पावसाळ्यात घरी असावीत अशी औषधे

पावसाळ्यात घरी असावीत अशी औषधे

पाऊस व पावसाळा सर्वांनाच आवडतो; पण भीती वाटते ती आजारपण येण्याची. लहान मुलांची कफ प्रकृती असल्याने त्यांना थंड हवेमुळे सर्दी, खोकला यांचा त्रास, तरुणांना पित्त वाढण्याचा त्रास व वडीलधाऱ्यांना गुडघे, सांधे दुखण्याचा त्रास संभवतो; पण जराशी काळजी घेतली तर आरोग्य उत्तम राहून पृथ्वीमातेस हिरवा शालू नेसवणाऱ्या पावसाळ्याचे खरे स्वागतच करता येईल.

पृथ्वीवरच्या सर्व प्रकारच्या अस्तित्वासाठी सूर्याची मदत लागते व सूर्यावरच जीवन चालते. सूर्यप्रकाशामुळेच झाडे वाढतात, झाडांवर फुले-फळे धरतात, सूर्यामुळेच प्राणवायू व प्राणशक्‍ती टिकून राहते व त्यावरच जीवन फुलते. वनस्पतींचे कोळशात, हिऱ्यात वा तेलात रूपांतर सूर्यशक्‍तीमुळेच होते. कोपऱ्यावर पोलिस नाही हे पाहून लोक लाल दिवा असतानाही चौकातून गाडी दामटण्याचा प्रयत्न करतात, तसे आकाशात सूर्य नाही हे पाहून जीवजंतू मनुष्यमात्रावर हल्ला करतात तो ऋतू म्हणजे पावसाळा. 

पावसाळ्यात पृथ्वी व आकाश ही दोन्ही तत्त्वे कार्यान्वित असतात. आकाशातून पडते पावसाचे पाणी आणि पृथ्वीतून येतात वर अंकुर. त्यामुळे पुढे पृथ्वीला हिरव्यागार रंगाचा शालू नेसून नटता येते. उन्हाळ्यातल्या भाजणाऱ्या उन्हाने सर्व काही जळून गेले आहे, असे वाटले तरी वर्षा ऋतूत सगळीकडेच हिरवेगार होते. अशा या ऋतूचे एका बाजूने आकर्षण वाटणे साहजिक असते; मात्र दुसऱ्या बाजूने आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक असते. 

पावसाळ्यात पचनशक्‍ती कमी झालेली असल्यामुळे अपचन, जुलाब, उलटी वगैरे त्रास होण्याचा संभव असतो. जुलाब होत असल्यास उलट्या होताना जेवढा धोका संभवतो तेवढे घाबरायचे कारण नसते; पण जुलाब होत असतानाही शरीरातील पाणी कमी होते, ताकद कमी होते, कधी कधी आत्ययिक अवस्थाही उद्भवू शकते. अशा त्रासांवर आयुर्वेदात कुडा नावाचे औषध सांगितलेले आहे. संजीवनी वटीचाही उपयोग जुलाबाच्या त्रासावर होऊ शकतो. ज्यांचे पचन चांगले नाही, त्यांनी पावसाळ्याच्या दिवसात जेवणापूर्वी लिंबाच्या रसातून संजीवनी वटी घेण्यास हरकत नसते. एकंदरच पावसाळ्यात पचन चांगले राहील इकडे लक्ष देणे इष्ट ठरते. सकाळ-संध्याकाळच्या जेवणानंतर अन्नयोगसारख्या गोळ्या घेतल्या किंवा जेवणापूर्वी लिंबाच्या रसात जिऱ्याची पूड, हिंग, मीठ टाकून घेतले, तर पचन चांगले राहण्यास मदत होऊ शकते. ज्या खाण्याच्या गोष्टी एरवीही पचत नाहीत, असा अनुभव असतो त्या पावसाळ्यात खाणे नक्की टाळाव्यात. या दिवसात पेढा, बर्फी वगैरे दुग्धजन्य पदार्थ खायचे असल्यास ते खात्रीच्या दुकानातीलच असावेत. उघड्यावरचे अन्न कटाक्षाने टाळावे. 

