रासाबद्दल पश्‍चात्ताप वाटणे केव्हाच थांबलेले असते. मित्र- मैत्रिणी यांच्याबरोबर सख्य फार काळ टिकू शकत नाही. ज्ञानी व्यक्तींबद्दल आदर टिकत नाही. हे सगळे असूनसुद्धा थोड्या वेळासाठी ही मंडळी आपापल्या मित्रमंडळीत लोकप्रिय होतात. काहींवर काहीकाळ छाप मारू शकतात. थोड्याच वेळाने त्यांचे खरे रूप समजते व हा बेगडी मोठेपणा गळून पडतो! अशी मनोधारणा औषधांनी बरी होत नाही. 

व्यक्तिमत्त्वातील आणखी एक दोष म्हणजे कर्मकांडात अतिरेकाने गुंतणे. याला ऑबसेसिव्ह कम्पल्सरी दोष म्हणतात. या दोषामुळे काही विशिष्ट प्रकारच्या वागण्याला अतिरेकी महत्त्व दिले जाते. एखादा विचार पुन्हाःपुन्हा मनात येतो, तो येऊ नये असे जरी वाटले तरी तो थांबवता येत नाही. या विकाराची सुरवात लहान वयापासूनच सुरू झालेली दिसू लागते. आपल्या कामांबद्दल ही मंडळी अतिरेकी प्रमाणात जागृत असतात. या अतिरेकापायी इतर कौटुंबिक अथवा व्यावसायिक माणसांबरोबर स्नेही किंवा नाते हे संबंध दुरावतात. आपले काम शत- प्रतिशत बरोबर झालेच पाहिजे या विचारामुळे त्यांची निर्णयक्षमता खालावते व चुका होत राहतात. ही माणसे सहसा उच्च सामाजिक मूल्ये जोपासतात आणि घटनेचे मूल्यमापन कठोरपणे करतात. काय चूक झाली आणि काय बरोबर या बद्दलचे त्यांचे विचार पक्के ठरलेले असतात. आपल्या भावना इतरांना कळू नयेत याची ते फार दक्षता घेतात. दानशूरपणा हा त्यांच्या मते सद्‌गुण नसतो. आपली कोणतीही गोष्ट दुसऱ्याला देणे जीवावर येते. आपल्या विचारात काही त्रुटी असू शकेल असा विचार त्यांना अधून- मधून येणे शक्‍य असते, पण स्वभावात बदल होत नाही. ही वृत्ती ‘धार्मिक’ आचाराविचारात पक्की झाल्याचे अनेकदा दिसते. धार्मिक आणि नैतिक मूल्यांचे पालन अतिरेकी काटेकोरपणे होते व कर्मठपणा प्रगट होऊ लागतो. कुठली गोष्ट कशा प्रकारानेच झाली पाहिजे या बद्दल त्यांचे मत ठाम असते. आपल्या भावना ही मंडळी सहज दिसू देत नाहीत. स्वभावाने ही माणसे ‘चिक्कू’ असतात. कितीही शुल्लक किंमतीची वस्तू दुसऱ्याला देणार नाहीत. 

