आरोग्य ‘लिव्हर’चे, आनंद जीवनाचा

आरोग्य ‘लिव्हर’चे, आनंद जीवनाचा

यकृताचे त्रास होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे, सहसा दारू पिण्याने यकृत बिघडते असा समज सर्वसामान्यांच्या मनात असतो. तसे पाहता सध्या दारू पिण्याचे प्रमाण तर वाढलेले आहेच. परंतु यकृताचे त्रास होण्यामागे हे एवढे एकमेव कारण नाही. तसाही दारूचा अतिरेक झाला तरच यकृताला त्रास होतो. दारू घेतल्यावर जाणीव कमी होते, चालताना ठेच लागते किंवा मनुष्य बेशुद्ध होतो. हे सर्व जाणिवेमध्ये उणीव झाली तरच होऊ शकते. हे एकदा घडले की त्यानंतर होणाऱ्या कर्माचे परिणाम साहजिकच विचित्र यायला लागतात. याचा परिणाम यकृतावरही होऊ शकतो. 

मुळात आपले जीवन ताकदीवर अवलंबून असते व व्यक्‍तीचा पुरुषार्थ त्याच्या ताकदीवर अवलंबून असतो. ज्या व्यक्‍तीची छाती रुंद त्याचा पुरुषार्थ मोठा, असे असले तरी छाती रुंद होण्यासाठी व्यक्‍तीचे यकृत उत्तम असावेच लागते. मनुष्याचा संपूर्ण व्यवहार चालण्यासाठी आवश्‍यक असणारी शक्‍ती त्याला अन्नातून मिळते आणि सेवन केलेले अन्न पचविण्याच्या प्रक्रियेमधे यकृताचे योगदान मोठे असते. 

भगवंत म्हणतात, मी वैश्वानर होऊन सर्व प्रकारचे अन्न पचविणार आहे.
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्‍तः पचाम्यन्नं चतुर्विधम्‌ ।।
(श्रीमद्‌भगवद्‌गीता १५-१४) 

तेव्हा साक्षात परमेश्वर अन्नपचनाचे काम करणार असल्याने आपल्याला वेगळे काही करायचे नाही. फक्‍त काम करणाऱ्याला काम नीट करू देणे हे आपले काम. जसे विद्यार्थी अभ्यासाला बसलेला असताना घरात टीव्ही चालू ठेवला तर त्याचे लक्ष टीव्हीकडे जाते, अशावेळी त्याचा अभ्यास नीट कसा होईल? किंवा एखादा मनुष्य फ्यूज बदलण्यात गुंतलेला असताना त्याला अचानक कोणी तरी हाक मारली तर त्याला शॉक लागू शकतो. तेव्हा परमेश्वराच्या अन्न पचविण्याच्या कामात अडथळा येणार नाही हे महत्त्वाचे काम आपल्याला करायचे असते. 

यकृत शब्द यत्‌-कृत असा फोडला जाऊ शकतो. ‘तत्‌’ म्हणजे ‘ते’ तसे ‘यत्‌’ म्हणजे ‘हे’ आणि ‘कृत’ म्हणजे ‘झालेले कर्म’. ‘हे’ म्हणजे काय? तर हे पचनाचे काम परमेश्वराने केलेलेच आहे, आपल्याला फक्‍त त्याची साठवणूक, त्याचा संपूर्ण परिपाक, सर्व परिणाम हा भोगायचा आहे. अन्न पचविण्याचे, यकृत चालविण्याचे सर्व काम निसर्गच करत असतो, आपण त्या प्रक्रियेत अडथळा आणला नाही तर यकृताचे काम नीट होत राहील. 

पूर्वी जीवन जगण्याची एक विशेष पद्धत होती, तेव्हा माणसामाणसावर प्रेम केले जायचे, जीवन छान, सुखासमाधानात  जगले जायचे, आनंद उपभोगण्यासाठी नाना तऱ्हेचे उत्सव साजरे केले जायचे. साधे लग्न म्हटले तरी श्रीमंतपूजन, वाङनिश्‍चय, लग्न, वरात वगैरेंद्वारा आनंद मिळवला जायचा. अशी गंमत अनुभवण्यामुळे मनावरचा ताण कमी व्हायचा. मात्र आज मनुष्याच्या मनावरचा ताण प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे, जेवणाचे प्रकार उलटे-सुलटे झालेले आहेत, झोपेचे तंत्र बदललेले आहे. एकूण आज मनुष्याचे जीवन मानसिक ताणाने भरलेले आहे. त्यामुळे यकृतावर ताण येतो आणि त्यामुळे जो परमेश्वर अन्नाचे छान पचन करणार होता, अन्नाचे सप्तधातूत व शक्‍तीत रूपांतर करणार होता, त्या कामात अडथळा उत्पन्न होतो. न पचलेल्या अन्नाचा आम तयार होतो व यकृताचे त्रास वाढतात. 