पावसाळ्यात वातावरणातील प्रदूषण, धूलिकण, पावसाबरोबर खाली येत असल्याने व जमिनीवर साठलेला कचरा पाण्याबरोबर वाहून येत असल्याने उकळलेले गरम पाणी पिणे हे पावसाळ्यातील सर्वांत मोठे पथ्य आहे. खाल्ल्यानंतर चूळ भरण्यासाठी वापरलेले पाणीसुद्धा शुद्ध असावे, प्यायच्या पाण्यानेच चूळ भरावी किंवा बाहेर असताना प्यायचे पाणी न मिळाल्यास चूळ न भरता हात धुऊन केवळ तोंडावरून हात फिरवावा. बाहेर जाताना बरोबर प्यायचे पाणी घेऊन जावे. 

पावसाच्या पाण्यात भिजण्याचा आनंद काही औरच असतो; मात्र जसे पोहताना पाण्यात असेपर्यंत बरे वाटते; पण बाहेर आल्यावर गार वारा लागतो किंवा डोक्‍यावर सूर्य असला तर एकदम शरीर तापते, तसेच पावसात भिजण्याचेही आहे. पावसाची सर अंगावर घेताना बरे वाटते; पण नंतर वारा लागला वा नीट अंग पुसण्याची काळजी घेतली नाही तर आरोग्याच्या दृष्टीने बाधक ठरते. तेव्हा पावसाचे चार थेंब अंगावर घेतले तरी रोजच किंवा वारंवार पावसात भिजणे आरोग्यासाठी चांगले नाही, हे लक्षात घेणे आवश्‍यक असते. 

पावसाळा सुरू झाला व आपले खरे स्वरूप प्रकट करायला लागला, की शरीरात वात वाढू लागतो व वात येऊ लागतो. शिवाय पावसाळ्यात रोगराई बळावलेली असल्याने, वात वाढल्यामुळे सर्व प्रकारच्या आजारी माणसांना पावसाळी हवामान चांगले नसतेच. रोजच्या चहात गवती चहा, आले, पुदिना यांचा वापर करणे वा या वनस्पतींचा काढा घेणे या गोष्टीसुद्धा पावसाळ्यात सर्वांसाठी उत्तम असतात. सुंठीचे चूर्ण, गूळ व तूप यापासून बनविलेल्या गोळ्या पावसाळ्यात उपयोगी ठरतात. 

पावसाळ्यात मच्छरांचे प्रमाण वाढते, घरात मच्छरे असल्यास मच्छरदाणीत झोपणे किंवा मच्छरे चावणार नाहीत यासाठी काही उपाययोजना करणे महत्त्वाचे. शिंका, खोकला वगैरे त्रास सुरू झाल्यास ताबडतोब उपचार करणे, मधाबरोबर सीतापलादी चूर्ण घेणे तसेच इतरांना संसर्ग होणार नाही, याचीही काळजी घेणेसुद्धा आवश्‍यक.  

पावसाळ्यात भूक मंदावते आणि पचनाच्या तक्रारी वाढतात म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये पावसाळ्यात चातुर्मास व त्यानिमित्ताने व्रतवैकल्य, उपवास करण्यास सुचवलेले असते. उपवास करणे म्हणजे शारीरिक, मानसिक वात कमी करण्याचा प्रयत्न करणे. त्यासाठी या ऋतूत पचनास हलका आहार घेणे अपेक्षित असते व त्याचबरोबर श्रवणसंकीर्तन, ध्यान, योग, प्राणायाम वगैरे गोष्टीही आरोग्यासाठी हितावह असतात.

एकंदरीत पाऊस व पावसाळा सर्वांनाच आवडतो; पण भीती वाटते ती आजारपण येण्याची. लहान मुलांची कफ प्रकृती असल्याने त्यांना थंड हवेमुळे सर्दी, खोकला यांचा त्रास, तरुणांना पित्त वाढण्याचा त्रास व वडीलधाऱ्यांना गुडघे, सांधे दुखण्याचा त्रास संभवतो; पण जराशी काळजी घेतली तर आरोग्य उत्तम राहून पृथ्वीमातेस हिरवा शालू नेसवणाऱ्या पावसाळ्याचे खरे स्वागतच करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com