हेल्दी हृदय!

Heart
Heart

हृदयासंबंधी कोणत्याही प्रकारचे उपचार झाले की, अगदी प्रत्येक पाऊल जपून उचलण्याचा सल्ला रुग्णाला दिला जातो. पण, तुम्ही फारच सक्रिय व्यक्ती असाल तर कार्डिऍक उपचारांनंतर लगेचच आधीप्रमाणे आयुष्य जगणं काहीसं कठीण होतं. या मागचं साधं कारण म्हणजे शस्त्रक्रियेआधी तुम्ही जे काही करत होतात त्याचप्रमाणे आताही सक्रिय राहिल्यास रुग्णाला शारीरिक ताण जाणवू शकतो. बऱ्याचदा हे दमणं घातक ठरू शकतं! कार्डिऍक उपचार घेतलेल्या रुग्णांना सहजपणे एक सामान्य आयुष्य जगता यावे, यासाठी काही उपयुक्त बाबी : 

वैद्यकीय पुनर्वसन महत्त्वाचे : 
हार्टअटॅक आलेल्या, हृदय बंद पडणे आणि हार्ट व्हॉल्व्ह सर्जरी, कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग किंवा पर्क्‍युटेनिअस कोरोनरी इंटरवेंशन केलेल्या रुग्णांसाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखालील वैद्यकीय पुनर्वसन कार्यक्रम राबवला जातो. कार्डिऍक रिहॅब म्हणजेच हृदयविकारानंतरच्या पुनर्वसनात आरोग्यदायी हृदयासाठीची जीवनपद्धती, व्यायाम, हृदयासाठी योग्य अशा जीवनपद्धतीचे प्रशिक्षण आणि तणाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन यातून रुग्णाला पुन्हा एकदा एक सामान्य आयुष्य सुरू करण्यासाठी मदत केली जाते. कार्डिऍक रिहॅबच्या माध्यमातून आरोग्य आणि जीवनमानाचा दर्जा उंचावतो येतो. त्याचप्रमाणे यातून हृदयरोग आणि छातीतील वेदनेसाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांचा वापरही कमी करता येतो. अर्थातच, त्यामुळे पुन्हा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी जावं लागण्याची शक्‍यताही कमी होते. 

बाह्य रुग्ण विभाग किंवा हॉस्पिटलमधील रिहॅब सेंटरमध्ये कार्डिऍक रिहॅब चालवलं जातं. कार्डिऍक रिहॅब टीममध्ये डॉक्‍टर, नर्स, व्यायामतज्ज्ञ, फिजिकल ऍण्ड ऑक्‍युपेशनल थेरपिस्ट, डायटेशिअन किंवा न्युट्रिशनिस्ट आणि मेंटल हेल्थ स्पेशालिस्ट यांचा समावेश असतो. शस्त्रक्रियेनंतरच्या तुमच्या गरजा लक्षात घेऊन ही टीम तुमच्यासाठी एक कार्यक्रम आखून देते. रिहॅब टीमतर्फे तुमचा रिहॅब चार्ट तयार करण्यापूर्वी या कार्यक्रमाच्या सुरवातीलाच तुमचा वैद्यकीय इतिहास तपासला जातो, काही शारीरिक तपासण्या आणि इतर चाचण्या केल्या जातात.

यात इलेक्‍ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी), कार्डिऍक इमेजिंग टेस्ट आणि ट्रेडमिल किंवा स्टेशनरी बाइक एक्‍सरसाइज यासारख्या चाचण्यांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेचेही तपासणी केली जाते. कार्डिऍक रिहॅबच्या माध्यमातून रुग्णाला सुरक्षितरीत्या व्यायाम कसा करायचा आणि शारीरिक कामे कशी वाढवत न्यावी, हे शिकवलं जातं. कार्डिऍक रिहॅबमध्ये रुग्णाचा किती वेळ जाईल, हे त्या रुग्णावरच अवलंबून असतं. साधारणपणे बऱ्याच इन्शुरन्समध्ये प्रमाणित कार्डिऍक रिहॅब प्रोग्रामच्या आठवड्यांच्या कालावधीतील सेशन्सचा समावेश असतो. 

अर्थात, रिहॅब सेंटरमधून हृदयाचं आरोग्य जपणारी जीवनपद्धती शिकल्यानंतरही काही धोके उरतातच. त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. काहीवेळा रिहॅबमधील शारीरिक क्रिया करताना तुमच्या स्नायूंना किंवा हाडांना इजा होऊ शकते. शिवाय, हृदयाच्या ठोक्‍यांवरही परिणाम होऊ शकतो. हे जीवघेणेही ठरू शकते. 

शस्त्रक्रियेनंतरचे उपचार योग्य पद्धतीने घ्यायला हवेत : 
कार्डिऍक रिहॅबसोबतच रुग्णाने शस्त्रक्रियेनंतरचे उपचारही नियमितपणे, डॉक्‍टरांनी सांगितल्याबरहुकुम करायला हवेत. डॉक्‍टरांनी सांगितलेल्या वैद्यकीय उपचारांमध्ये कोणतीही हयगय करू नये. 

जीवनपद्धती बदला! 
धूम्रपानामुळे तुमची स्थिती अधिक खालावेल. तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील तर धूम्रपान त्वरित बंद करा. हलक्‍या शारीरिक क्रिया करा, साधारणपणे दररोज चालणे वगैरे. तुमच्यासाठी कोणता व्यायामप्रकार जास्त योग्य आहे, हे बिनधास्तपणे डॉक्‍टरांना विचारा. मद्यपानही टाळा आणि पोषण आहारपद्धतींवर भर द्या. 

कार्डिओलॉजिस्टला नियमितपणे भेटा : 
तुमच्यावर उपचार करणाऱ्या कार्डिओलॉजिस्टला नियमितपणे भेटा. त्यामुळे, तुमच्यावरील उपचार, त्याचे चांगले परिणाम, काही साइड-इफेक्‍ट्‌स होताहेत का, यावर नीट लक्ष ठेवता येईल. कदाचित नियमित रक्ततपासणीही गरजेची भासू शकते. तुमच्या आजारात काही वाढ होत नाही ना, हेसुद्धा डॉक्‍टर पडताळू शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com