रक्षण पर्यावरणाचे

रक्षण पर्यावरणाचे

आरोग्य टिकविण्यासाठी पर्यावरण शुद्ध ठेवायला हवे हे आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वींच सांगून ठेवलेले आहे. मुळात आयुर्वेद हे सर्वांगीण, संपूर्ण आरोग्यशास्त्र आहे, त्यामुळे त्यात मनुष्यमात्राच्या आरोग्याची तर काळजी घेतलेली आहेच, बरोबरीने प्राणी, वृक्ष निरोगी राहावेत, पाणी, जमीन, हवा शुद्ध राहावी यासाठीही अनेक उपाय सुचवले आहेत.

पर्यावरण या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. आपल्या आजुबाजूला असणाऱ्या सर्व सजीव-निर्जीव गोष्टी, नैसर्गिक किंवा कृत्रिम वस्तू, दृश्‍य-अदृश्‍य भाव हे पर्यावरणाचे घटक असतात व त्यांचा आपल्यावर सातत्याने बरा वाईट परिणाम होत असतो. वातावरणातील इलेक्‍ट्रोमॅगनेटिक रेडिएशन असो, मोबाईल किंवा वायफायचे तरंग असोत, चुंबकीय लहरी असोत, रेडिओचे तरंग असोत, या सर्वांचा पर्यावरणात समावेश होत असतो. जमीन, पाणी, वनस्पती, प्राणी, सूर्यप्रकाश, हवा हे सुद्धा पर्यावरणाचे घटक असतात. आकाशातील ग्रह-तारे किंवा पृथ्वी भोवतालचे अवकाश यांचाही पर्यावरणात अंतर्भाव होतो. पर्यावरणाच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टींशी बांधलेलो असतो आणि म्हणूनच पर्यावरण सुस्थितीत असले, पर्यावरणातील सर्व घटक निरोगी असले तरच आपल्या आरोग्याचे रक्षण होऊ शकते. याउलट पर्यावरणाचा ऱ्हास किंवा पर्यावरणाची दुष्टी ही संपूर्ण सृष्टीसाठी घातक ठरू शकते. 

पर्यावरणाला वाचवण्यासाठी संपूर्ण जगभरातून प्रयत्न होत आहेत, अनेक देशांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे. याचेच प्रतिक म्हणून १९७४ पासून प्रत्येक वर्षी जूनच्या ५ तारखेला ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जातो. यानिमित्ताने पर्यावरणरक्षणासाठी जनसामान्यांमधे जागरूकता निर्माण केली जाते. आपण सर्वांनीच या मोहिमेमधे सहभागी व्हायला हवे, रोजचे जीवन जगताना पर्यावरणाचा विचार करायला हवा आणि यासाठी आयुर्वेदिक जीवनशैली अंगिकारणे हा एक उत्तम उपाय होय. आयुर्वेद शास्त्राचा नीट अभ्यास केला, त्यातील मूलगामी तत्त्वे समजून घेतली तर हे लक्षात येते की हे शास्त्र पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे हानी पोचणार नाही यासाठी प्रत्येक ठिकाणी तत्पर असलेले दिसते. पर्यावरणाचे रक्षण आणि पर्यावरणाचा योग्य वापर हे संतुलन आयुर्वेदशास्त्राने ज्या पद्धतीने सांभाळले आहे, त्याला तोड नाही. आयुर्वेदाने अग्नी, वायू, काळ यांना ‘भगवान’ म्हटलेले आहे, तर वनस्पतींना देवता म्हणून संबोधलेले आहे. पर्यावरणातील प्रत्येक जीवमात्राचे रक्षण करावे, शांतिपूर्ण व्यवहार असावा, शुद्धतेचे भान ठेवावे अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.  आयुर्वेदाची औषधे नैसर्गिक द्रव्यांपासून बनवलेली असल्याने ती तयार करतांना तसेच शरीरातून उत्सर्जित झाल्यानंतरही पर्यावरणाला घातक ठरत नाहीत, उलट यातून वृक्ष वनस्पतींचे संवर्धन होते, मनुष्य आणि निसर्गातील संबंध अधिकाधिक दृढ होत जातो. 

आरोग्य टिकविण्यासाठी पर्यावरण शुद्ध ठेवायला हवे हे आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वींच सांगून ठेवलेले आहे. मुळात आयुर्वेद हे सर्वांगीण, संपूर्ण आरोग्यशास्त्र आहे, त्यामुळे त्यात मनुष्यमात्राच्या आरोग्याची तर काळजी घेतलेली आहेच, बरोबरीने प्राणी, वृक्ष निरोगी राहावेत, पाणी, जमीन, हवा शुद्ध राहावी यासाठीही अनेक उपाय सुचवले आहेत, ज्यांचा आजही उत्तम परिणाम होताना दिसतो. हत्ती, घोडे वगैरे प्राण्यांसाठी आयुर्वेदाच्या विशेष संहिता आजही उपलब्ध आहेत. वृक्षार्युर्वेदातल्या उपायांचा आजही उत्तम उपयोग होताना दिसतो. 

