दीपावली उत्सव आरोग्याचा 

दीपावली उत्सव आरोग्याचा 

दीर्घायुष्य, सतेज कांती, उत्तम बल, निरामयता, उत्साह, दृढ शरीरयष्टी, प्रभा म्हणजे एकंदर तेजस्विता आणि ओज या सर्व गोष्टी शरीरातील अग्नीवर अवलंबून असतात. दीपावलीत प्रकाश व तेजाच्या सान्निध्यात राहण्याने शरीरस्थ अग्नीला चेतना मिळणे सोपे होते. प्रकाशाने भारून टाकणारी दीपावली साजरी करताना, तिला साजेशी आंतरिक तेजस्विता अनुभवायची असेल तर अग्नीचे, पर्यायाने आहाराचे नियोजन नीट करायला हवे. 

भारतीयांचा सर्वांत मोठा आणि लाडका सण कोणता असा प्रश्न विचारला तर एकमुखाने उत्तर येईल ’दीपावली’. दीपावलीच्या निमित्ताने आपसूक होते ती तेजाची उपासना, अग्नीची आराधना. पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानुसार विश्वात जे काही असते, विशेषतः आपल्या आसमंतात, आपल्या आजूबाजूला जे काही घडत असते त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. आसमंत तेजाने, दिव्याच्या प्रकाशाने उजळून गेला की, त्याचे प्रतिबिंब शरीरात, मनात उमटल्याशिवाय राहात नाही. दीपावलीच्या निमित्ताने घरादारात उत्सवाचे वातावरण तयार होते, तसेच मनही उत्साहित होते, याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला असतो. दीपावलीच्या निमित्ताने केलेली घराची सफाई, सुशोभनासाठी केलेली रोषणाई, तिळाच्या तेलाच्या पणत्यांची मांडलेली रांग (दीप-आवली) या सगळ्यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षतः आरोग्य टिकण्यासाठी मदत मिळत असते. 

दीपावलीत प्रकाश व तेजाच्या सान्निध्यात राहण्याने शरीरस्थ अग्नीला चेतना मिळणे सोपे होते. सतेजता, उत्तम कांती, प्रतिकारशक्‍ती या गोष्टी अग्नीवरच अवलंबून  असतात. 

आयुर्वर्णो बलं स्वास्थ्यम्‌ उत्साहः उपयचौ प्रभा ।
ओजस्तेजोऽग्नयः प्राणाश्‍चोक्‍ता देहाग्निहेतुकाः ।।
....चरक चिकित्सास्थान

 

दीर्घायुष्य, सतेज कांती, उत्तम बल, निरामयता, उत्साह, दृढ शरीरयष्टी, प्रभा म्हणजे एकंदर तेजस्विता आणि ओज या सर्व गोष्टी शरीरातील अग्नीवर अवलंबून असतात. 

आहार नियोजन
त्यामुळे कण न कण प्रकाशाने भारून टाकणारी दीपावली साजरी करताना, तिला साजेशी आंतरिक तेजस्विता अनुभवायची असेल तर अग्नीचे, पर्यायाने आहाराचे नियोजन नीट करायला हवे. ज्याप्रमाणे एखादी शेकोटी पेटवली तर अग्नीला प्रज्वलित ठेवण्यासाठी योग्य स्वरूपातील इंधन योग्य प्रमाणात व योग्य वेळेला देत राहावे लागते, त्याप्रमाणे जाठराग्नीला दीप्त ठेवण्यासाठी आहार विधिपूर्वक घ्यावा लागतो. शेकोटीत ओले लाकूड टाकले तर अग्नी विझून जाईल किंवा एकदम मोठा लाकडाचा भारा अग्नीवर टाकला तरी अग्नी विझून जाईल. तसेच आहारही जाठराग्नीकडून सहज पचेल अशा स्वरूपात व प्रमाणातच घ्यायला हवा. प्रमाणापेक्षा अधिक आहार करणे, तसेच अत्यल्प प्रमाणात आहार घेणे या दोन्हीही गोष्टी अग्नीच्या अनारोग्याला, पर्यायाने निस्तेजतेला कारणीभूत असतात. दिवाळीच्या या दिवसात अनारसे, करंजी, लाडूसारखे गोड पदार्थ तसेच चकली, शेव, चिवड्यासारखे तिखट पदार्थ आवर्जून बनवले जातात व खाल्ले जातात. पावसाळ्यानंतर हळूहळू प्रदीप्त होणाऱ्या अग्नीला साजेसा असा दीपावलीतील आहार असावा हे सुद्धा यातून साध्य होत असते. यालाच जोड म्हणून या दिवसात आयुर्वेदिक रसायनांचे सेवन केले, तर ते आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम असते. तसे पाहता रसायन पूर्ण वर्षभर खाणे उत्तमच असते, पण पचनशक्‍ती उत्तम असलेल्या कालावधीत रसायन सेवनाचा सर्वोत्कृष्ट उपयोग होत असल्याने दिवाळीत रसायन खाण्याचा शुभारंभ करणे श्रेयस्कर होय. च्यवनप्राश, धात्री रसायन, ‘सॅनरोझ’, ‘मॅरोसॅन’ ‘संतुलन चैतन्य कल्प’, शतावरी कल्प यासारखी रसायने दिवाळीत व दिवाळीनंतरही अवश्‍य सेवन करावीत अशी असतात.  