इंग्रजीमधे एक शब्द आहे ‘लीव्हर’(Lever), एखादी जड वस्तू उचलण्यासाठी जशी कांब घेऊन तिचा ‘तरफे’(Lever)सारखा उपयोग केला तर मोठ्यात मोठे वजन उचलता येते. उचलणाऱ्याची शक्‍ती मर्यादित असताना त्याला मोठे वजन कसे उचलता येते? तर इथे कांब वापरली की निसर्गनियमानुसार तिच्या मदतीने मोठे काम होते. याचप्रमाणे आपण अन्न खायचे, अन्नाचा आनंद घ्यायचा आणि ते पचविण्याचे काम मात्र निसर्ग म्हणजेच परमेश्वराने करायचे, यादृष्टीने  Lever चे काम Liver करते. Liver शब्दातही Live म्हणजे ‘जगणे’  हा शब्द आहे, तेव्हा आपल्याला जगायचे असेल तर लिव्हर नीट कार्यक्षम असणे आवश्‍यक आहे. 

आयुर्वेद, अध्यात्म, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र, पाककला, संगीत वगैरे सर्व शास्त्रे आपल्या भारतीय मुनींनी एका ठिकाणी जोडलेली आहेत. हे सगळे नैसर्गिक आहे, ते मुद्दाम जुळवून आणलेले नाही. मनुष्याचे शरीर चालते ते हृदय, यकृत व मूत्रपिंड (किडनी) या तीन अवयवांवर. विजेच्या बाबतीत न्यूट्रल व फेज असतो तसे मनुष्याच्या शरीरात या तिन्हींचा न्यूट्रल फेज आहे मेंदू. म्हणून हृदय, यकृत व मूत्रपिंड हे तिन्ही मेंदूला जोडलेले असतात. याचा अर्थ असा की मेंदू यकृताला जोडला गेला नाही तर यकृत काम करू शकत नाही; आणि यकृताने काम करण्याचे थांबवले तर मेंदू बंद पडेल. हृदयाच्या बाबतीतही हेच लागू पडते. मेंदू हृदय चालविते व हृदय बंद पडले तर मेंदू बंद पडतो. मेंदू सर्व व्यवहार चालवत असतो. मेंदू हा एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा मॅनेजरप्रमाणे काम करत असतो. हृदय, यकृत व मूत्रपिंड ही तीन मेंदूच्या अधिकारात असलेली व्यासपीठे आहेत, या व्यासपीठांचे काम चालते मेंदूतून. आणि यकृत हे सर्व शक्‍तीचे अधिष्ठान आहे. यकृताला लागून असलेले पित्ताशय (गॉल ब्लॅडर), त्याच्या शेजारी असलेली प्लीहा (स्प्लीन) व अग्न्याशय (पॅनक्रियाज) हे सगळे यकृताशी संबंधित असतात. कारण हे सगळे अवयव अग्नीतत्त्वावर चालणारे आहेत.

शक्‍ती येते सूर्यापासून. यकृताचा संबंध अग्नीशी म्हणजेच सूर्याशी असतो. त्यामुळे ज्याला यकृत चांगले हवे आहे, ज्याला यकृताचे त्रास कमी व्हावेत अशी इच्छा आहे, त्याने सूर्याची उपासना करावी असे आपल्या वेदांमध्ये सांगितलेले आहे. यासाठी सौरसूक्‍त सांगितलेले आहे,  
हृद्रोगं मम सूर्य हरिमाणं च नाशय । 
शुकेषु मे हरिमाणं रोपणाकासु सुदध्मसि । 

या सूक्‍तात पोपटाचा उल्लेख आहे. याचा संबंध हिरवट, पिवळट गॉल ब्लॅडरशी लावता येतो. यकृताचे काम नीट व्हावे असे वाटत असेल तर सूर्यनमस्कार करायलाच हवेत, अग्नी जपण्यासाठी योग-प्राणायाम करायला हवा. निरागी यकृतासाठी अजून काय करायला हवे याची माहिती आपण पुढच्या वेळेला घेऊ या.

(क्रमशः)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com