हवा शुद्ध होण्यासाठी प्राचीन काळी भैषज्ययज्ञ (औषधोपचार यज्ञ) केले जात असत. यामुळे ऋतुबदल होताना पर्यावरणात उत्पन्न होऊ शकणाऱ्या वैषम्याचे निराकरण होत असे, पर्यायाने ऋतुबदलामुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध होत असे. हवा शुद्ध करण्यासाठी आयुर्वेदाने घरोघरी धूप करण्यास सुचविले आहे. गुग्गुळ, धूप, चंदन, कडुनिंब, कापूर, वगैरे जंतुनाशक व सुगंधी द्रव्यांची किंवा तयार ‘संतुलन प्युरिफायर धुपा’ची धुरी विविध दृश्‍यादृश्‍य जंतूंचा नाश करण्यास समर्थ असते. तसेच अदृष्ट व वाईट शक्‍तिनाशासाठी ग्रहदोष परिहारक धूप करण्यास सुचविले आहे.

विषद्रव्यांवर उतारा
पर्यावरणातील विषद्रव्यांचा नायनाट करण्याचे उपायही आयुर्वेदाने सांगितलेले आहेत, 
देवदारुनतानन्तामधुकाञ्जनगैरिकम्‌ ।
वज्रकन्दं लतां लोध्रं विकिरेत्‌ श्‍लष्णचूर्णितम्‌ ।।
वृक्षाग्रेषु पताकासु दूष्येषु सुमहत्सु च ।
सर्वतश्‍चूर्ण सम्पर्कात्‌ निर्विषो जातेऽनिलः ।।
...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान

देवदार, तगर, अनंत, ज्येष्ठमध, अंजन, गैरिक, दूर्वा, लोध्र वगैरे द्रव्यांचे सूक्ष्म चूर्ण बनवून वृक्षांच्या शेंड्यांवर, पताकांवर, झेंड्यांवर वगैरे शिंपडावे किंवा पाण्यात कालवून पताका, झेंड्यांवर लेप लावावा. यामुळे हवेचा चहू बाजूंनी या द्रव्यांशी संपर्क आल्यामुळे हवा शुद्ध होते. 

विषद्रव्यांमुळे जमिनीमध्ये दोष निर्माण झाला असता विशिष्ट द्रव्यांचा जमिनीवर शिडकावा करावयास सांगितला आहे. असे कितीतरी उपाय आयुर्वेदाच्या ग्रंथात सापडतील. 

रोग होऊ नये यासाठी रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम असणे अपेक्षित असते. मुळातील प्रकृती चांगली असली, आहार-आचरणाच्या मदतीने ती संतुलित ठेवली, कायाकल्प-रसायनांच्या साह्याने शक्‍ती, ताकद व्यवस्थित राखली असली तर खरे म्हणजे रोगांना प्रतिकार करता यायला हवा, पण या वैयक्‍तिक प्रयत्नांच्या वर असते ते पर्यावरण. हवा, पाणी, जमीन व काळ हे पर्यावरणाचे मुख्य घटक जर बिघडले तर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ शकतो. असे होण्यामागे मुख्य कारण असते निसर्गाविरुद्ध आचरण. या संबंधात चरकसंहितेत सांगितले आहे, 
वाय्वादीनां यद्वैगुण्यमुत्पद्यते तस्य मूलम्‌ अधर्मः, 
तन्मूलं वा असत्कर्म पूर्वकृतं, तयोर्योनिः प्रज्ञापराध एव ।
...चरक विमानस्थान


हवा, पाणी वगैरे पर्यावरणाचे आधारस्तंभ असणाऱ्या घटकांमध्ये बिघाड उत्पन्न होण्यामागे मूळ कारण असते अधर्म. म्हणजे प्रत्येकाने स्वतःचे कर्तव्य योग्य प्रकारे न करणे, निसर्गनियमांना डावलून स्वतःच्या स्वार्थासाठी अयोग्य प्रकारे वागणे, विवेकबुद्धीला न पटणारे दुर्वर्तन करत राहणे.