आरोग्योपयोगी असे काही
दीपावली आरोग्याचा उत्सव असतो, कारण या निमित्ताने अनेक आरोग्योपयोगी गोष्टी आपण अनायसे करत असतो. 

गोवत्सद्वादशीच्या दिवशी वासरासह गाईची पूजा केली जाते. या निमित्ताने पंचामृत, पंचगव्यासारख्या औषधी द्रव्ये पुरवणाऱ्या गाईच्या संपर्कात येता येते. आयुर्वेदात काही रोगात ‘गोसेवा’ हा उपचाराचा एक भाग सांगितलेला दिसतो. त्याचीच काही  अंशी पूर्तता यातून होत असते.

नरकचतुर्दशीला सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठून अभ्यंगस्नान करायची प्रथा आहे. ती देखील आरोग्यरक्षणाच्या दृष्टीने उत्तमच आहे. पावसाळ्यामुळे वाढलेला वातदोष आणि नंतर शरदात वाढलेला पित्तदोष यांच्या योगाने शरीरातील वाढलेली उष्णता व रुक्षता कमी करण्यासाठी सुगंधी तेलाने अभ्यंग करून, चंदन, वाळा, अनंतमूळ वगैरे शीतल द्रव्यांपासून बनवलेले उटणे लावले जाते. याने त्वचा सतेज होण्यास, शरीरशक्‍ती वाढून एकंदरच तेजस्विता वाढण्यास मदत मिळते. 

बलिप्रतिपदेला व भाऊबीजेला अनुक्रमे पत्नी पतीला आणि बहीण भावाला तेल लावून उटण्याने आंघोळ घालते व ओवाळते. यातही आरोग्यरक्षणाचाच हेतू साध्य होतो.
दीपावलीत स्नानापूर्वी सुगंधी उटणे लावण्याची पद्धत आहे, नंतरही छान तयार होऊन गजरे घालणे, सुगंधी अत्तर लावणे, पाहुणे आले की त्यांच्यावर गुलाबपाणी शिंपडणे यासारख्या गोष्टी आपण करतो, यातूनही आरोग्याचेही रक्षण होत असते. कसे ते चरकसंहितेतील पुढील सूत्रांवरून समजते. 
वृष्यं सौगन्ध्यमायुष्यं काम्यं पुष्टिबलप्रदम्‌ ।
सौमनस्यमलक्ष्मीघ्नं गन्धमाल्यनिषेवणण्‌ ।।
...चरक सूत्रस्थान

सुगंधी द्रव्यांचा लेप लावण्याने, तसेच सुगंधी फुलांचे धारण करण्याने शरीर सुगंधी होते, शुक्रधातूचे पोषण होते, आयुष्य वाढते, शरीराची ताकद वाढते व दुर्भाग्याचा नाश होतो. आयुर्वेदिक सुगंधी वनस्पतींपासून बनवलेल्या उटण्याने स्नान करण्याने त्वचारंध्र स्वच्छ होतात, शरीरातील अतिरिक्‍त कफदोष कमी होतो, अनावश्‍यक मेद झडायला मदत मिळते व त्वचा सतेज होऊन कांती उजळते. 

नवीन वस्त्रांची परंपरा
नवीन कपडे, आभूषणे घालण्याने आरोग्यावर काय परिणाम होतात हेही आयुर्वेदाने सांगितलेले आहे. यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. मात्र, परंपरेनुसार या गोष्टी अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आहेत. 
काम्यं यशस्यमायुष्यमलक्ष्मीघ्नं प्रहर्षणम्‌ ।
श्रीमत्परिषदं शस्तं निर्मलाम्बरधारणम्‌ ।।
...चरक सूत्रस्थान

 

नवीन स्वच्छ वस्त्रे घालण्याने यशवृद्धी होते, आयुष्य वाढते, अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र व दुर्भाग्याचा नाश होतो, मन प्रहर्षित होते, उत्साह वाढतो. 
धन्यं मल्यमायुष्यं श्रीमद्‌व्यसनसूदनम्‌ ।
हर्षणं काम्यमोजस्यं रत्नाभरणधारण्‌ ।।
...चरक सूत्रस्थान

रत्ने तसेच आभूषणे धारण करण्याने सौभाग्याची वृद्धी होते, मंगलाचा लाभ होतो, आयुष्य वाढते, लक्ष्मीप्राप्ती होते, दुःखे दूर होतात, मन प्रसन्न होते व ओजतत्त्वाची शुद्धी होते. 

