प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

मा झे वय ३९ वर्षे असून मी आयटी क्षेत्रातील आहे, गेल्या दोन वर्षांपासून मला मानेच्या दुखण्याचा त्रास होतो आहे, त्यामुळे खाली वाकून पुस्तक वाचणे, काम करणे जमत नाही. तसेच कंबरही दुखते. अर्धा किलो वजनही उचलू शकत नाही. पायाचे तळवे व टाचासुद्धा दुखतात. कृपया मार्गदर्शन करावे. 
.... श्रीमती वर्तक

उत्तर - त्रास होत नसला तरी आयटी क्षेत्रातील सर्वांनाच सुरवातीपासून मान-पाठीच्या आरोग्यासाठी काळजी घेणे आवश्‍यक असते, अन्यथा पाठीशी, नसांशी संबंधित काही ना काही त्रास होण्याची मोठी शक्‍यता असते. यादृष्टीने रोज रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण पाठीच्या कण्याला खालून वर या ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावणे, खारीक पूड टाकून उकळलेले दूध घेणे, चांगल्या तुपात केलेला डिंकाचा लाडू खाणे, तूप-साखरेबरोबर ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेणे हे उपाय योजता येतात. सध्या होणाऱ्या त्रासाची तीव्रता लक्षात घेता या बरोबरीने ‘संतुलन वातबल’ गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. आठवड्यातून २-३ वेळा पादाभ्यंग करण्याने पायाचे तळवे, टाचा दुखणे यावरही आराम मिळेल. आहारात घरी बनविलेले साजूक तूप किमान ४-५ चमचे या प्रमाणात समाविष्ट करणे, मैद्यापासून बनविलेले पदार्थ, वाटाणा, पावटा, चवळी, गवार, वांगे, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर वगैरे वातूळ गोष्टी आहारातून वर्ज्य करणे चांगले. संगणकाच्या स्क्रीनच्या उष्णतेचा डोळ्यांवर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी ‘सॅन अंजन ग्रे किंवा रंगविरहित’ वापरणेही श्रेयस्कर.     

*********************************************

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ वाचून त्यातील बऱ्याचशा गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत आणि त्याचा मला खूप उपयोगही झालेला आहे. माझ्या मुलाचे वय ११ वर्षे आहे. त्याला डोके दुखण्याचा त्रास आहे. डोके गरम होते, विशेषतः उन्हातून किंवा बाहेरून  आल्यावर डोकेदुखीचा त्रास होतोच. नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याने चष्मा वापरून पाहिला, तरीही डोके दुखतेच. कृपया उपाय सुचवावा. ... श्री. विजय

उत्तर - ‘फॅमिली डॉक्‍टर’मधील मार्गदर्शनाचा उपयोग होत असल्याचे कळविल्याबद्दल धन्यवाद. मुलाच्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपचार केले पाहिजेत. यासाठी त्याला नियमित पादाभ्यंग करता येईल. आठवड्यातून एकदा एक ते दीड चमचा एरंडेल तेल देऊन २-३ जुलाब होऊ देण्याने पोटातील उष्णता कमी करता येईल. दिवसातून दोन वेळा ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या, कामदुधा गोळ्या देण्याचाही उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी नाकात घरी बनविलेल्या साजूक तुपाचे किंवा ‘नस्यसॅन घृता’चे २-३ थेंब टाकण्याचा तसेच डोक्‍यावर ‘संतुलन ब्रह्मलीन तेल’ जिरविण्याचाही उपयोग होईल. दही, आंबट फळे, चिंच, टोमॅटो, ढोबळी मिरची, आंबवलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ मुलाला न देणे चांगले. उलट, सकाळ, संध्याकाळ जेवणात वरण-भात-तूप, मुगाची खिचडी-तूप हे समाविष्ट करणे आवश्‍यक. या उपायांनी गुण येईलच, तरीही नेमक्‍या मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे श्रेयस्कर. 