बिघाडाचे पडसाद
एकदा या बिघाडाला सुरवात झाली की त्याचे पडसाद पर्यावरणात पुढील रूपाने उठू लागतात. 
तेन आपो यथा यथाकालं देवो वर्षति न वा वर्षति विकृतं वा वर्षति,
पाऊस योग्य वेळेला पडत नाही, अजिबातच  पडत नाही किंवा विकृत स्वरूपात पडतो.   
वाता न सम्यक्‌ अभिवहन्ति,
वारे  योग्य प्रकारे वाहात नाहीत, ज्यामुळे वादळ, भूकंप वगैरे उत्पात होऊ शकतात. 
 क्षितिर्व्यापद्यते,
जमिनीत दोष उत्पन्न होतात, ज्यामुळे अन्नधान्याची उत्पत्ती योग्य प्रकारे होऊ शकत नाही
सलिलान्युपशुष्यन्ति
पाणी आटून जाते
  ओषधयः स्वभावं परिहायापद्यन्ते विकृतिम्‌ 

औषधी वनस्पती  आपले स्वाभाविक गुण सोडून देऊन बिघडतात, हीनवीर्य बनतात.
पर्यावरणातील या बदलांचा एकट्या-दुकट्यावर नाही, तर समस्त समाजावर दूरगामी दुष्परिणाम होतो, हे अध्याहृत आहेच. हे सर्व बदल खरे तर होण्यापूर्वीच टाळयला हवेत. एकदा का पंचतत्त्वांमध्ये बिघाड उत्पन्न झाला, काळ बिघडला की त्यावर सहजासहजी उपचार करता येत नाहीत. कारण एक तर ज्याच्या माध्यमातून उपचार करायचे त्या औषधी वनस्पती, अन्नधान्य हीनवीर्य झालेले असतात. शिवाय सर्व समाजाने एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर तसेच वैयक्‍तिक पातळीवरही पर्यावरणातील दोष अजून वाढणार नाहीत, उलट असलेला बिघाड कमी होऊ शकेल यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असते. यात पाण्याचा काळजीपूर्वक वापर, वृक्षसंवर्धन, जैविक साखळीतील प्रत्येक घटकाचे रक्षण, रासायनिक खते-औषधे यांच्या अवाजवी वापरावर निर्बंध, रोजच्या व्यवहारात निसर्गाला हानी पोचणार नाही यासाठी दक्ष राहणे, कचऱ्याची विल्हेवाट वेळेवर व योग्य प्रकारे लावणे, हवेतील व पाण्यातील प्रदूषण कमी होण्यासाठी योग्य प्रयत्न करणे अशा अनेक गोष्टींचा समावेश करावा लागतो. 

हे करा!
पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, पंचतत्त्वामध्ये बिघाड होऊ नये यासाठी आधुनिक काळातही आयुर्वेदिक तत्त्वांचा रोजच्या जीवनात वापर करायचा ठरविले तर पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यायाने समस्त प्राणिमात्रांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करता येतील. 

रासायनिक द्रव्ये वापरून तयार केलेल्या वस्तूंपेक्षा नैसर्गिक शुद्ध घटकांपासून तयार केलेल्या गोष्टींच्या वापरास प्राधान्य देणे, उदा. प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडाच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या डब्यांऐवजी काचेचे किंवा स्टीलचे डबे, बरण्या वापरणे, प्लॅस्टिकच्या कुंड्यांऐवजी पारंपरिक मातीच्या कुंड्या वापरणे वगैरे

 नैसर्गिक संसाधनांचा जपून वापर करणे उदा. कागद वाचवणे, पाण्याची उधळपट्टी न करणे, विजेचा गैरवापर न करणे वगैरे.

 हवेतील अशुद्धी कमी करण्यासाठी वाहनांचा अनावश्‍यक वापर टाळणे, वाहने सुस्थितीत ठेवणे, प्लॅस्टिक, रबरसारख्या गोष्टी न जाळणे, नैसर्गिक द्रव्यांपासून बनविलेल्या उदबत्त्या, धूप जाळणे, नैसर्गिक सुगंधाचाच वापर करणे वगैरे.

 पाण्यातील अशुद्धी कमी करण्यासाठी रोजच्या दैनंदिन व्यवहारात रासायनिक द्रव्यांचा वापर कमीत कमी व्हावा यासाठी तत्पर राहणे. उदा. स्नानासाठी उटणे वापरणे, केस धुण्यासाठी शिकेकाई-रिठा वगैरे वनस्पतींचे चूर्ण वापरणे, नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केलेली औषधे वापरणे, साफ-सफाईसाठीही तीव्र रसायनांचा वापर न करणे.

जमिनीतील अशुद्धी कमी करण्यासाठी झाडांची लागवड करणे, सेंद्रिय खतांचा वापर करणे, कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे वगैरे.

ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे, उलट, शास्त्रोक्‍त संगीत, मंत्र यांच्या साह्याने वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. आणि त्याच बरोबरीने भारतीय परंपरा आणि वेद, आयुर्वेदासारख्या शास्त्रातील ज्ञान टेकून देण्याएवजी त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे हे पटले पाहिजे.  

या प्रकारे प्रत्येकाने आपापल्या परीने पर्यावरणशुद्धीचा खारीचा वाटा उचलला तरच पर्यावरणाचे पर्यायाने आपले आणि अपल्या पुढच्या पीढीचे रक्षण करता येईल व ‘सुजलाम्‌ सुफलाम्‌’ पृथ्वीचा अनुभव घेता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com