दारात एखादी सुबक, छान रंगसंगतीची रांगोळी काढणे, एखादा आकाशकंदिल बनवणे, किल्ला करणे यासारख्या रीतिरिवाजांमुळे मन रिलॅक्‍स व्हायला, सृजनकल्पना विकसित व्हायला वाव मिळत असतो. पाहुण्यांना आमंत्रण देणे, अतिथींचा पाहुणचार करणे, भेट वस्तू देणे यातून सामाजिक आरोग्याची पायघडी घातली जाते.

दिवाळीचा फराळ
चकली, कडबोळी, लाडू, अनारसा, करंजी वगैरे पदार्थांचाही आयुर्वेदाच्या ग्रंथात उल्लेख सापडतो. घरी बनवलेले साजूक तूप, उत्तम प्रकारची घटकद्रव्ये वापरून योग्य पद्धतीने हे पदार्थ वापरले तर ते सुद्धा आरोग्याला हातभार लावणारे असतात. दिवाळीच्या फराळातील एक-दोन पदार्थांची आपण माहिती घेऊ या. 

कडबोळी (कचकल्ली)
माषाणां धूमसी हिुलवणार्द्रकसंयुता ।
जलेन निबिडं मर्द्य कार्याः पृथुलवर्तयः ।।

पाचिता च घृते सैव कचवल्लीति विश्रुता ।उडदाचे पीठ, हिंग, मीठ, बारीक केलेले आले हे सर्व पदार्थ पाण्यात एकत्र घट्ट मळून नंतर त्याच्या वाती करून वर्तुळे करावीत व तुपामध्ये तळावीत, याला कचकल्ली (कडबोळी ) असे म्हणतात. 

कडबोळी ताकद वाढविणारी, तृप्ती देणारी, शुक्रवर्धक अशी असते, अग्नी प्रदीप्त करते शिवाय वातशामक असते. जास्त प्रमाणात खाल्ली तर मात्र पित्त-कफदोष वाढवते, पचायला जड पडते, वजन वाढवते. 
अनारसे (शालिपूप)
प्रक्षाल्य तण्डुलान्‌ द्विस्त्रिः शोषयित्वा च पेषयेत्‌ ।
तत्पिष्टं च घृतेनाशु किंचित्‌ चाल्यगुडोदकैः ।।
मर्दयित्वा च वटकान्‌ कृत्वा ते पोस्तबीजकैः ।
एकतो घोलयित्वा च तान्घृतेन पचेत्ततः ।।

दोन ते तीन वेळा तांदूळ चांगले धुवून वाळवावेत. त्यांचे पीठ करून त्यात थोडेसे तूप, गूळ व पाणी घालून मळावे व त्याचे वडे करून एका बाजूने खसखस लावून तुपात तळावे. 
शालिपूपास्तु ते सिद्धाः शीता वृष्या रुचिप्रदाः ।
स्निग्धातिसारशमना नाम्नाऽनारससंज्ञिता ।।...निघण्टु रत्नाकर

अनारसे धातुवर्धन करतात, रुची वाढवितात, गुणांनी स्निग्ध असतात वीर्याने थंड असतात व अतिसारामध्ये हितकर असतात.

चिरोटे
गव्हाचा रव्याला थोडेसे तूप चोळावे, नंतर पाणी घालून मळून कुटून कुटून मऊ करावा. त्याची सुपारीएवढी गोळी करून कागदासारखी पातळ पोळी लाटावी. अशा तीन पोळ्या कराव्या.

एक पोळी वर तूप लावून वरून दुसरी पोळी ठेवावी, त्यावर तूप लावून तिसरी पोळी ठेवावी. हे सर्व तीन पदरी वा चार पदरी दुमडून पट्टी तयार करावी. या पट्टीचे पुन्हा तुकडे पाडावेत. ते पुन्हा पातळ लाटून पुन्हा दुमडावेत व चौकोनी आकाराचे करून तुपात तळून साखरेबरोबर खावेत. 
वृष्या बल्यास्तु शुक्रला ।
गुरवः पित्तवातघ्ना श्‍चोक्‍ता पाकविशारदैः ।।...निघण्टु रत्नाकर

चिरोटे शुक्रधातूस वाढवितात, ताकद वाढवितात, पचायला जड असतात व पित्त-वाताला शमवतात. 

अशा प्रकारे दीपावलीचा हा सण आनंदाचा तर असतोच, पण तो व्यवस्थित, पारंपरिक पद्धतीने साजरा केला तर त्यातून शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्याचाही लाभ होतो आणि वर्षभर लागणाऱ्या उर्जा, शक्ती मिळवायची शुभारंभ करता येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com