त्यानंतरच्या व्यक्तिमत्त्वातील दोष म्हणजे अजाणतेपणाने आक्रमक असणे. पॅसिव्ह- ॲग्रेसिव्ह पर्सनॅलिटी डिसॉर्डर. अशा व्यक्तींना आपल्यावर कोणीही कसलाही अधिकार गाजवलेला आवडत नाही. ते त्यांची नाराजी व्यक्त करण्याची पद्धत सरळ शब्दात सांगत नाहीत. परंतु इतरांच्या मागण्या नाकारतात. या दोषाची सुरवात लहान वयापासूनच होते. एखादे काम ‘मग करेन’ अशा प्रकारे पुढे ढकलत राहावयाचे आणि नंतर सोयीस्करपणे विसरावयाचे अशी त्यांची नकार देण्याची पद्धत असते. ‘आपण फार कामात असतो, त्यामुळे आपल्याला वेळ नसतो’ असे त्यांच्या बोलण्यात येत राहते. ‘मला किती कामे करावी लागतात याची तुम्हाला कल्पना नाही’ असेही त्यांचे म्हणणे असते. जेव्हा त्यांना सांगितलेले काम होत नाही तेव्हा दुसऱ्या कोणाचा तो कसा दोष आहे याचे वर्णन तयार असते. अर्थातच त्यांच्याकडून काम नीट होत नाही हे कालांतराने कळू लागते. त्यामुळे त्यांच्यावरचा विश्‍वास उडू लागतो. परिस्थितीला दूषण देत राहणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग बनतो. अतिरेकी संशयी वृत्ती असणे (पॅरॅनॉईड पर्सोनॅलिटी डिसऑर्डर) हा एक व्यक्तिमत्त्वातील मोठा दोष असू शकतो. ‘आपल्या वाईटावर लोक आहेत’ या प्रकारचा विचार त्यांच्या डोक्‍यात घर करून राहतो. ‘माझ्या सासूला इतर सुना आवडतात. परंतु, मी मात्र त्यांची नावडती सून आहे.’ ‘माझ्या शिक्षकांना मी आवडत नाही म्हणून मला परीक्षेत ते मुद्दाम कमी मार्क देतात.’ ‘मी रंगाने गव्हाळ असल्याने माझ्या नवऱ्याचे लक्ष गोऱ्या रंगाच्या स्त्रियांकडे जाते’ अशी त्यांची विचारसरणी असते. तथापि या प्रकारच्या व्यक्तिमत्त्व दोषामुळे व्यक्‍तीला ‘भ्रम’ होत नाहीत. पॅरॅनाईड स्किझोफेनिया हा विकार जडलेल्या व्यक्तीला भ्रम होतात. उदाहरणार्थ, पॅरॅनॉईड स्किझोफ्रेनिया हा विकार जडलेल्या रुग्णाला ‘पोलिस आपल्यामागे लागलेले आहेत’ असा भ्रम होणे शक्‍य आहे. पॅरॅनाईड पर्सोनॅलिटी डिसऑर्डर असणारी व्यक्ती प्रत्येत माणसाच्या हेतू बद्दल शंका घेत राहते. परिणामी इतरांच्या प्रत्येक वागण्याचा किंवा बोलण्याचा ‘विपरीत’ अर्थ काढण्याची वृत्ती बळावते. आपल्या मनातील विचार ते बोलून दाखवीत नाहीत. लहान सहान अर्थशून्य उद्‌गारांनी त्यांचा ‘अपमान’ होतो. विनोदाचे त्यांना वावडे असते आणि ते सतत ‘सावध’ असतात. प्रत्येक घटनेला ते दुसऱ्या कोणाला तरी जबाबदार धरतात. आपण कसे निर्दोष आहोत किंवा असतो हे ही मंडळी सतत सिद्ध करीत असतात. इतरांबद्दल असणाऱ्या संशयी वृत्तीमुळे त्यांना मित्र- मैत्रिणी थोड्यात असतात. असे रुग्ण उपचार करून घेण्यास तयार होत नाहीत.

काही वेळा परिस्थितीतील घटनांचा थोड्या काळापुरता व्यक्तित्त्वावर विपरीत परिणाम होणे शक्‍य असते. असा दोष एखाद्या महिन्यापेक्षा जास्त वेळ टिकत नाही. घडलेली घटना व्यक्तीच्या मनावर मोठा आघात करते. प्रिय व्यक्तीचा मृत्यू, युद्धात प्रत्यक्ष भाग घेणे, याचा परिणाम सहसा तरुण वयात होतो. पौगंडावस्था आणि तारुण्याच्या काळात ते विसराळू बनू लागतात. आपल्या पोशाखाबद्दल बेफिकीर बनतात. विकाराचा कालावधी संपल्यावर या माणसांना घडून गेलेल्या मानसिक प्रक्रियांबद्दल चिंता, खिन्नता किंवा अपराधीपणा जाणवतो. काही औषधांचा चांगला फायदा होतो. (क्‍लोरप्रोमॅझीन, हॅलोपॅरिडॉल) मानसोपचाराचादेखील फायदा होतो. 

व्यक्तिमत्त्वातील दोष कमी जास्त प्रमाणात सगळीकडे असू शकतात. आयुष्यात यशस्वी झालेल्या, धनवान मंडळीत, ज्ञानी आणि आदरणीय व्यक्तीतसुद्धा अशा दोषांची उदाहरणे दिसू लागतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com