*********************************************
माझे वय २५ वर्षे आहे. मला २-३ वर्षांपासून पाळी येण्यापूर्वी ८-१० दिवस लघवीच्या ठिकाणी फोड येतात. त्यातील काही फोड ५-६ दिवसांत पिकून फुटतात आणि उरलेले फोड पाळी सुरू झाले की आपोआप पूर्णपणे निघून जातात. गेल्या महिन्यात पाळीमध्ये रक्‍तस्राव फार कमी झाला. मी डॉक्‍टरांना दाखवले, खूप अँटिबायोटिक्‍स घेऊन पाहिली, पण उपयोग झाला नाही. कृपया यातून पूर्ण आराम मिळण्यासाठी काही उपाय सुचवावा. .... कु. रोहिणी
उत्तर - अशा प्रकारच्या त्रासाचे मूळ सहसा गर्भाशयात वाढलेल्या उष्णतेशी संबंधित असते. दर महिन्याला पाळी नीट आली आणि रक्‍तस्राव नीट झाला तर हा त्रास आपोआप बरा होऊ शकतो. यासाठी ‘फेमिसॅन तेला’चा पिचू, ‘शक्‍ती धुपा’ची धुरी घेण्याचा फायदा होईल. काही दिवस ‘संतुलन पित्तशांती’ या गोळ्या, ‘संतुलन अनंत कल्प’ टाकून दूध, पाळीच्या वेळी रक्‍तस्राव योग्य प्रमाणात होण्यासाठी ‘संतुलन फेमिनाईन बॅलन्स आसव’ घेण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी एक चमचाभर ताजा कोरफडीचा गर घेण्याचाही फायदा होईल. मूठभर लाह्या, अर्धा चमचा कुटलेले जिरे व अर्धा चमचा कुटलेले धणे हे सर्व रात्रभर पिण्याच्या पाण्यात भिजत घालून सकाळी गाळून घेतलेले पाणी घेण्याचाही उपयोग होईल. अंडी, मांसाहार, तेलकट पदार्थ, ढोबळी मिरची, वांगे, दही वगैरे गोष्टी आहारातून टाळणे चांगले. 

*********************************************

मी   आपले गर्भसंस्कार हे पुस्तक वाचले आहे. त्यातील माहिती फार चांगली आहे. माझा प्रश्‍न असा आहे, की माझ्या पत्नीला पाचवा महिना आहे. तिला दररोज शहाळ्याचे पाणी दिले तर चालेल का?.... श्री. महेश आहेर
उत्तर - संपूर्ण गर्भारपणात शहाळ्याचे पाणी पिता येते. शहाळे गोड, मलईप्रमाणे खोबरे असलेले हवे. शहाळ्याचा आकारही छोटा-मोठा असू शकतो. त्यामुळे शहाळे फोडून त्यातील पाणी सरबताच्या ग्लासमध्ये काढून रोज एक ग्लास म्हणजे १५०-२०० मिली इतक्‍या प्रमाणात घेणे चांगले. यामुळे शहाळ्याचे पाणी गढूळ नाही ना याचीही खात्री करता येईल. बरोबरीने शहाळ्यातील मलई खाणेही चांगले. 

*********************************************
माझी मुलगी सहा वर्षांची आहे. तिला तळहात व तळपायाला खूप घाम येतो, हातात पेन धरणेही अवघड होते. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तिला हा त्रास सुरू झाला आहे. कृपया यावर उपाय सुचवावा.  
उत्तर - शरीरातील द्रवरूपाने बाहेर पडणारे मल म्हणजे घाम आणि मूत्र. शरीरातील अतिरिक्‍त ओलावा आणि बरोबरीने इतर विषद्रव्ये बाहेर टाकण्याचे काम या दोन मलांद्वारा होत असते. काही कारणामुळे जर मूत्रविसर्जन क्रियेद्वारा हे काम पूर्ण झाले नाही तर त्याचा परिणाम म्हणून तळव्यांच्या ठिकाणी अतिरिक्‍त घाम येऊ शकतो. म्हणून अशा केसेसमध्ये मूत्रप्रवर्तनास मदत करणाऱ्या औषधांची योजना केली तसेच शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत केली की गुण येताना दिसतो. या दृष्टीने मुलीला रोज पुनर्नवाघनवटी, गोक्षुरादी गुग्गुळ, ‘संतुलन पित्तशांती’, कामदुधा या गोळ्या देण्याचा उपयोग होईल. प्यायचे पाणी १५-२० मिनिटांसाठी उकळून, गाळून घेण्याचा तसेच आठवड्यातून २-३ वेळा पादाभ्यंग करण्याचाही उपयोग होईल. चवळी, पावटा, वाटाणा, दही, आंबवलेले पदार्थ, आहारातून वर्ज्य करणे चांगले. हे सर्व उपाय सुरू करता येतील, मात्र वयाचा विचार करता जे काही असंतुलन झाले आहे ते बरे होण्यासाठी अनुभवी, तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन घेणे श्रेयस्कर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com